चंद्रपूर : मंदिरात जेवणाची पंगत बसलेली असताना मधमाश्यांचा हल्ला, व्यवसायिकाचा जागेवर मृत्यू
Chandrapur News : भोजनाची तयारी सुरू असताना किशोर वाढई आणि त्यांचे काही नातेवाईक मंदिर परिसरातील एका झाडाखाली स्वयंपाक करत होते. याच दरम्यान चुलीवरील आगीमधून निघालेल्या धुरामुळे झाडावर असलेला मधमाश्यांचा पोळा चवताळला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चंद्रपूर : हनुमान मंदिरातील भोजनाच्या कार्यक्रमात मधमाश्यांचा हल्ला
व्यवसायिकाचा जागेवर मृत्यू
विसापूर (चंद्रपूर) : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावात सोमवारी दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. भिवकुंड येथील हनुमान मंदिराच्या परिसरात भोजनाची तयारी सुरू असताना अचानक मधमाश्यांनी हल्ला चढविल्याने एका भाजीपाला व्यावसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेत किशोर वाढई (वय 54, रा. विसापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी दुपारी सुमारे 4 वाजता ही घटना घडली. विसापूर येथील वाढई कुटुंबाने भिवकुंड परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी कुटुंबीय आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोजनाची तयारी सुरू असताना किशोर वाढई आणि त्यांचे काही नातेवाईक मंदिर परिसरातील एका झाडाखाली स्वयंपाक करत होते. याच दरम्यान चुलीवरील आगीमधून निघालेल्या धुरामुळे झाडावर असलेला मधमाश्यांचा पोळा चवताळला. काही क्षणातच मधमाश्यांनी अचानक उपस्थितांवर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांची पळापळ झाली.
हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात धुक्यासह थंडीनं हुडहुडी भरणार, 'या' भागातील जिल्ह्यांना थंडीचा अलर्ट
मधमाश्यांच्या हल्ल्यात किशोर वाढई यांच्यासह त्यांचे चुलत भाऊ संजय वाढई (वय 56) हे गंभीर जखमी झाले. दोघांनाही मोठ्या प्रमाणात दंश झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. उपस्थितांनी तातडीने दोघांनाही उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले असले तरी किशोर वाढई यांची प्रकृती अधिक बिघडली. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.










