मुंबई: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात खरात यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर प्रचंड दबाव आला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार चाकणकर यांनी आज (20 मार्च) राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी खरातसोबतचे फोटो-व्हिडिओ गुरुपौर्णिमेच्या दिवसाचे असल्याचे स्पष्ट केले आणि केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेल्या दोन दिवसांपासून करत आहात ते अत्यंत चुकीचं आहे, असा आरोप केला. यामुळे राजकीय वर्तुळात त्यांचा ‘रोख’ नेमका कोणाकडे आहे, याची आता चर्चा रंगली आहे.
ADVERTISEMENT
चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले,“अशोक खरात आणि आमचे जे फोटो आणि व्हिडिओ आहेत ते गुरुपौर्णिमेच्या दिवसाचे आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो यामध्ये आहेत. पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेल्या दोन दिवसांपासून करत आहात ते अत्यंत चुकीचं आहे.”
पाहा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर कॅमेऱ्यासमोर येऊन नेमकं काय-काय म्हणाल्या...
'शिवनिका या संस्थान हे महादेवाच्या मंदिराचं जे ट्रस्ट आहे त्यात मी सदस्य म्हणून काम केलं आहे. माझ्यासमवेत अनेक प्रतिष्ठित नागरिक या ट्रस्टवर होते. जेव्हा मी ट्रस्टवर होते तेव्हा मी आयोगाची अध्यक्षा झाले. या ट्रस्टचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 रोजी संपलेला आहे. खरं तर समाजात आपण कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो. खरात पती-पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं होतं. काही वेळेला तिथे होत असलेला कार्यक्रम.. मग तो शिवरात्रीचा असेल,गुरुपौर्णिमेचा असेल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य वाटपाचा असेल.. या निमित्ताने आम्ही उपस्थित राहत होतो.'
हे ही वाचा>> अशोक खरातच्या लैंगिक संबंधाच्या 58 Video Clips, 'ही' Inside Story तुम्हालाही टाकेल हादरवून
'यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानलंय. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहत होतो. माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडिओ हे काही वर्षापूर्वीचे आहेत. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने अनेकांनी पाद्यपूजा केली तशी मी आणि माझ्या पतीने देखील ती पाद्यपूजा केली. 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, वैयक्तिक वागणूक याबाबत आपल्याला कोणतीही सुतराम कल्पना नसते.'
'आज आपण ज्यांच्या बरोबर आहोत ते पुढे जाऊन कसं वागणार ही कल्पना आपल्या कोणाला नसते. त्यामुळे ही घटना समजली तेव्हा मला धक्का बसला.. मी लगेच ते ट्वीट देखील केले सुरुवातीला.'
'या देवस्थानचा ट्रस्टशी माझा, कुटुंबाचा संबंध आहे पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असण्याचं कारण नव्हतं. यामध्ये पोलिसांनी खोलवर निष्पक्षपणे तपास करावा हे आधीच सांगितलंय. त्यासाठी पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे. तसंच फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्यांनाही पत्र दिलं आहे.'
हे ही वाचा>> रुपाली चाकणकरांनी राजीनाम्याचं कारण काय दिलंय माहितीए?, 'ते' पत्र जसंच्या तसं...
'यामध्ये आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो, एक अध्यात्मिक श्रद्धा असते किंवा विश्वास असतो. माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे. त्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती अध्यात्मिक दृष्टिकोनातून होती. म्हणून आम्ही या देवस्थानशी जोडलो गेलो होतो. पण याची जी दुसरी बाजू आहे ती कधीही आमच्या समोर आली नाही. त्याबाबत काही माहिती नव्हती. वर्षातील काही कार्यक्रमांसाठी उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथे असायचो.'
'यामुळे जे काही घडलंय अत्यंत चुकीचं, अतिशय घाणेरडं कृत्य आहे. त्याचं कुठेही आम्हीही समर्थन करणार नाही. पोलिसांनी याचा सखोल तपास करावा. आरोपीवर कठोर कारवाई करावी.'
'यामध्ये दोन गोष्टी प्रकर्षाने सांगायच्या आहेत. काल कोणी पत्रकार खबरदार पुढारी यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात एक बातमी दिली होती 19 मार्च 2025 ला. ही बातमी आमच्या सपुदेशांकडे आली. त्यानंतर आमच्याकडून त्यांना एक पत्र पाठविण्यात आलं. दुसरं पत्र आम्ही पोलीस अधिक्षकांना पाठवलं होतं. याबाबत काही माहिती असेल तर कळवावी म्हणून. याशिवाय संबंधित पत्रकाराला माझ्या ऑफिसमधून फोन गेला होता की, काही माहिती असेल यासंबंधी तर तुम्ही पोलिसात तक्रार करा.'
'यानंतर स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, कोणतीही माहिती नाही.. महिलेची तक्रार नाही. बराच वेळा चुकीच्या बातम्या छापल्या जातात. त्यामुळे त्यांनी आयोगाला पत्र पाठवलं की, कोणतीही माहिती नाही.. जी काही बातमी दिली ती मोघम स्वरूपात दिली आहे. आमच्याकडे पुरावा नाही.'
'दोन दिवसांपासून ज्या चुकीच्या बातम्या चालल्या आहेत त्याचा मी तीव्र निषेध करते.'
'दुसरी गोष्ट माझ्याकडे 5 तारखेला एका मुलीचा मेल आला. या मेलमध्ये खरातच्या ऑफिसमध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका माणसाच्या संदर्भात तक्रार होती. खरातचा यामध्ये उल्लेख नव्हता. यासंबंधी तातडीने त्याच दिवशी आमचं पत्र हे पोलिसांना गेलं. पोलिसांना आम्ही तपास करायला सांगितलं. याची हेअरिंग 17 तारखेला आयोगाच्या कार्यालयात लागली. ज्यामध्ये पोलिसांनी पत्र दिलं की, कारवाई करतोय. त्यात कोणालाही पाठिशी घातलं नाही. तोपर्यंत खरातचं कुठेही नाव नव्हतं. मात्र, त्यांच्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं त्यामुळे आम्ही कारवाई करण्याचे आदेश दिले होते.'
'मात्र, मागील दोन दिवस चुकीच्या बातम्या चालवल्या जात होत्या. आमचे जे फोटो आणि व्हिडिओ आहेत ते गुरुपौर्णिमेच्या दिवसाचे आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकांचे फोटो यामध्ये आहेत. पण केवळ महिला म्हणून ज्या पद्धतीचं सॉफ्ट टार्गेट गेल्या दोन दिवसांपासून करत आहात ते अत्यंत चुकीचं आहे.'
'काही जणांनी सातत्याने पत्रकार परिषद घेऊन चुकीच्या बातम्या पसरविण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी आजच्या बातमीत दाखवलं. 2 सप्टेंबरचा फोटो आहे. खरं म्हणजे हा माझा फोटो आहे 12 सप्टेंबरचा आहे. यापुढची 1 तारीख खोडली आणि 2 सप्टेंबरचा असल्याचं दाखवलं. त्यादिवशी अमावस्या, पौर्णिमा आहे असं काही तरी दाखवलं. माझ्या आजही अकाउंटवर गेलात तर आहेत असे फोटो आहेत. ते 2 सप्टेंबरचे नाहीत. तर 12 सप्टेंबरचे आहेत.'
'2 सप्टेंबरला आम्ही अजितदादांच्या कार्यक्रमात होतो. या फोटोमध्ये माझ्या हाताला कुठेही जखम नाही. हा 3-4 सप्टेंबरचा फोटो आहे. त्यातही कुठेच हाताला जखम नाही. आणि हा 5 सप्टेंबरचा फोटो आहे त्यातही हाताला जखम नाही. कुठला दिवस होता काय दिवस होता.. कोणता विधी होता माहीत नाही. आणि हा 6 सप्टेंबरचा फोटो आहे त्यातही हाताला जखम नाही.'
'कायद्याच्या चौकटीतून आम्ही या सगळ्यांना नोटीसा पाठवूच. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका-टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या पसरवणं. या सगळ्याबाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेन.'
'मी पुन्हा सांगेन यामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहेच. त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. ही मागणी मी केली आहेच. यामुळे आज मी माझ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुनेत्रा पवारांकडे सुपूर्द केला आहे. याबाबतचा जो काही निर्णय असेल तो आदरणीय वहिनी घेतील. आपल्याशी बोलण्यासाठी मी सविस्तर पुराव्यासहीत पत्रकार परिषद घेईन.' असं रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.
ADVERTISEMENT











