NCP Ajit Pawar faction meeting insider story : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची नुकतीच एक बैठक पार पडली होती. या बैठकीसाठी सर्व आमदार-खासदार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिवसाची म्हणजेच 10 जूनसाठीची तयारी कशी करायची? यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष होतं. विलीनीकरणाचा विषय या बैठकीत गाजला होता. आमदारांनी याबाबत शरद पवारांकडे स्पष्टता मागितली होती. त्याच दिवशी अजित पवार गटाची बैठक देखील पार पडणार होती. काही कारणास्तव ही बैठक लांबणीवर पडली. मात्र, ती बैठक काल म्हणजे मंगळवारी (दि.26) पार पडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये वाद झाल्याचं समोर आलंय. नेमकं काय घडलंय? याच बैठकीची इनसाईड स्टोरी जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
हेही वाचा : नात्याला काळिमा! कल्याणमध्ये बापाने लेकीला देखील सोडलं नाही, तिच्यावर...
सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वादावादी?
मागील अनेक दिवसांपासून अजित पवार गटात नाराजीचा सूर पाहायला मिळत होता. सूनेत्रा पवार यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी पाठवण्यात आली होती. या यादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव नव्हतं. त्यानंतर अनेक चर्चा झाल्या. पक्षात नाराजी असल्याचं बोललं गेलं. यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले. स्पष्टीकरण देखील देण्यात आले. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची काल झालेली बैठक महत्त्वाची ठरली. कारण नाराजीच्या विषयाला कोणी हात घालणार का? याकडे सर्वाचं लक्ष होतं. आणि झालं देखील तसंच.... पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांनी याबाबतची तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "माझ्यावर आरोप करण्यात येत होते, माझ्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यावेळी पक्षातील एकही नेता माझ्या बाजूने उभा राहिला नाही. माध्यमांसमोर जाऊन बोलला नाही. शिवाय कोणी स्पष्टीकरण देखील दिलं नाही.", अशी खंत सुनील तटकरे यांनी व्यक्त करताच पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी हस्तक्षेप केला. भुजबळ म्हणाले की, "या सगळ्या गोष्टी आजच्या बैठकीत काढण्याचं कारण नाही. आपण पुढे जाऊयात...यावरती नंतर चर्चा करता येईल." मात्र, भुजबळ यांनी हस्तक्षेप करताच सुनील तटकरे संतापले. ते म्हणाले, "भुजबळ साहेब तुम्ही तर पक्षाचे जुने-जाणते आणि ज्येष्ठ नेते आहात. किमान तुम्ही तरी माझी बाजू मांडली पाहिजे होती. तुम्ही तरी माझ्या बाजूने बोलायला हवे होतात." यानंतर भुजबळ देखील थोडेसे नाराज झाले.
हेही वाचा : नात्याला काळिमा! कल्याणमध्ये बापाने लेकीला देखील सोडलं नाही, तिच्यावर...
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत बाचाबाची?
सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वाद झाला. थोडीशी बाचाबाची देखील झाली. कारण हेच होतं की, विरोधकांसह सर्वजण सुनील तटकरे याच्यावर आरोप करत होते, तेव्हा तटकरेंच्या बाजूने कोणी उभारलं नाही. याची कारणं देखील सुनील तटकरे यांनी दिली. ते म्हणाले, "मी आणि प्रफुल्ल पटेल यांनी दादा आपल्यातून गेल्यानंतर सत्तेतील आपलं स्थान कायम राहिलं पाहिजे, यासाठी प्रयत्न केले. आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दिल्लीत चर्चा केली. उपमुख्यमंत्रिपद आपल्याकडे ठेवलं. तरीही माझ्या बाजूने कोणी उभारलं नाही." याची उत्तरं सुनील तटकरेंना मिळाली नाहीत. मात्र, यामुळे पक्षात सर्वकाही सुरळीत चाललेलं नाही, हेच स्पष्ट होतंय.
दरम्यान, याबैठकीला प्रफुल्ल पटेल गैरहजर होते. ते पक्षाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित असतात. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीला का उपस्थित नव्हते? याबाबतही चर्चेला उधाण आलंय. मुंबई Tak ने याबाबत विचारलं असता ते म्हणाले, मी माझ्या मुलीच्या घरी आलेलो आहे. सध्या मी काही बोलू शकत नाही. मी नंतर तुमच्याशी बोलेन.." दरम्यान, प्रफुल्ल पटेल नाराज आहेत का? अशीही चर्चा सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT











