omraje nimbalkar dharashiv development fund : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच त्यांना 18 कोटींचा निधी मंजूर झालाय. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विकास निधीच्या मुद्द्यावरुन ठाकरेंची साथ सोडली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नसल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी यापूर्वीच स्पष्टपणे बोलून दाखवले होते. त्याचवेळी निधी मिळत नसल्यामुळे विकासकामांवर मर्यादा येत असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. आता शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर धाराशिव शहरातील विविध विकासकामांसाठी तब्बल 18 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : पुढचे काही तास महत्त्वाचे, विजांच्या कडकडाटासह मान्सून धुमाकूळ घालणार
ओमराजे निंबाळकर यांची फेसबुक पोस्ट
धाराशिव शहराच्या विकासाला नवी गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय!
उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मंजूर कामे :
• आठवडी बाजार विकसित करणे – ८ कोटी रुपये
• राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करणे – ५ कोटी रुपये
• छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करणे – ३ कोटी रुपये
• हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान विकसित करणे – २ कोटी रुपये
एकूण मंजूर निधी – १८ कोटी रुपये
या कामांमुळे धाराशिव शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
धाराशिवच्या विकासासाठी सातत्याने पाठबळ देणारे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे मनःपूर्वक आभार!
धाराशिवच्या विकासाचा हा प्रवास असाच वेगाने सुरू राहील.
ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून धाराशिव नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये आठवडी बाजार विकसित करण्यासाठी 8 कोटी रुपये, राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करण्यासाठी 5 कोटी रुपये, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी 3 कोटी रुपये आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एकूण 18 कोटी रुपयांच्या या निधीमुळे धाराशिव शहराच्या सौंदर्यात भर पडेल तसेच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. धाराशिवच्या विकासासाठी सातत्याने पाठबळ देणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभारही मानले आहेत.
हेही वाचा : Maharashtra Weather : पुढचे काही तास महत्त्वाचे, विजांच्या कडकडाटासह मान्सून धुमाकूळ घालणार
ओमराजेंना यापूर्वी किती निधी मंजूर झाला? मुंबई Tak ने मांडली आकडेवारी
दरम्यान, खासदारांना विकास निधी मिळत नव्हता का, या प्रश्नावरूनही चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात मुंबई Tak ने केलेल्या पडताळणीत मागील दोन वर्षांतील खासदार निधी आणि त्यातून झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. उपलब्ध आकडेवारीनुसार, ओमराजे निंबाळकर यांनी 18.5 कोटी रुपयांच्या मंजूर निधीपैकी सुमारे 1.97 कोटी रुपये खर्च केल्याचे समोर आले. ही आकडेवारी सार्वजनिक झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी यावर सविस्तर भूमिका मांडली. निधीचे मूल्यमापन करताना केवळ खर्च झालेली रक्कम न पाहता त्या निधीची मुदत आणि त्याचा वापर कोणत्या स्वरूपात होतो, याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
निधीच्या मुद्यावरुन ओमराजेंचं उत्तर
यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी एमपी लॅड निधीच्या मर्यादांकडे लक्ष वेधले. एका वर्षाला मिळणारा 5 कोटी रुपयांचा खासदार निधी आणि लोकसभा मतदारसंघातील सुमारे 2475 बुथ यांचा विचार केल्यास प्रत्येक बुथामागे साधारण एक लाख रुपयेच उपलब्ध होतात, असे त्यांनी सांगितले. एका लाख रुपयांमध्ये मोठी विकासकामे करणे शक्य नसल्याचा दावा त्यांनी केला. खासदारकीच्या पहिल्या पाच वर्षांत मिळालेल्या निधीतील एकही पैसा खर्च करायचा बाकी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एमपी लॅड निधीची आकडेवारी आणि प्रत्यक्ष विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या मोठ्या निधीची तुलना केली तर वास्तव समोर येईल, असे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. आता धाराशिवसाठी मंजूर झालेल्या 18 कोटी रुपयांच्या निधीमुळे शहरातील विकासकामांना किती गती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT











