Omraje Nimbalkar mpsc students protest, पुणे : एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि एमपीएससीच्या परीक्षा पारदर्शकपणे घेण्यात याव्यात, या मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, रविवारी (4 ऑक्टोबर) धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली. मात्र, यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पक्षबदलाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी ‘ओमराजे परत या’ अशा घोषणा दिल्या, तर काहींनी गर्दीतून ‘गद्दार’ असा आवाज दिला.
ADVERTISEMENT
“मी कुठे गेलेलो नाही, मी इथेच आहे. मी लोकप्रतिनिधी आहे,”
विद्यार्थ्यांचा रोष पाहून ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या पक्षबदलाच्या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट केली. “मी कुठे गेलेलो नाही, मी इथेच आहे. मी लोकप्रतिनिधी आहे,” असं म्हणत त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेशी असलेला संपर्क तुटलेला नसल्याचं सांगितलं. आपल्या मतदारसंघात पूर, दुष्काळ किंवा अन्य आपत्ती असताना आपण सामान्य माणसाची साथ सोडली नाही, असा दावा त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाच्या अनेक उमेदवारांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र, सत्ता नसल्याने त्या माध्यमातून काम करण्यात अडचणी आल्या आणि आपल्या लोकांचा पराभव झाला. त्यामुळे पक्षबदलाचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा : 'रवींद्र चव्हाणही मंचेकर गँगचे सदस्य होते त्यांना...,' शिवसेना नेत्याचे गंभीर आरोप; महायुतीत महाभारत!
विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार
यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या एमपीएससीशी संबंधित मागण्यांवरही भाष्य केलं. विद्यार्थ्यांची परीक्षा आणि लोकप्रतिनिधींची निवडणूक यांची तुलना करत त्यांनी सांगितलं की, विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्या आयुष्याशी संबंधित आहे. पेपरफुटीसारख्या प्रकारामुळे परीक्षा रद्द झाल्यास मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या यातना सहन कराव्या लागतात, असं त्यांनी म्हटलं. एमपीएससीच्या सचिवांची बदली झाली असून अध्यक्षांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे, असं त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटून त्यांच्या मागण्यांबाबत विनंती करणार असल्याचंही ओमराजेंनी सांगितलं.
मात्र, भाषणादरम्यान विद्यार्थ्यांकडून सातत्याने घोषणा दिल्या जात असल्याने ओमराजेंना अनेकदा विद्यार्थ्यांना शांत राहण्याचं आवाहन करावं लागलं. “तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो, चूक झाली का?” असा सवालही करण्याची वेळ ओमराजे निंबाळकर यांच्यावर आली. एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी पुन्हा जोरात मांडली. यानंतर आंदोलक विवेकानंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. ओमराजे निंबाळकर यांचं भाषण संपल्यानंतर विद्यार्थी शांत झाले. अखेरीस आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आल्याबद्दल विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवल्या.
ADVERTISEMENT












