'तुम्हाला सत्ता मिळाल्याचा राग नाही, पण...' राज ठाकरेंची तोफ धडाडली, थेट भाजपच्या माजी मंत्र्याची 'ती' गोष्ट सांगितली!

मुंबई तक

मुंबईतील गर्जना मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी SIR संपूर्णपणे रद्द करण्याची आणि EVM बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. निवडणूक प्रक्रिया, मतदारसंख्या आणि सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी भाजपला थेट इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

mns chief raj thackeray mumbai garjana morcha sir cancel evm ballot paper demand
राज ठाकरे
Google CTA

मुंबई: निवडणूक प्रक्रिया, मतदारसंख्या आणि SIRच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. मुंबईतील 'गर्जना मोर्चा'मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. 'सत्ताधाऱ्यांना सत्ता मिळाल्याचा राग नाही, पण ती सत्ता ज्या पद्धतीने मिळवली आणि राबवली जात आहे, त्याचा राग आहे,' असं म्हणत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील SIR संपूर्णपणे रद्द करण्याची आणि यापुढे EVMऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली.

'2017-18 पासूनच राज ठाकरे सांगत होता...'

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात 2017-18 पासून निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांबाबत आपण आवाज उठवत असल्याचं सांगितलं. त्यावेळी सोनिया गांधींसह अनेक नेत्यांची भेट घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिकाही आपण मांडली होती, असा दावा त्यांनी केला.

'असा कोणता विजय असतो की विजयानंतर सन्नाटा?'

2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला. 'महाराष्ट्रात सन्नाटा होता. असा कोणता विजय असतो की विजयानंतर पूर्णपणे सन्नाटा?' असा सवाल त्यांनी केला.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत 40 ते 60 लाख मतदार वाढल्याचा दावा करत त्यांनी मतदारसंख्येवरूनही सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत 'असा कोणता व्हायग्रा आहे की दणादण मतदार वाढतायेत?' असा टोला लगावला.