Praful Patel : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. याठिकाणी त्यांच्यात जवळपास सव्वा तास चर्चा झाली. आम्हाला उपमुख्यमंत्रीपद लवकरात लवकर भरायचे आहे आणि त्यासाठीच चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार विधिमंडळ पक्षाची बैठक उद्या होणार आहे. या बैठकीत त्यांचा गटनेता निवडण्यात येणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पुणे: अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये "अजित सृष्टी" उभारणार! भाजप आमदार महेश लांडगे यांची मागणी
भेटीत काय घडलं?
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ही भेट का घेण्यात आली याविषयी त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, 'आम्ही महायुतीचा एक भाग आहोत. अजितदादा आमचे नेते होते, उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे योग्य निर्णय घेऊन ती जागा आम्हाला भरावी लागणार आहे. त्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी आम्ही आलो होतो. ही प्रक्रिया आम्ही लवकरात लवकर पूर्ण करु इच्छितो. जनभावना आणि आमदारांची भावना आम्हाला माहिती आहे. त्या भावनेला अनुसरुनच आम्ही निर्णय घेणार आहोत.'
सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार का याविषयी विचारले असता पटेल म्हणाले की, 'सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आम्ही केलेली नाही. मात्र आम्ही जनतेच्या भावना ध्यानात ठेऊन योग्य निर्णय घेऊ. आज तिसरा दिवस आहे. अजून विधी होत आहेत. पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा वहिणींशी आम्ही बोलणार आहोत. शक्य असेल तर आज रात्री किंवा उद्या सकाळी आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत. सुनेत्रा पवार यांच्या नावाला विरोध असण्याचं काही कारण नाही. पण आधी त्यांच्यासोबत आम्हाला बोलावं लागेल.'
हे ही वाचा : अजितदादांच्या अस्थी पाच मंगल कलशांमध्ये एकत्रित; प्रयागराजसह 'या' ठिकाणी होणार विसर्जन
अर्थमंत्रीपद कोणाकडे जाणार?
अजितदादांकडे राज्याचं अर्थमंत्रीपदही होतं. ते कोणाकडे जाणार याविषयी पटेल म्हणाले की, 'अधिकृत नेता निवडल्यानंतर बाकीची चर्चा करता येईल. तात्पुरतं सगळं काम चालू आहे. मुख्यत: विधीमंडळातील जागा भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर आम्ही भरु इच्छितो. त्यासाठीच मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो होतो. आज तिसरा दिवस आहे. अजून विधी व्हायचे बाकी आहेत. त्यानंतर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी आम्ही चर्चा करु.'
ADVERTISEMENT











