शिंदेंच्या आमदाराचा 'टक्केवारीचा' कथित Video प्रचंड व्हायरल, शिवसेना करणार कारवाई?

कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा कथित 'टक्केवारी' संदर्भातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत एकच खळबळ माजली आहे.

purported video of kolhapur shiv sena shinde faction mla rajesh kshirsagar regarding percentage has gone viral will shiv sena take action

शिंदेंचे आमदार राजेश क्षीरसागरांचा कथित व्हिडिओ व्हायरल

मुंबई तक

• 07:16 PM • 27 Jun 2026

follow google news

कोल्हापूर: कोल्हापूरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार राजेश क्षीरसागर यांचा कथित 'टक्केवारी' संदर्भातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये आर्थिक व्यवहार आणि टक्केवारीबाबत चर्चा होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता मुंबई Tak ने पडताळलेली नाही. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागरांवर कोणती कारवाई केली जाणार? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते रवी किरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर टक्केवारी घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. दुसरीकडे, राजेश क्षीरसागर यांचे पुत्र आणि कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत व्हिडिओ एडिट करण्यात आल्याचा दावा केला आहे.

हे ही वाचा>> 'त्यांची माफी मागण्यासाठी मी आलोय' फुटीर खासदारावर ठाकरेंचा पहिला हल्ला, कोणाच्या मतदारसंघात पोहोचले?

ऋतुराज क्षीरसागर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असा दावा करण्यात आला आहे की, विधानसभा निवडणुकीदरम्यानही हाच व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी कोणतेही तथ्य आढळले नव्हते. उलट जनतेने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या बाजूने कौल दिला होता, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच या व्हिडिओच्या प्रसारामागे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हे ही वाचा>> केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल, शिंदेंच्या 'त्या' खासदाराला लॉटरी लागणार?

याशिवाय, ठाकरे शिवसेनेचे नेते रवी किरण इंगवले यांच्याविरोधात पाच कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचाही इशारा ऋतुराज क्षीरसागर यांनी दिला आहे.

टक्केवारीचा कथित व्हिडिओ व्हायरल जसाच्या तसा...

आमदार क्षीरसागर: मला एक सांगा आपला हिशोब कसा ठरला होता?

समोरील व्यक्ती: साहेब त्या दिवशी तुम्ही इथे बसलेलात नंतर तुम्ही आत गेले.. त्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले.. 

आमदार क्षीरसागर: काय ठरलं ते सांगा..

समोरील व्यक्ती: मला म्हणाले, साहेबांचे 5 

आमदार क्षीरसागर: तुम्ही त्यावेळी आले होते तेव्हा काय सांगितलं होतं.. 

समोरील व्यक्ती: ऐका ना साहेब.. ऐका ना.. मला 5 मिनिटं द्या ना.. 

आमदार क्षीरसागर: बोला..

समोरील व्यक्ती: मला म्हणाले आपला 7 चा हिशोब ठरलेला.. 

आमदार क्षीरसागर: बरोबर.. 

समोरील व्यक्ती: ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमचे दोघांचे 1-1.. त्याप्रमाणे 40 लाख रुपये मी तुम्हाला दिले साहेब. 

आमदार क्षीरसागर: माझं पहिलं ऐका तुम्ही.. 

समोरील व्यक्ती: एकच मिनिट साहेब माझं ऐका.. मी त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केले साहेब मी राहुलला.. एवढी त्यांनी माझ्याकडे घाई केली

आमदार क्षीरसागर: हे बघा.. एक लक्षात घ्या साहेब.. आपलं काय ठरलं होतं 

समोरील व्यक्ती: 7 टक्केच.. 

आमदार क्षीरसागर: आपलं काय ठरलं होतं.. मी तुम्हाला विचारलं का?

समोरील व्यक्ती: अहो पण आज ते तुमच्याबरोबर गेले साहेब.. 

आमदार क्षीरसागर: नाही, नाही.. असं नाही करून चालणार, तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या. त्यांना एक टक्का द्यायचा असेल तुम्ही दोन द्या. आम्हाला दोन टक्के तु्म्ही कमी द्या. हे बघा व्यवहार म्हणजे व्यवहार.. आम्ही दुसऱ्याकडून काम काढून तुम्हाला दिलं. त्यावेळी तुम्हाला बोललो होतो तेव्हा दिलं. 

समोरील व्यक्ती: आता साहेब खरं सांगू तुम्हाला.. 

आमदार क्षीरसागर: हे बघा तुम्हाला तिथं कामात काय कमतरता आहे ते मी बघतो.. पण असं नाही चालणार.. जे ठरलंय ते..

समोरील व्यक्ती: नाही साहेब आता मला ते कामच.. कारण तिथे पण मला एवढं प्रेशर 

आमदार क्षीरसागर: नाही.. तुम्हाला ते पैसे परत करायला लावतो मी.. 

समोरील व्यक्ती: ओके.. सॉरी हा साहेब

आमदार क्षीरसागर: नाही, नाही.. ठीकए

समोरील व्यक्ती: हे बघा, राग मानू नका साहेब...

आमदार क्षीरसागर: रागाचा विषय नाही साहेब.. व्यवहार शक्यतो आपण पाळायचा. 

समोरील व्यक्ती: नाही साहेब, माझ्याकडून पाळला गेला.. 

आमदार क्षीरसागर: साहेब तुम्ही चुकताय कुठं.. एक लक्षात घ्या.. व्यवहार हा सगळा, मालक कोण आहे? 

समोरील व्यक्ती: मालक तुम्ही आहात.. 

आमदार क्षीरसागर: कोण आलं माझ्या बरोबर बोलायला.. मला एक गोष्ट सांगा त्यामध्ये कोणी ढवळाढवळ करत होतं तर तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का?

समोरील व्यक्ती: साहेब आता आपण म्हणतो की, कशाला चुगल्या करा ना.. आपला स्वभाव नाही साहेब.. 

आमदार क्षीरसागर: असं नाही, असं नाही.. ते कसं आहे माहितीए का.. वरती पण करावं लागतंय ते. असं नसतंय ते..

समोरील व्यक्ती: अहो साहेब तुमचं सगळं मान्य आहे, पण.. तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना.. 

आमदार क्षीरसागर: तुम्हीच चुकला आहात..

समोरील व्यक्ती: मी मान्य करतो.. पण तुम्ही आमदार आहात साहेब.. मी साधा माणूस आहे

आमदार क्षीरसागर: असा विषय नाही साहेब.. आमदार आणि साधा माणूस

समोरील व्यक्ती: आज कोल्हापूरमध्ये तुमचं सगळं चालतं, ताकद आहे. 

आमदार क्षीरसागर: नाही.. 

समोरील व्यक्ती: माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं.. ते तुमच्या मागे आत गेले आणि..

आमदार क्षीरसागर: मला ते बाकीचं विषय काही माहीत नाही. तुम्ही कामात कुठे मदत करायची सांगा.. 

समोरील व्यक्ती: नको साहेब मला खरंच.. मला ते गोदरेजबरोबर पण नाही जमणार. जाऊ दे.. 

आमदार क्षीरसागर: ठीकए.. ठीकए.. तशी व्यवस्था लावू आपण, मी बोलावून घेतो.. तशी व्यवस्था लावू आपण.. काय नाईलाज आहे. नंतर बघा तुम्हाला काय बघायचं असेल ते. आपलं ठरलं होतं.. तुमचा काय परस्पर व्यवहार असेल.. 

समोरील व्यक्ती: अहो साहेब परस्पर नाही, इथेच झाला व्यवहार.. तुम्ही जर त्यांना दोन टक्के त्यांना पैसे दिले.. नाही मी त्यांना एक टक्का दिला.. 

आमदार क्षीरसागर: एकच टक्का त्यांना द्यायचा होता. आणि आता काय तुम्हाला काही करायचंच नाही तर विषयच नाही.. 

समोरील व्यक्ती: नको साहेब, सॉरी.. 

टक्केवारीचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर नेमकं काय म्हणालेले?

दरम्यान, न्यूज18 मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आमदार राजेश क्षीरसागर यांनीही सर्व आरोप फेटाळून लावले. "कोणीतरी स्वतःचे गेलेले पद टिकवण्यासाठी वरिष्ठांना खुश करण्याच्या उद्देशाने एडिट केलेला व्हिडिओ प्रसिद्ध करून स्वतःचा बचाव करत असेल तर त्याला लखलाभ," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तसेच, या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा आपण उद्या सकाळी पत्रकार परिषदेत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतीश पाटील यांच्या भूमिकेबाबतही आपण पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्हिडिओबाबत वारंवार प्रश्न विचारल्यानंतरही राजेश क्षीरसागर यांनी, "हा एडिट केलेला व्हिडिओ आहे. यापेक्षा अधिक काहीही बोलणार नाही. उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती मांडेन," असे सांगितले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे राजेश क्षीरसागर आणि रवी किरण इंगवले यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, सतीश पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर ते काय भूमिका घेतात आणि राजेश क्षीरसागर उद्याच्या पत्रकार परिषदेत कोणते पुरावे किंवा स्पष्टीकरण देतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.