'त्यांची माफी मागण्यासाठी मी आलोय' फुटीर खासदारावर ठाकरेंचा पहिला हल्ला, कोणाच्या मतदारसंघात पोहोचले?

मुंबई तक

उद्धव ठाकरे हे फुटीर खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी फुटीर खासदारांवर टीकास्त्र डागले. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
google news

बातम्या हायलाइट

point

'त्यांची माफी मागण्यासाठी मी आलोय'

point

फुटीर खासदारावर ठाकरेंचा पहिला हल्ला

point

कोणाच्या मतदारसंघात पोहोचले?

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे फुटीर खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या यवतमाळचे खासदार संजय देशमुखांच्याच मतदार संघात जाऊन उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. याआधी यवतमाळमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी विविध विषयावर भाष्य केले. ज्या मतदारांनी या खासदारांना निवडून दिलं त्यांची माफी मागण्यासाठी आलो असल्याचं ठाकरेंनी सांगितलं. यावेळी ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.

'माफी मागण्यासाठी आलोय'

दौरा कशासाठी हे स्पष्ट करताना ठाकरेंनी सांगितले की 'शिवसैनिक आणि पत्रकार माझ्यासोबत आहेत. कारण गेल्या काही दिवसांत या सर्वांची वागणूक, वर्तणूक भाषा आपण सगळे अनुभवता आहात. मला स्वत:ला लाज वाटते की बुरखे पांघरुन हे लोक आपल्यासोबत इतकी वर्ष राहिली कशी? या लोकांकडून पत्रकारांना जी वागणूक मिळाली ती शोभणारी नाही. आजपासून मी या गद्दारांच्या मतदारसंघातील माझ्या कट्टर, कडवट शिवसैनिकांना भेटण्यासाठी आणि इथल्या मतदारांनी मशाल बघून जो उमेदवार दिला त्याची पार्श्वभूमी न बघता ज्या मतदारांनी निवडून दिलं त्यांची माफी मागण्यासाठी मी आलोय.'

हे ही वाचा : “...तर सेवेचा राजीनामा द्या आणि”, राज ठाकरेंनी नांगरे पाटलांना सुनावलं

खासदारांना किती निधी मिळाला?

निधीसाठी हे खासदार फुटल्याचे विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, 'निधी याचा अर्थ तुम्हाला माहितीये की जेव्हा आमदार फुटले होते, तेव्हा महाराष्ट्रभर पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा खेड्या-पाड्यापर्यंत गाजली होती. विदर्भात बैलपोळ्यादिवशी बैलांवरही ते लिहिलं होतं. आता आमदारांना 50 कोटी दिले गेले असतील तर खासदारांना किती दिले गेले असतील हा हिशोब ज्याला लावायचा तो लावू शकतो.'

हे ही वाचा : केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल, शिंदेंच्या 'त्या' खासदाराला लॉटरी लागणार?

'उपटसुंभानी टीका करु नये'

या दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, 'ज्यावेळी खासदार निवडून आले तेव्हा मीच दौरा केला होता. आणि मीच दौरा केल्यानंतर, माझ्याच शब्दावर हे खासदार निवडून आले होते. तेव्हा यांना घरी बसवलं होतं. जे हारले होते ना..आता जे बोंबलतायत बेंबीचा देठ कुठपर्यंत आहे त्यांचा मला माहित नाही. पण तिथपासून हे बोंबलतायत आता दौरा करुन फायदा नाही, पण मी दौरा केला होता म्हणूनच हे खासदार निवडून आले होते. आता शेतकरी संघटनेचे लोक मला भेटले होते. त्यांनी मला एक निवेदन दिलं. पीक विम्याचा पत्ता नाही, हमीभाव मिळतोय की नाही माहिती नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाहीये, पण आमच्या भरोश्यावर जे निवडून आले त्यांना मात्र भरघोस हमीभाव मिळालाय. त्यामुळे उपटसुंभानी आमच्यावर टीका करण्याचं धाडस करु नये.'

हे वाचलं का?