समजून घ्या: ठाकरेंच्या खासदारांनंतर आता नंबर नगरसेवकांचा? निधी वाटपातला भेदभाव पाहा!
पक्षांतरं करताना खासकरून जर निधीचंच कारण द्यायचं असेल तर तेच कारण आमदार आणि पुढे जाऊन नगरसेवकांनाही लागू होतं. या लॉजिकनुसार उद्धव ठाकरेंना आता नगरसेवकांची चिंता का असावी, नगरसेवकांच्या निधीवाटपातही भेदाभेद होतोय हे समजून घेऊया.
ADVERTISEMENT

मुंबईः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटल्यानंतर चर्चा सुरू झाली की आता आमदार किंवा अगदी मुंबईतले नगरसेवकही फुटतील का? कदाचित थोड्या अवकाशानंतर होईल, पण होईल असं म्हणतायत. मुळात खासदार फुटतील हे ही २०२४ च्या विधानसभा निवडणुकांपासूनच बोलत होते, कितीही नाही म्हटलं तरी शेवटी ते फुटलेच कारण अर्थात सगळ्या गोष्टी जुळवून आणायच्या होत्या. पण सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे कारण. म्हणजे खरी कारणं काहीही असो, पण पक्षांतरं करताना खासकरून जर निधीचंच कारण द्यायचं असेल तर तेच कारण आमदार आणि पुढे जाऊन नगरसेवकांनाही लागू होतं. या लॉजिकनुसार उद्धव ठाकरेंना आता नगरसेवकांची चिंता का असावी, नगरसेवकांच्या निधीवाटपातही भेदाभेद होतोय का समजून घेऊ.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ६५ तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले. यातून काही मेसेज गेले. जसं की मुंबईकरांच्या मनात अजूनही उद्धव ठाकरेंचीच शिवसेना ही खरी शिवसेना मानली जाते का, मुंबईत अजून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला म्हणावे तसे हातपाय पसरता आले नाहीयेत का, मराठी माणूस शिंदेंच्या शिवसेनेकडे अधिकृत नाव-चिन्हं असूनही ठाकरे बंधूंकडेच आकर्षित होतो का, वगैरे वगैरे. पण हे सगळे समज तयार झाल्यामुळे किंवा हे इम्प्रेशन सेट झाल्यामुळे राजकीय धक्का तर बसला.
त्यापलिकडे भाजपचे ८९ त्या तुलनेत शिंदेंचे केवळ २९ नगरसेवक हे भाजपलाही मुंबईत शिवसेनेची चांगली साथ न मिळाल्याने अपसेट करणार होतं. आता त्यात जर भर पाडायची असेल तर शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या नगरसेवकांना टॅप करण्याचा प्रयत्न करणार. आता निधीवरून जी अडचण खासदारांची होती तीच नगरसेवकांचीही होतेय, कारण मुंबई महापालिकेतल्या नगरसेवकांना मिळणाऱ्या निधीतील भेदाभेद पाहिला तर उद्या हे नगरसेवकही निधीच्या कारणास्तव फुटू शकतात.
अलिकडेच इंडियन एक्स्प्रेसने याबाबतची बातमी छापलेली, ज्याचा मथळाच सांगतो की एकूण वाटप करण्यात आलेल्या २०६ कोटी निधीपैकी ९६ टक्के निधी हा फक्त महायुतीच्या नगरसेवकांनाच मिळालाय. म्हणजे विचार करा विरोधी पक्षातल्या नगरसेवकांना किती किरकोळ निधी मिळाला असेल. 206 कोटींपैकी १४५ कोटी भाजपच्या नगरसेवकांना मिळाला, ५४ कोटी शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना मिळाले. इथेच २०० कोटी संपले. म्हणजेच ठाकरेंचे ६५, मनसेचे ६, काँग्रेसचे २४ आणि एमआयएमच्या ९ नगरसेवकांच्या वाट्याला मिळून फक्त ६ कोटी आले.









