जैन समाजाकडून राज ठाकरेंना लेखी माफीनामा, शिवतीर्थवर काय घडलं?
काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या वादग्रस्त प्रकारानंतर जैन समाजाच्या प्रतिनिधींनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत लेखी माफीनामा सादर केला आहे. यावेळी राज ठाकरेंनी त्यांची कानउघाडणी केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जैन समाजाकडून राज ठाकरेंना लेखी माफीनामा
शिवतीर्थवर काय घडलं?
Jain Community Delegation Apologized to Raj Thackeray : मुंबईतील मालाड येथे काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त प्रकार समोर आला होता. येथील दफ्तरी रोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जिरेटोपावर काही समाजकंटकांनी जैन समाजाचा झेंडा लावला होता. या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलनही करण्यात आले होते. यानंतर आता मालाड येथील जैन समाजाच्या प्रतिनिधींनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ'वर भेट घेऊन लेखी माफीनामा सादर केला आहे.
जैन समाजाच्या प्रतिनिधींची कानउघाडणी
या भेटीत जैन समाजाच्या प्रतिनिधींनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच भविष्यात असा प्रकार पुन्हा घडणार नाही याची ग्वाही दिली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी जैन समाजाच्या प्रतिनिधींना समज दिली. 'मुंबईत सध्या ठिकठिकाणी दुकानांच्या पाट्या किंवा मराठी फलकांवर पांढरे पट्टे मारण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे जैन आणि मराठी समाजात विनाकारण वाद निर्माण होत आहेत. हे वाद तातडीने थांबले पाहिजेत आणि मराठी अस्मितेचा आदर राखलाच गेला पाहिजे," अशा शब्दात राज ठाकरे यांनी जैन प्रतिनिधींची कानउघाडणी केली.
हे ही वाचा : “धाराशिव लोकसभा मतदारसंघात 4.5 लाख मुस्लिम मतदार", अर्चना पाटील नेमकं काय म्हणाल्या?
जैन प्रतिनिधींनी दिलेला माफीनामा जशाच्या तसा
दिनांक 17 जून 2026 रोजी शिवाजी चौक, सेंटर प्लाझा जवळ, दफ्तरी रोड येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोप पुतळ्यावर काही समाजकंटक व्यक्तींकडून जैन समाजाचा ध्वज लावण्यात आला. ह्या घटनेमुळे मराठी समाजाच्या व शिवप्रेमीं यांच्या भावना दुखावल्या गेल्या याची आम्हाला जाणीव आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा जिरेटोप हा स्वाभिमान, शौर्य आणि मराठी अस्मितेचे प्रतीक आहे. अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रतीकाचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे, याबाबत आम्ही पूर्णपणे सहमत आहोत.









