20 तास काम, जनावरांचं खाद्य अन् मृत्यू, 'या' 12 कामगारांसोबत मालकाने काय केलं?
एका कारखान्यातून काही अल्पवयीन मुलांसह बारा वेठबिगार मजुरांची सुटका करण्यात आला आहे. या मजुरांनी आरोप केला आहे की, त्यांना नोकरीची खोटी आश्वासने देऊन फसवण्यात आले, डांबून ठेवण्यात आले, त्यांचा छळ करण्यात आला आणि मोबदला न देता काम करण्यास भाग पाडण्यात आले. कायद्याने बंदी घातलेल्या वेठबिगारीची उत्तर प्रदेशातील ही कहाणी.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
20 तास काम
जनावरांचं खाद्य अन् मृत्यू
'या' 12 कामगारांसोबत मालकाने काय केलं?
Crime News : एका कारखान्यातून अल्पवयीन मुलांसह 12 मजुरांची पोलिसांनी यशस्वी सुटका केली आहे. या मजुरांना गेल्या अनेक महिन्यांपासून डांबून ठेवून, दिवसातून तब्बल 20-20 तास काम करण्यास भाग पाडले जात होते. इतकेच नव्हे तर त्यांना प्रचंड मारहाण करून गुरांच्या खाद्यापासून (कोंड्यापासून) बनवलेल्या सुक्या भाकरी खायला देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या नरकयातनेतून एका मजुराने कसाबसा स्वतःचा जीव वाचवून पळ काढला आणि पोलिस स्टेशन गाठले. त्याच्या तक्रारीनंतर पोलिस आणि कामगार विभागाने तात्काळ कारखान्यावर छापा टाकून या 12 मजुरांची सुटका केली. सुटकेनंतर पोलिसांनी सर्वप्रथम भावूक झालेल्या या मजुरांना पोलिस ठाण्यात जेवण दिले. या प्रकरणी कारखान्याचा सुपरवायझर शिवा त्यागी याला अटक करण्यात आली असून, मुख्य मालक अंकित बालियान सध्या फरार आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील ही घटना आहे. वेठबिगारीच्या या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. भारतात 1976 मध्ये कायदा करुन वेठबिगारीवर बंदी घालण्यात आली आहे.
मजुराचा छळ करून खून
या प्रकरणात आणखी एक थरकाप उडवणारा खुलासा मजुरांनी केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर (2025) मध्ये अर्जुन ऊर्फ 'टोपी' नावाच्या एका नेपाळी मजुराचा कारखान्यात अमानुष छळ करून खून करण्यात आला होता, असा आरोप मजुरांनी केला आहे. त्याचा मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह एका गोणीत भरून गायब करण्यात आला. या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी आता या प्रकरणात हत्येचा नवा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मजुरांनी सांगितले की, कारखान्यात भीतीचे वातावरण तयार करण्यासाठी मालक भिंतीवर पिस्तुलमधून गोळ्या झाडायचा आणि 'कोणाला काही सांगितले तर तुमचीही हिच अवस्था करू' अशी धमकी द्यायचा.
हे ही वाचा : 40 दिवसांपूर्वी लग्न, नवविवाहितेचा भयंकर शेवट, नेमकं काय घडलं?
नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक
सुटका करण्यात आलेल्या मजुरांनी सांगितले की, त्यांना रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवरून गाठण्यात आले होते. दरमहा 12,000 ते 15,000 रुपये पगार, राहण्याची-खाण्याची सोय आणि फक्त 8 तास काम करण्याचे आमिष दाखवून त्यांना येथे आणले गेले. मात्र, कारखान्यात पाऊल ठेवताच दुसऱ्याच दिवसापासून त्यांचे मोबाईल आणि ओळखपत्रे काढून घेण्यात आली. त्यांना मुख्य दरवाजाला कुलूप लावून आतमध्ये कैद करण्यात आले. एका मजुराने सांगितले की, त्यांचे काम पहाटे 4 वाजल्यापासून सुरू व्हायचे ते थेट मध्यरात्रीपर्यंत चालायचे. दिवसातून जेमतेम 2 ते 3 तास झोप मिळायची. कोणी आजारी पडले तरी सुट्टी दिली जात नव्हती.









