अशोक चव्हाण ते मिलिंद देवरा.., दिग्गजांना जाऊ दिलं, मग बोंद्रेंना का रोखलं? Inside स्टोरी

मुंबई तक

25 Sep 2026 (अपडेटेड: 25 Sep 2026, 01:04 PM)

Rahul Bondre : चिखलीचे माजी काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र राहुल गांधींच्या फोननंतर त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय बदलला. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घेऊयात..

rahul bondre

rahul bondre

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अशोक चव्हाण ते मिलिंद देवरा.., दिग्गजांना जाऊ दिलं, मग बोंद्रेंना का रोखलं? Inside स्टोरी

point

श्वेता महाले स्थानिक आमदार असतानाही भाजपला बोंद्रे का हवे होते? 

Rahul Bondre : बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका कॉलमुळे ऐनवेळी ब्रेक लागलाय. चिखलीचे दोन वेळचे काँग्रेस आमदार राहिलेले राहुल बोंद्रे 22 सप्टेंबरला मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची तयारी सुरू होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार होता. भाजपकडूनही यासाठी तयारी करण्यात आली होती. बोंद्रे यांनी स्वतः सोशल मीडियावर भाजपमध्ये जाण्याची माहिती दिली होती. त्यामुळे बुलढाण्यातून मुंबईकडे जाण्यासाठी कार्यकर्त्यांची तयारी सुरू झाली होती. मात्र, प्रवेशाच्या आदल्या रात्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांच्यात फोनवरून संवाद झाला. या संवादानंतर बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय बदलला.

हे वाचलं का?

श्वेता महाले स्थानिक आमदार असतानाही भाजपला बोंद्रे का हवे होते? 

मग राहुल गांधींच्या एका फोन कॉलनंतर राहुल बोंद्रे यांनी पक्षांतराचा निर्णय का बदलला? राहुल गांधींनी अशोक चव्हाणांना जाऊ दिलं, मिलिंद देवरा यांनाही रोखलं नाही, मग बोंद्रेंसाठी त्यांनी इतकी प्रतिष्ठा का पणाला लावली? श्वेता महाले स्थानिक आमदार असतानाही भाजपला बोंद्रे का हवे होते? याचीच इनसाइड स्टोरी समजून घेऊया. या सगळ्या व्हायरल व्हिडिओ कॉल स्टोरीची सुरुवात 21 सप्टेंबरच्या रात्री उशिरा झाली. या घडामोडींशी संबंधित काँग्रेस नेत्यांच्या मते, मुंबईतील भाजप कार्यालयात राहुल बोंद्रेंच्या प्रवेशाची जय्यत तयारी सुरू होती. त्याचवेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत राहुल गांधींशी संपर्क साधला. सपकाळ यांनी संपूर्ण परिस्थिती राहुल गांधींना सांगितली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येताच राहुल गांधींनी क्षणाचाही विलंब न लावता राहुल बोंद्रेंशी कॉन्फरन्स कॉलवर थेट संवाद साधला. फोनवर राहुल गांधींचं पहिलं वाक्य होतं, “घबराना नहीं है, प्रेशर में मत आओ, गलती मत कर जाना. आप काँग्रेस पार्टी के लॉयल आदमी हो. ये आप पर सायकॉलॉजिकल प्रेशर डाल रहे हैं, क्योंकि ये चाहते हैं कि आप भाग जाओ और यहां कॉम्पिटिशन खत्म हो जाए.” राहुल गांधींनी पुढे सल्ला दिला, “एक बात समझ लो, हार के बिना जीत नहीं होती. हार तो जीत का फाउंडेशन है.”

राहुल गांधींचे हे शब्द ऐकताच राहुल बोंद्रे कॅमेऱ्यासमोरच भावूक झाले. डोळ्यांत अश्रू आणून त्यांनी उत्तर दिलं, “भैया, आपका फोन आया, मेरे लिए यही बहुत बड़ी बात है. आप मेरा सब कुछ चला जाए तो भी चलेगा, लेकिन आपकी इस लड़ाई में आखिरी सांस तक आपके साथ रहूंगा.” कॉल संपला, व्हिडिओ व्हायरल झाला आणि चिखलीतलं राजकीय गणित 180 अंशात फिरलं. मुंबईला निघणाऱ्या कार्यकर्त्यांचे जत्थे चिखलीतच थांबले आणि बोंद्रेंनी आपला भाजप प्रवेश रद्द केला.

राहुल बोंद्रे नेमके कोण आहेत?

मग भाजपला हवे असणारे हे राहुल बोंद्रे नेमके कोण आहेत? त्यांचा राजकीय इतिहास काय आहे? राहुल बोंद्रे हे बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे दोन वेळा आमदार राहिले आहेत. या मतदारसंघातून 2009 आणि 2014 मध्ये ते सलग दोनदा काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. म्हणजेच वयाच्या तिशीतच ते आमदार झाले होते. तरुण आमदार म्हणून तेव्हा ते चर्चेतही आले होते. त्याचबरोबर त्यांचं बोंद्रे कुटुंब काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ म्हणून ओळखलं जातं. त्यांचे वडील सिद्धविनायक ऊर्फ तात्यासाहेब बोंद्रे यांचा चिखली परिसरात मोठा प्रभाव राहिला. तात्यासाहेब हे पंढरीनाथ पाटील यांचे पट्टशिष्य म्हणून ओळखले जायचे. पंढरीनाथ पाटील म्हणजे क्रांतिज्योती महात्मा फुलेंचे आद्य चरित्रकार आणि ‘दलित मित्र’ अशी त्यांची ओळख होती. तात्यासाहेब अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य होते. त्यांनी या संस्थेसाठी चिखलीत त्याकाळी जवळपास 15 एकर जमीन दान दिली होती. चिखलीत त्यांच्याकडे मोठी जमीनही आहे. बोंद्रे कुटुंब हे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख लिंगायत चेहऱ्यांपैकी एक मानलं जातं. चिखलीत त्यांचं चांगलं राजकीय प्रस्थ आणि कार्यकर्त्यांचं जाळं आहे. याच बळावर राहुल बोंद्रे यांनी दोन वेळा आमदार होण्याची कामगिरी केली. मात्र 2019 च्या निवडणुकीत त्यांचा 6,810 मतांनी, तर 2024 च्या निवडणुकीत अवघ्या 3,201 मतांनी निसटता पराभव झाला. भाजपच्या नवख्या उमेदवार श्वेता महाले यांच्याकडून झालेला हा पराभव बोंद्रेंच्या जिव्हारी लागला होता.

मग विरोधात भाजपचा आमदार असतानाही बोंद्रे भाजपमध्ये का जात होते? राजकारणासोबतच बोंद्रे अनेक पतसंस्था, साखर कारखाने आणि अनुराधा कॉलेजसारख्या शिक्षण संस्थांशी जोडले गेले आहेत. त्यांच्या शिक्षण संस्था, पतसंस्था आणि साखर कारखाने आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या या संस्थांवर वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांच्या चौकशा आणि नोटिसांचा भडिमार सुरू होता, असं माध्यमांमधील बातम्यांमधून स्पष्ट होतं. त्यांच्यावर प्रशासकीय दबाव आणला जात असल्याचंही सांगितलं जात होतं. दुसरीकडे, चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले हे मुख्यमंत्री कार्यालयात, म्हणजेच सीएमओमध्ये वरिष्ठ अधिकारी आहेत. ते देवेंद्र फडणवीस यांच्या नजीकचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.  सरकारी अधिकारी असूनही विद्याधर महाले हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा प्रचार करत असल्याचा थेट आरोप बोंद्रे यांनी केला होता. त्यामुळे चिखलीतील 3,000 मतांची चुरशीची स्पर्धा कायमची संपवायची होती, असं चिखलीतील स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे.

राहुल बोंद्रेंना रोखण्यामागची 5 मोठी कारणे

आता मुद्दा येतो, अशोक चव्हाणांना जाऊ दिलं, मग बोंद्रेंनाच का रोखलं? अशोक चव्हाणांसारखे माजी मुख्यमंत्री पक्ष सोडताना राहुल गांधी गप्प राहिले, मग राहुल बोंद्रेंसाठी ते इतके आक्रमक का झाले? यामागे पाच प्रमुख कारणं सांगितली जात आहेत. पहिलं कारण म्हणजे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं होमग्राउंड वाचवणं. बुलढाणा हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जिल्हा आहे. सपकाळ आणि बोंद्रे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. स्वतः प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातून एवढा मोठा नेता पक्षातून बाहेर पडला असता, तर सपकाळ यांच्या नेतृत्वावर पक्षातूनच टीका झाली असती. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेला जिल्ह्यातच मोठा धक्का बसला असता. विशेष म्हणजे सपकाळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट राजकीय हल्ले चढवतात. त्यामुळे भाजपला बोंद्रे हवे होते, तर सपकाळांसाठी बोंद्रे यांचं काँग्रेस सोडणं प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारं ठरलं असतं. त्यामुळेच स्वतः प्रदेशाध्यक्षांनी बोंद्रेंना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि राहुल गांधींना हा संपूर्ण मुद्दा पटवून दिला.

दुसरं कारण म्हणजे भाजपचा ‘झिरो कॉम्पिटिशन’ फॉर्म्युला उधळून लावणं. भाजपने विरोधकांमधील तगडे स्थानिक नेते पक्षात घेऊन त्या मतदारसंघातील स्पर्धा संपवण्याचा फॉर्म्युला राबवायला सुरुवात केली असल्याचं काँग्रेसकडून सांगितलं जातं. राहुल गांधींनीही हा मुद्दा ओळखला आणि कॉन्फरन्स कॉलमध्ये बोंद्रेंना तोच संदेश दिला. त्यामुळे भाजपचा हा प्लॅन राहुल गांधींच्या एका फोन कॉलनं उधळून लावला गेला.

तिसरं कारण म्हणजे लिंगायत समुदाय आणि संस्थात्मक जनाधार. बुलढाण्यात बोंद्रेंचा मोठा सामाजिक आणि संस्थात्मक बेस आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं कुटुंब भाजपमध्ये गेलं. कोल्हापूर आणि सोलापूरमधील महत्त्वाची लिंगायत नेतेमंडळीही काँग्रेसमधून बाहेर पडली किंवा सध्या निष्क्रिय झाली आहेत. त्यामुळे लिंगायत समाजाचा हा पारंपरिक चेहरा गमावणं काँग्रेसच्या ग्राउंड बेससाठी धोक्याचं ठरू शकत होतं.

चौथं कारण म्हणजे चिखलीतील महायुतीचं स्थानिक गणित. बोंद्रे भाजपमध्ये गेले असते, तर चिखलीतील भाजपविरोधी मतपेटी थेट भाजपच्या स्थानिक मित्रपक्षाकडे, म्हणजेच शिवसेनेकडे, सरकण्याची शक्यता होती. आमदार संजय गायकवाड हे आपले पुत्र कुणाल गायकवाड यांना चिखलीतून पुढे करत असून त्यांना निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे काँग्रेसने ही जागा आणि आपला जनाधार स्वतःकडेच ठेवणं रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं.

आणि शेवटचं, सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राहुल गांधींची नवी लढाऊ रणनीती. राहुल गांधी आता राजकीयदृष्ट्या अधिक सक्रिय दिसत आहेत. दबावाखाली असलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी हायकमांड उभं राहतं, असा संदेश या घटनेतून देण्यात आल्याचं सांगितलं जातं. हा संदेश देण्यासाठीच या फोन कॉलचं रेकॉर्डिंग पक्षाकडून सोशल मीडियावर जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आलं, असा दावा केला जातो.

हा नियोजित प्रवेश फसल्यानंतर भाजपकडूनही तिखट प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. भाजप आमदार श्वेता महाले यांनी बोंद्रे यांच्यावर टीका करत ते मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं म्हटलं. भाजप कार्यालयाने मात्र या प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत प्रेस नोट काढली नव्हती. बोंद्रे हे स्वतःच्या संस्था वाचवण्यासाठी आणि बीएएमएस, ॲग्रीकल्चर कॉलेजच्या परवानगीसाठी गेल्या महिनाभरापासून भाजप नेत्यांचे उंबरठे झिजवत होते, असा दावाही महाले यांनी केला.

या सगळ्यातून एक संदेश समोर येतो. एका फोन कॉलनं केवळ राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रोखला गेला नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपच्या दबावतंत्राला उत्तर देणारा एक नवा पॅटर्न काँग्रेसने तयार केला आहे, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे. ‘जाणाऱ्यांना जाऊ द्या’ हे काँग्रेसचं जुनं धोरण बदलून आता हायकमांड थेट मैदानात उतरत असल्याचं या घटनेतून दिसून आलं. त्याचवेळी बोंद्रे यांनी दोन दिवस आधीच भाजपमध्ये जाणार असल्याचं जाहीर केल्यामुळे काँग्रेसला सावध होण्यासाठी वेळ मिळाला आणि त्यातून काँग्रेस नेतृत्वही सावध झाल्याचं या फोन कॉलवरून दिसतं.