Rahul Gandhi Press Conference, नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि कथित मतचोरीच्या मुद्द्यावरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदी हे ज्ञानेश कुमार यांना संरक्षण देत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. सरकारने त्यांना संरक्षण देणे सुरूच ठेवल्यास आम्ही त्यांच्या नियंत्रणकर्त्यांपर्यंत पोहोचू, असे ते म्हणाले. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ADVERTISEMENT
हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेत्री, लावणीसम्राज्ञी मधू कांबीकर यांचं पुण्यात निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा!
दिल्लीला किल्ल्याचे स्वरूप देण्यात आले - राहुल गांधी
दिल्लीमध्ये आंदोलनासाठी येणाऱ्या लोकांना रोखले जात असून रेल्वे आणि बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही अडवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. दिल्लीला किल्ल्याचे स्वरूप देण्यात आले असून मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले. मात्र, सरकारच्या या कृतीमुळे आंदोलनाचा मुद्दा देशातील जनतेपर्यंत पोहोचत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.
महिला आंदोलकांना भाजप आणि RSS चे लोक मारहाण करत असल्याचा आरोप
पोलीस दलातील कर्मचारीही सध्याच्या परिस्थितीमुळे अस्वस्थ असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. भारतीय तरुणांना मारहाण करण्यास सांगितले जात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना मोकळे सोडले जात असल्याचे प्रश्न पोलीस दलात उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. गृह मंत्रालय, दिल्ली पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि भारत-तिबेट सीमा पोलीस दलामध्ये याबाबत चर्चा होत असल्याचा दावा त्यांनी केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक महिलांना मारहाण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सुमारे 50 टक्के पोलीस कर्मचारी आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेला योग्य मानत असल्याचे आपल्याला सांगितले जात असल्याचे राहुल गांधी यांनी नमूद केले. पोलीस, सुरक्षा दल, जनता आणि विरोधी पक्ष एका बाजूला, तर नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार दुसऱ्या बाजूला असल्याचे चित्र निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. या परिस्थितीमुळे सरकारवरील दबाव वाढत असल्याचा दावाही त्यांनी केला.
ज्ञानेश कुमारांचे अनेक मेसेज येतात - राहुल गांधी
दरम्यान, यावेळी ज्ञानेश कुमार तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात का? असा सवाल पत्रकारांनी राहुल गांधींना केला होता. या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, "मला मेसेज येतात. ते ही पत्रकार परिषद पाहात आहे. तुम्ही गुन्हा केलाय हे मान्य करा. तुम्ही मुख्य गुन्हेगार नाहीत. तुम्ही चुका केल्या आहेत. तुम्ही मुख्य सुत्रधार नाहीत. ते तुमच्यासाठी सोपे आहे. तुम्ही राजीनामा द्या आणि बाजूला व्हा. तुमच्यावर मोदी, शाह आणि अदाणींचा दबाव आहे. हे आम्हाला माहिती आहे. आम्ही संविधानाचं संरक्षण करत राहू"
आंदोलनकर्त्यांना विविध ठिकाणी रोखण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. सुरुवातीला आंदोलनासाठी गेलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी अडवले आणि बसमध्ये बसवून नेले. त्यानंतर दिल्लीत आंदोलन करण्यासाठी दुसरी जागा देण्याची मागणी करण्यात आली, मात्र ती मान्य झाली नाही, असे त्यांनी सांगितले. जंतरमंतर येथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असतानाही अडवण्यात आले आणि आंदोलकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. राजघाट येथे झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनाही मारहाण झाल्याचे ते म्हणाले. या घटनांचा उल्लेख करत त्यांनी लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी लढा सुरूच ठेवण्याचे आवाहन केले. हा संघर्ष केवळ काही दिवसांचा नसून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विरोधाचे सध्याचे स्वरूप असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानेश कुमार यांना थेट उद्देशून राहुल गांधी म्हणाले की, लाखो लोक त्यांच्या वर्तनाबाबत प्रश्न विचारत आहेत आणि हे प्रश्न थांबणार नाहीत. त्यांनी निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा देऊन बाजूला व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्य न्यायमूर्तींनी याचिका दाखल करण्याचा मार्ग सांगितल्याचे नमूद करत राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीचे नेते सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. निवडणूक व्यवस्थेत सुधारणा होईपर्यंत, संविधानाचे रक्षण होईपर्यंत आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हा संघर्ष कोणत्याही एका नेत्याचा किंवा पक्षाचा नसून देशातील जनतेच्या आवाजाचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या हक्कांचा असल्याचे राहुल गांधी म्हणाले. नागरिकांनी आपापल्या परीने या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि संविधानाच्या रक्षणासाठी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ADVERTISEMENT












