पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोणत्याही राजकीय भाषणापेक्षा विद्यार्थ्यांच्या संतापात सहभागी होण्यासाठी आपण आलो असल्याचं सांगत ‘तुम्हाला आलेला राग तात्पुरता असू नये’, असं आवाहन केलं. सरकारी धोरणांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
‘तुमच्या रागात सहभागी व्हायला आलोय’
राज ठाकरे म्हणाले की, “मी आज जो आलोय, तो फक्त तुमच्या रागात सामील व्हायला आलोय.” विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेला संताप केवळ आंदोलनापुरता मर्यादित राहू नये, तर त्यातून सरकारवर दबाव निर्माण झाला पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारी फसवणुकीमुळे आयुष्यातील उमेदीचा काळ कसा जातो, हे आपल्यापेक्षा चांगलं कोणी सांगू शकणार नाही, असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांच्या संघर्षाशी आपला अनुभव जोडला.
‘तुमच्याकडे पेपर फुटतायत, आमच्याकडे मतं फुटतायत’
राज ठाकरे यांनी पेपरफुटी आणि निवडणुकीतील कथित गैरप्रकारांची तुलना करत “तुमच्याकडे पेपर फुटतायत, आमच्याकडे मतं फुटतायत. बळी दोघं जातो आहोत,” असं वक्तव्य केलं.
हे ही वाचा>> .. तर मी कोणाचेही पाय धरायला तयार - राज ठाकरे
एखादं प्रकरण पुढे ढकललं गेलं की विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक-एक वर्ष निघून जातं. निवडणुकांच्या बाबतीतही पाच-पाच वर्षांचा कालावधी निघून जातो, असं त्यांनी म्हटलं.
‘रोज भाषणं ऐकून आयुष्य घालवू नका’
आंदोलनस्थळी दररोज वेगवेगळे नेते येतील, भाषणं करतील आणि विद्यार्थी टाळ्या वाजवतील; मात्र केवळ यामध्ये आयुष्य घालवू नका, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.
“माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. जे आयुष्य आहे ते हेच आहे,” असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेची आणि भवितव्याची जाणीव ठेवण्याचं आवाहन केलं.
जात-धर्माच्या मुद्द्यांमध्ये अडकू नका
राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना जात आणि धर्माच्या राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. रोजच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी अशा मुद्द्यांमध्ये तरुणांना अडकवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
हे ही वाचा>> सिंगर रॉकसनने शब्दांनी MPSC चं आंदोलन गाजवलं.. व्हायरल भाषण
कर्ज काढून, आई-वडिलांनी पैसे खर्च करून अनेक विद्यार्थी पुण्यात अभ्यासासाठी आले आहेत. अशा परिस्थितीत वर्षानुवर्षे परीक्षा, निकाल आणि भरतीच्या प्रक्रियेत वेळ जात असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
‘70 हजार भरती होणार नाही, हे आताच लक्षात ठेवा’
आंदोलनातील 70 हजार पदांच्या भरतीच्या मागणीवरही राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना वास्तवाची जाणीव करून दिली. ही मागणी पूर्ण होईलच असं नाही, असं स्पष्ट सांगत त्यांनी सरकार कोणतंही असलं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होण्याची शक्यता वास्तववादी पद्धतीने तपासण्याची गरज असल्याचं म्हटलं.
मात्र याचा अर्थ नोकऱ्यांची मागणी सोडायची असा नाही. “नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
‘मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत’
महाराष्ट्रातील नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी मराठी तरुणांना मिळाल्या पाहिजेत, ही भूमिका आपण गेल्या अनेक वर्षांपासून मांडत असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी होत असताना खासगी क्षेत्राचं महत्त्व वाढत आहे. मात्र खासगी क्षेत्रात सरकारी नोकऱ्यांप्रमाणे आरक्षणाची व्यवस्था नसल्याने केवळ आरक्षणाच्या मागणीने रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
‘मराठी तरुणांसाठी पाय धरावे लागले तरी तयार’
मराठी मुला-मुलींना नोकऱ्या मिळण्यासाठी “राज ठाकरेंना कोणाचेही पाय धरायला लागले तर राज ठाकरे धरायला तयार आहे,” असं म्हणत त्यांनी रोजगाराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली.
विद्यार्थ्यांनी भलत्या अपेक्षा किंवा स्वप्नांमध्ये न राहता परिस्थिती समजून घ्यावी आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवावी, असंही त्यांनी सांगितलं.
सरकारवर दबाव वाढवण्याचं आवाहन
विद्यार्थ्यांचा दबाव सरकारला जाणवला पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नांवर तातडीने पावलं उचलली पाहिजेत, असं राज ठाकरे म्हणाले. आपण आज इथे राजकारण करण्यासाठी आलो नसून विद्यार्थ्यांच्या प्रश्नाशी एकरूप होण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राज ठाकरेंच्या भेटीमुळे आता या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळण्याबरोबरच रोजगार, पेपरफुटी आणि सरकारी भरतीच्या प्रश्नावर सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT












