मुंबई: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (कॅप्टन खरात) याच्या बलात्कार व लैंगिक शोषण प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी काल (20 मार्च) सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत काही फोटो दाखवले होते. त्याच दिवशी रात्री उशिरा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेल्या रूपाली निलेश चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारेंच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT
'त्या' फोटोंबाबत रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण
राजीनामा दिल्यानंतर रात्री उशिरा माध्यमांशी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, “काही जणांनी सातत्याने पत्रकार परिषद घेऊन चुकीच्या बातम्या पसरविण्याचा प्रयत्न केला. कुणीतरी आजच्या बातमीत दाखवलं. 2 सप्टेंबरचा फोटो आहे. खरं म्हणजे हा माझा फोटो आहे 12 सप्टेंबरचा आहे. यापुढची 1 तारीख खोडली आणि 2 सप्टेंबरचा असल्याचं दाखवलं. त्यादिवशी अमावस्या, पौर्णिमा आहे असं काही तरी दाखवलं. माझ्या आजही अकाउंटवर गेलात तर आहेत असे फोटो आहेत. ते २ सप्टेंबरचे नाहीत. तर 12 सप्टेंबरचे आहेत.”
हे ही वाचा>> रुपाली चाकणकरांनी राजीनाम्याचं कारण काय दिलंय माहितीए?, 'ते' पत्र जसंच्या तसं...
“2 सप्टेंबरला आम्ही अजितदादांच्या कार्यक्रमात होतो. या फोटोमध्ये माझ्या हाताला कुठेही जखम नाही. हा 3-4 सप्टेंबरचा फोटो आहे. त्यातही कुठेच हाताला जखम नाही. आणि हा 5 सप्टेंबरचा फोटो आहे त्यातही हाताला जखम नाही. कुठला दिवस होता काय दिवस होता.. कोणता विधी होता माहीत नाही. आणि हा 6 सप्टेंबरचा फोटो आहे त्यातही हाताला जखम नाही.”
“त्यामुळे कायद्याच्या चौकटीतून आम्ही या सगळ्यांना नोटीसा पाठवूच. चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका-टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या पसरवणं. या सगळ्याबाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेन.” असं रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.
हे ही वाचा>> NCP च्या आणखी एका नेत्याची विकेट, खरातची साथ सोबत भोवली... रुपाली चाकणकरांनी अखेर दिला राजीनामा
रूपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी भेट घेऊन वैयक्तिक कारणास्तव राजीनामा पत्र सादर केले. पत्रात त्यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या नियुक्तीचा उल्लेख करत “स्वेच्छेने”आता हे पद सोडल्याचे म्हटले आहे.
सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांवर नेमके काय आरोप केलेले?
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. चाकणकर या स्वतः तंत्र-मंत्र आणि अघोरी विद्या करत असल्याचा खळबळजनक दावा अंधारे यांनी यावेळी केला होता. ही माहिती नाशिक प्रकरणातील एका पीडितेनेही सांगितल्याचं त्या म्हणाल्या होत्या.
यशप्राप्तीसाठी आणि वशीकरणासाठी तंत्रमंत्र विद्येमध्ये अनामिका कापली जाते. रुपाली चाकणकर यांनी स्वतःच्या हाताची अनामिका कापली होती, असे अंधारे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी चाकणकर यांच्या हातावरील जखमांचे आणि बँडेजचे काही फोटोही माध्यमांसमोर सादर केले होते आणि हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन असल्याचा दावा केला होता.
या तंत्र-मंत्र विद्येबाबत अधिक माहिती देताना अंधारे यांनी तारखांचा संदर्भ दिला होता. 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या होती आणि याच काळात ही अघोरी विद्या करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केलेला. या तारखेनंतरच्या अनेक फोटोंमध्ये चाकणकर यांच्या बोटावर बँडेज दिसत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. मंत्रोच्चाराद्वारे एखाद्याला आकर्षित करून यश मिळवणे हा या विद्येचा उद्देश असतो, असे सांगत त्यांनी चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.
ADVERTISEMENT











