NCP च्या आणखी एका नेत्याची विकेट, खरातची साथ सोबत भोवली... रुपाली चाकणकरांनी अखेर दिला राजीनामा
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अखेर आपला पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन आपला राजीनामा सोपवला.
ADVERTISEMENT

मुंबई: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (कॅप्टन खरात) याच्या बलात्कार व लैंगिक शोषण प्रकरणातून निर्माण झालेल्या प्रचंड राजकीय दबाव आणि सार्वजनिक संतापानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज (20 मार्च 2026) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे शासकीय निवासस्थान 'देवगिरी' येथे भेट घेऊन आपलं राजीनामा पत्र सोपवले.
रुपाली चाकणकरांना द्यावा लागला राजीनामा
अशोक खरात सोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर रूपाली चाकणकर यांच्यावर चौफर टीका होऊ लागली होती. त्यातच विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर दुसरीकडे काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकरांना थेट राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. ज्यानंतर घडामोडींना प्रचंड वेग आला.
हे ही वाचा>> मोठे-मोठ्या नेत्यांचे भविष्य सांगणाऱ्या 'ज्योतिषी'ला नाही कळली स्वतःचीच कुंडली, नेमका कसा झाला अशोक खरातचा गेम?
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांनी देवगिरी निवासस्थानी पोहोचून सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीत राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पद सोडण्याचं पत्र सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केलं. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आणि पक्षातील अंतर्गत चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
रुपाली चाकणकरांचा राजीनामा जसाच्या तसा...
मी. सौ. रुपाली निलेश चाकणकर, वरील विषयान्वये आपणांस विनंतीपूर्वक कळवू इच्छिते की, 15 ऑक्टोबर 2024 रोजी माझी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा ह्या पत्राद्वारे आपणांस सादर करत आहे.
आजवर माझ्यावर विश्वास दाखवून आपण मला सर्वतोपरी सहकार्य केले त्याबद्दल मी आपली व सर्व सहकाऱ्यांची शतश: ऋणी आहे. भविष्यातही आपले असेच सहकार्य राहील असा मला विश्वास आहे.
तरी आपण माझा अध्यक्षा, राज्य महिला आयोग ह्या पदाचा राजीनामा स्वीकारावा अशी आपणांस नम्र विनंती आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
नाशिक क्राइम ब्रांचने अशोक खरात याला बलात्कार, फसवणूक आणि महिलांचा लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक केली. खरात याच्या कार्यालयातून 58 आक्षेपार्ह व्हिडीओ जप्त झाले असून, SIT (विशेष तपास पथक) तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओत रूपाली चाकणकर यांनी खरात यांच्या पाद्यपूजा केल्याचे, छत्री धरल्याचे आणि विविध कार्यक्रमात एकत्र दिसल्याचे दिसते. खरात यांच्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टमध्ये चाकणकर विश्वस्त होत्या. या सगळ्या गोष्टींमुळे रुपाली चाकणकर या विरोधकांच्या निशाण्यावर आल्या होत्या. अखेर आज त्यांना आपलं पदही गमवावं लागलं.










