Sanjay Raut : 'आज तिथे अजून शंभरेक गुंड येतील', शिंदेंबद्दल राऊत काय बोलून गेले?

विक्रांत चौहान

09 Feb 2024 (अपडेटेड: 09 Feb 2024, 04:10 PM)

Sanjay Raut Vs Eknath Shinde : अभिषेक घोसाळीकर यांच्या हत्येनंतर संजय राऊतांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी केली.

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर संजय राऊत एकनाथ शिंदेंना काय म्हणाले?

sanjay Raut hits out at Eknath shinde after Abhishek Ghosalkar murder

follow google news

Sanjay Raut On Eknath Shinde : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खापर फोडत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. 

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे, शिंदेंचे आमदार यांचे गुंडांशी संबंध असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी केलीये. 

संजय राऊतांचा घणाघात... शिंदे फडणवीसांबरोबर मोदी-शाहांवर 'वार'

खासदार राऊत म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे, स्वागताचे बोर्ड कोण लावतंय, तर हे गुंड आणि माफिया लावताहेत. अनेक कंत्राट आणि सरकारी काम ही गुंडांना दिली जात आहेत. ८ हजार कोटींचं रुग्णवाहिका कंत्राट हे कुणाला मिळालंय आणि त्यामध्ये किती माफिया सहभागी आहेत, हे लवकरच बाहेर येईल. त्यांना हे काम देण्यासाठी बाळराजेंकडून (श्रीकांत शिंदे) दबाव आला होता." 

"शिंदेंच्या टोळीमध्ये गुंड आणि पोलीस एकत्र आहेत. मुंबई-ठाण्यासह अनेक ठिकाणी ज्या पोलिसांच्या नेमणुका केल्या आहेत, ते सगळे शिंदे सेनेचे सदस्य आहेत. शिंदे गँगचे सदस्य आहेत. त्यांचा हिशोब २०२४ च्या निवडणुकांनतर केला जाईल. त्यांची यादी तयार आहे", असा इशारा संजय राऊत यांनी पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना नाव न घेता दिला. 

"एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेंची ताबडतोब चौकशी करायला पाहिजे होती"

याच मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "कल्याण गणपत गायकवाडांनी गोळीबार केला. त्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाचं नाव आलेलं आहे. पोलिसांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाची ताबडतोब चौकशी करायला पाहिजे होती. इतर ठिकाणी असा गुन्हा झाला असता आणि कुणाचं नाव जरी आलं असतं, तरी पोलिसांनी जबाब नोंदवून एफआयआर दाखल केला असता." 

"गणपत गायकवाड हे सांगताहेत की मी एकनाथ शिंदेंमुळे गोळीबार केला आणि त्यांच्याकडे कोट्यवधी रुपये पडलेले आहेत. तरीही राज्यातील कायदा आणि पोलीस त्यांच्यावर कारवाई करायला तयार नाही, कारण ते मुख्यमंत्री आहेत", असा संताप राऊतांनी व्यक्त केला.  

फडणवीस चाय पे चर्चा करताहेत -संजय राऊत

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, "झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेची योजना सुरू आहे. पण, महाराष्ट्रात गुंडांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारला जात नाही, हे दुर्दैवी आहे."

"या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठे आहेत. अदृश्य आहेत. गृहमंत्री विदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांना घेऊन चाय पे चर्चा करत शेताशेतात फिरत आहेत. मग महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कोण करणार?", असा सवाल राऊतांनी केला. 

"वर्षा बंगल्यावर, मंत्रालयात गुंडांबरोबर चर्चा होतेय, हे गृहमंत्र्यांना माहितीये का? ठिकठिकाणी शिंदे गँगचे आमदार-खासदार गुंडांबरोबर चर्चा करताहेत. अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आमची मागणी आहे फडणवीसांकडे... तुम्ही अपयशी गृहमंत्री आहात. तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात. तुम्हाला शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी, त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी आणि त्यांचा छळ करण्यासाठी गृहमंत्री पद दिले आहे. महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागत आहे." 

"हे अपयश सगळ्यात आधी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं आहे. त्यांनी अशा प्रकारचं माफिया राज महाराष्ट्रावर लादलंय. हे अपयश घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं, गृहमंत्री फडणवीसांचं आहे. मोदी आणि शाह हे या राज्याचे गुन्हेगार आहेत. त्यांनी हे सरकार आमच्यावर लादलं आहे. या मुख्यमंत्र्यांना काढून इथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे", अशी मोठी मागणी राऊतांनी केली.

    follow whatsapp