‘सावरकरांच्या आडून अडाणी गौरव यात्रा’, संजय राऊत शिंदेंसह भाजपवर बरसले

मुंबई तक

28 Mar 2023 (अपडेटेड: 28 Mar 2023, 05:48 AM)

sanjay Raut Slams eknath Shinde and bjp over savarkar gaurav yatra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना महाराष्ट्रात ठिकठिकाणी सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली. त्यावरून खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकास्त्र डागलं.

sanjay Raut On savarkar gaurav yatra, Slams eknath Shinde and bjp

sanjay Raut On savarkar gaurav yatra, Slams eknath Shinde and bjp

follow google news

sanjay Raut Reaction on savarkar gaurav yatra : ही सावरकरांच्या मुखवट्या आडून अडाणी गौरव यात्रा आहे, असं म्हणत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेल्या सावरकर गौरव यात्रेवर टीका केली आहे. आमचं हिंदुत्व सावरकरांप्रमाणेच शेंडी जानव्याचे नसून, विज्ञानवादी आहे. ते भाजपला मान्य आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी भाजपला केला.

हे वाचलं का?

सावरकर गौरव यात्रेवर संजय राऊत म्हणाले, “हे ढोंग आहे. मूळात सावरकरांचा आणि आरएसएस, भाजपचा काही संबंध नव्हता. संघ परिवाराने सावरकरांना कायम आपलं शत्रू मानलं आणि वाळीत टाकलं. ते मूद्दाम ढोंग करत आहेत. मुख्यमंत्री सावरकर गौरव यात्रेची घोषणा करताना सावरकरांबद्दल दोन वाक्ये उत्स्फूर्तपणे बोलू शकत नव्हते. सावरकरांवरचा एक कागद समोर होता, तो वाचून दाखवत होते. ते मुख्यमंत्र्यांना विचारतात वाचू का? यालाच गुलामी म्हणतात. याच गुलामीविरुद्ध सावरकरांनी आपलं अख्खं आयुष्य अंदमानात घालवलं”, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – मणिशंकरांच्या पुतळ्याला जोडे अन् बाळासाहेब… CM शिंदेंनी दिली आठवण

“सावरकर गौरव यात्रा हे नाव असलं, तरी ते अडाणी बचाव यात्रा आहे. गौतम अडाणीच्या प्रकरणावरचं, त्यांच्या लूटमारीवरचं महाराष्ट्राचं लक्ष विचलित व्हावं म्हणून सावरकरांच्या मुखवट्याखाली हे अडाणी गौरव यात्रा काढत आहेत. वीर सावरकर हे क्रांतिकारक, समाजसुधारक होते. आमच्या शिवसेनेला त्यांच्याविषयी आदर आहे. आम्हाला या ढोंग्यांनी सावरकर सांगण्याच्या प्रयत्न करू नये. आम्ही सावरकर जगलोय आणि जगतोय”, असं राऊत यावेळी म्हणाले.

हेही वाचा – सावरकरांवरुन राजकारण तापलं; ठाकरेंकडून काँग्रेसच्या ‘डिनर’वर बहिष्कार

“शिवसेनेने सावरकरांचं हिंदुत्व स्वीकारलेले आहे. आमचं हिंदुत्व सावरकरांप्रमाणेच शेंडी जानव्याचं हिंदुत्व नसून, विज्ञानवादी हिंदुत्व आहे. हे भाजपला मान्य आहे का? सावरकरांचं गौमातेवरची भूमिका त्यांना मान्य आहे का? हे ढोंग आहे. हे अडाणी बचाव यात्रा आहे. ही खुर्ची बचाओ यात्रा आहे. नाव फक्त सावरकराचं आहे. यांनी सावरकरांची यात्रा काढणं ही सावरकरांची सर्वात मोठी बदनामी आहे. त्या मुख्यमंत्र्यांना आता उठवा आणि विचारा की सावरकरांच्या तीन क्रांतिकारक बंधूंची नावं माहितीये का? त्यांनी पटकन सांगावं, सावरकरांचा जन्म कुठे झाला माहितीये का? विचारा त्यांना पटकन फोन करून”, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागलं.

सावरकरांवरून दुही, राऊत म्हणाले मार्ग निघेल

“आम्हाला जे करायचे ते करू. आम्ही दिल्लीत सुद्धा आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. विरोधी पक्षाच्या सर्वपक्षीय बैठकीला शिवसेना उपस्थित नव्हती. आमचं बोलणं सुरू आहे. माझी मल्लिकार्जून खरगेंसोबत चर्चा झालेली आहे. काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे. त्यातून मार्ग निघेल”, असा उच्चार यावेळी राऊतांनी केला.

तुमच्या मांडीला मांडी लावून बसायचं का? संजय राऊत यांनी बावनकुळेंना काय म्हटलंय?

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी, असं चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले होते. या विधानावर राऊत म्हणाले, “कशा करिता? आणि काय करायचं, तुमच्या मांडीला मांडी लावून बसायचं? तुम्ही ज्या गद्दारांना मांडीवर घेऊन बसलेला आहात, त्या मांडीवर आम्ही बसायचं, गरज नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल आणि दिल्लीत 2024 मध्ये बदल होईल. त्यांना शिवसेनेची भीती वाटते. महाविकास आघाडीत शिवसेना असल्यामुळे शंभर टक्के महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल, ही भीती त्यांना आहे”, असं विधान राऊतांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा का काढावी वाटली नाही? राऊतांचा भाजपला सवाल

उच्च न्यायालयाने भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधातील फौजदारी कारवाईची याचिका फेटाळली. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “सावरकरांचा अपमान झाला म्हणून गौरव यात्रा काढत आहेत. याच भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा यांना काढावीशी वाटली नाही. कोश्यारींनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, तेव्हा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची गौरव यात्रा काढावीशी वाटली नाही, का? फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान नव्हता का? तेव्हा तुम्ही भगतसिंह कोश्यारींना पाठिंबा दिला. पाठिशी घातले. त्यावेळी तुम्हाला का वाटलं नाही की, छत्रपती शिवाजी महाराजांची गौरव यात्रा काढावी?”, असा सवाल संजय राऊतांनी भाजप-शिवसेनेला केला.

    follow whatsapp