बापासाठी लेक मैदानात, टीका करणाऱ्यांवर इतिहास सांगत हर्षवर्धन सपकाळांची मुलगी भडकलीच!

Gargi Sapkal on Harshwardhan Sapkal : "माझ्या वडिलांच्या, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावरून सध्या राज्यात जाणीवपूर्वक गदारोळ उभा केला जात आहे. हा वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी नाही, तर त्यांच्या नावाचा राजकीय गैरवापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा हा एक सुनियोजित प्रयत्न आहे. ज्यांनी सातत्याने महाराजांच्या विचारांना आणि इतिहासाला विकृत करण्याचं काम केलं आहे, तेच आज अचानक अपमान झाल्याचं ढोंग करत आहेत, हीच या संपूर्ण गदारोळामागची खरी राजकीय चाल आहे."

Gargi Sapkal on Harshwardhan Sapkal

Gargi Sapkal on Harshwardhan Sapkal

मुंबई तक

16 Feb 2026 (अपडेटेड: 16 Feb 2026, 04:48 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बापासाठी लेक मैदानात

point

टीका करणाऱ्यांवर इतिहास सांगत हर्षवर्धन सपकाळांची मुलगी भडकलीच!

Gargi Sapkal on Harshwardhan Sapkal : टिपू सुलतान यांच्याबाबतच्या वक्तव्यावरुन भाजपने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना चांगलंच घेरलंय. त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात येत असून त्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात येत आहेत. शिवाय हिंदूत्ववादी कार्यकर्ते देखील त्यांना ट्रोल करताना पाहायला मिळत आहेत. मराठा ठोक मोर्चाने तर हर्षवर्धन सपकाळांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस जाहीर केलंय. दरम्यान, विरोधकांनी हर्षवर्धन सपकाळ यांना घेरलेलं असताना त्यांची कन्या प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलीये. Gargi Sapkal यांनी महाराष्ट्रातील जनतेला एक पत्र लिहिलंय. त्या काय म्हणाल्या? जाणून घेऊयात.. 

हे वाचलं का?

Gargi Sapkal यांचं पत्र जसंच्या तसं

महाराष्ट्रातील प्रियजनांनो, 

माझ्या वडिलांच्या, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावरून सध्या राज्यात जाणीवपूर्वक गदारोळ उभा केला जात आहे. हा वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी नाही, तर त्यांच्या नावाचा राजकीय गैरवापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा हा एक सुनियोजित प्रयत्न आहे. ज्यांनी सातत्याने महाराजांच्या विचारांना आणि इतिहासाला विकृत करण्याचं काम केलं आहे, तेच आज अचानक अपमान झाल्याचं ढोंग करत आहेत, हीच या संपूर्ण गदारोळामागची खरी राजकीय चाल आहे.

खरं तर माझ्या वडिलांचं मूळ वक्तव्य अतिशय स्पष्ट आणि संदर्भासह होतं. “शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान यांनी कार्य केलं. महाराजांप्रमाणेच त्यांनी कुठल्याही विखारी, विषारी विचारांना थारा दिला नाही,” हा त्या वक्तव्याचा आशय होता.

हा संदर्भ एका विशिष्ट प्रश्नाशी जोडलेला होता. विविध जाती आणि धर्मांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तेढीच्या पार्श्वभूमीवर काही संघटनांनी अशी मागणी केली होती की सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महामानवांचे फोटो लावावेत, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतान यांचेही फोटो असावेत. “या मागणीकडे आपण कसं पाहता?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाच्या उत्तरात, वरील संदर्भात हे वक्तव्य करण्यात आलं. पण आज त्याच वक्तव्याचा हेतुपुरस्सर विपर्यास केला जात आहे.

यांच्याच लाडक्या भगतसिंग कोश्यारी यांनी “शिवाजी महाराज आता जुने झाले, नवे आयडॉल नितीन गडकरी” अशी अपमानास्पद तुलना केली, फुले दाम्पत्याचा अपमान केला, तेव्हा या सत्ताधाऱ्यांच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. उलट अशा व्यक्तीला महाराष्ट्रभूषण देऊन त्यांनी महाराजांप्रती आपली खरी मानसिकता उघडी पाडली. कोरटकर या मा. फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीकडून महाराजांचा अपमान होतो, तेव्हा हे गप्प बसतात. “मोदी म्हणजे शिवाजी महाराज” अशी इतिहासाची विकृती करणाऱ्या महंतांना प्रश्न विचारत नाहीत. राजमाता जिजाऊसाहेबांबद्दल वादग्रस्त आणि अवमानकारक लिखाण करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना कधी जाब विचारला गेला नाही. म्हणजे जेव्हा अपमान त्यांच्या विचारसरणीतून होतो तेव्हा तो चालतो, हीच या सत्ताधाऱ्यांची दुटप्पी, दडपशाही आणि निवडक नैतिकतेची राजकारणाची परंपरा आहे.

हेही वाचा : जालन्यात विवाहितेचा अमानुष छळ, माहेरहून पैसे आणण्यास टाकला दबाव, पीडितेनं गळफास घेत संपवलं जीवन

माझे वडील छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करणारे आणि त्यांच्या समता, न्याय व लोककल्याणाच्या आदर्शांवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण ज्यांना महाराजांचा हा समतेचा आणि न्यायाचा विचार मान्य नाही, ज्यांना फक्त प्रतीकांचा दिखावा प्रिय आहे, तेच लोक समाजात द्वेष पसरवतात, दंगली घडवण्याचं वातावरण तयार करतात आणि स्वार्थी राजकारणासाठी महाराजांच्या नावाचा वापर करतात. हा तर खरा महाराजांचा अपमान आहे. स्वराज्य म्हणजे प्रेम, शांतता, न्याय आणि लोकांचा सन्मान. पण महाराजांना मानणारे म्हणवून घेऊन जर लोकांची डोकी फोडली जात असतील, तर तो कुठला विचार आहे?

या वादानंतर फेक आयडी तयार करून मला अत्यंत गलिच्छ, स्त्रीद्वेषी आणि अपमानास्पद शिव्या दिल्या जात आहेत. ज्यांना खरंच महाराज कळले असते, ते असं वागले असते का? पण त्यांच्या कार्यशाळा, शाखा आणि प्रचारयंत्रणांमधून जर सातत्याने द्वेषच पेरला जात असेल, तर त्याचेच प्रतिबिंब समाजात दिसणार, यात आश्चर्य ते काय?

शिवराय, जोतिबा–सावित्री फुले, छत्रपती शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महामानवांचा सामाजिक न्याय, समता आणि कल्याणकारी राज्याचा विचार हा आरएसएसच्या ब्राह्मणवादी विचारसरणीच्या मूलत: विरोधात आहे, त्यांना तो मान्य नाही. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या वडिलांच्या शब्दांचा विकृत अर्थ लावून, महाराष्ट्रात हिंदू–मुस्लिम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेही शिवजयंतीच्या उंबरठ्यावर! हे एक स्पष्ट राजकीय षड्यंत्र आहे. महाराजांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे दूषित वातावरण तयार करून जयंती साजरी करायची, ही वैचारिक विकृतीच म्हणावी लागेल.

ज्यांची माथी भडकवली जात आहे, त्यांनी हे ओळखायला हवं की फडणवीस आणि ज्या विचारसरणीतून ते प्रेरित आहेत, ती तुमची फसवणूक करत आहे. तुम्हाला, देशाचं आणि महाराष्ट्राचं ऐक्य जपणाऱ्या माणसांच्या विरोधात उभं केलं जात आहे. आपण अजून किती दिवस या विकृतीला बळी पडणार? ही विकृती तुमचं आयुष्य, तुमचं समाजजीवन आणि शेवटी देशाचं भविष्य उद्ध्वस्त करेल. यापासून सावध राहणं हाच आजचा खरा देशभक्तीचा मार्ग आहे.

शेवटी, महाराजांचा विचार काय आहे हे आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. आम्हाला वैचारिक वारशासोबत पारिवारिक वारसा लाभलेला आहे. आमच्या कुटुंबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेट वारशाशी आणि मराठा राजघराण्यांशी जवळचा संबंध आहे. माझ्या वडिलांची माऊशी राजर्षी शाहू महाराजांच्या कदमबांडे घराण्यात लग्न झालेली होती. तसेच, माझ्या आजीचे वडील देवासचे सरदार जाधव होते, जे सिंधखेड राजाच्या जाधव घराण्याशी (जिजाऊ मातोश्रींच्या घराण्याशी) जोडलेले आहेत. आणि माझी आत्या बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या वंशज घराण्यात विवाहित आहे. हे सर्व नाते भोसले आणि इतर मराठा राजघराण्यांशी जोडते, पण माझे वडील या ऐतिहासिक वैभवाचा राजकीय उपयोग कधीच करत नाहीत. ही बाब महत्वाची वाटते. 

ज्यांचा इतिहास अन्याय, शोषण आणि स्त्रीद्वेषाचा राहिलेला आहे, ज्यांना इथली जातीय उतरंड कायम ठेवायची आहे, ज्यांनी सत्तेसाठी गद्दारीची परंपरा जोपासली आहे अशा विचारसरणीच्या लोकांनी तरी महाराजांच्या विचारांचे धडे महाराष्ट्राला देण्याचं ढोंग करू नये. महाराष्ट्र तुमचे डावपेच ओळखतो.

महाराष्ट्रातील सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय बांधवांना माझं एवढंच सांगणं आहे की, आपल्याला प्रेम, करुणा, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांवर उभं राहायचं आहे, आणि याच मूल्यांवर महाराष्ट्र घडवायचा आहे. सत्य ओळखा, आणि सत्याच्या बाजूने एकजुटीने उभे राहा. खऱ्या स्वराज्यासाठी एकत्र लढा.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बीड : मेडिकलवाला नृत्यांगनेचा डान्स पाहायला धाराशिवला गेला, येताना मित्रांनी दारु पाजून जीव घेतला, मृतदेह दारात टाकला

    follow whatsapp