मोठी बातमी.. चाकणकरांना खरात प्रकरण प्रचंड भोवलं, दिला सलग दुसरा राजीनामा! म्हणाल्या, ‘मी सकाळी सुनेत्रा वहिनींसोबत…’

मुंबई तक

28 Mar 2026 (अपडेटेड: 28 Mar 2026, 01:23 AM)

Rupali Chakankar NCP Resignation: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोग अध्यक्ष पद गमावलेल्या रुपाली चाकणकर यांना आता राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदही सोडावं लागलंय.

big news kharat case proves costly for rupali chakankar she resigns as state president of ncp women

रूपाली चाकणकरांचा आणखी एक राजीनामा

Google CTA

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राष्ट्रवादी) महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना भोंदूबाबा अशोक खरातशी सलगी करणं प्रचंड महागात पडलं आहे. कारण या प्रकरणामुळेच सुरुवातीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या चाकणकरांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागला आहे. 

हे वाचलं का?

खरात प्रकरणातील वादाच्या पार्श्वभूमीवर रूपाली चाकणकरांनी 27 मार्च रोजी रात्री उशिरा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला. 

आपल्या पदाचा राजीनामा देताना केलेल्या ट्विटमध्ये चाकणकर म्हणतात की, ‘आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.‘

रूपाली चकाणकरांचा राजीनामा


याबाबत त्यांनी सोशल मीडियावर (एक्स) एक विस्तृत पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

चाकणकरांनी राजीनामा देताना सोशल मीडिया पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले आहे?

“खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच.”

“हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे.”

“आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.” असं ट्विट करत चाकणकर यांनी आपलं राजीनामा पत्र पोस्ट केलं.

खरात प्रकरण उघडकीस आल्यापासून रुपाली चाकणकर यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली. तसंच वाढता राजकीय दबाव लक्षात घेता मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. ज्यानंतर त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता.

आता पक्षातील महत्त्वाचे पद सोडताना त्यांनी तपास यंत्रणेकडे पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. आरोप खोटे असल्याचे सांगताना त्यांनी माध्यमांमधील बातम्यांमुळे होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दलही खेद व्यक्त केला आहे.

खरात प्रकरणाची पार्श्वभूमी

अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. खरातवर गंभीर आरोप असल्याने त्याच्या निकटवर्तीय संबंधांवर प्रश्न उपस्थित झाले होते. रुपाली चाकणकर या खरात प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचे वारंवार सांगत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (अजित पवार गट) महिला आघाडीची प्रमुख नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही; मात्र सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेतल्याचे चाकणकर यांनी सांगितले आहे.

सद्य:स्थितीत खरात प्रकरणातील तपास सुरू असून, पोलिसांनी अनेक पैलू तपासत आहेत.

दुसरीकडे आता चाकणकरांनंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी कोणावर सोपवतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.