मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर दररोज नवनवे आणि धक्कादायक असे खुलासे होत आहेत. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याच प्रकरणी एक नवा आणि हादरवून टाकणारा गौप्यस्फोट केला. यावेळी अंजली दमानिया यांनी थेट अशोक खरातच्या मोबाइलचा CDR म्हणजेच कॉल डेटा रेकॉर्ड बाहेर काढला आहे. यामध्ये दमानियांनी असा दावा केला आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल 17 वेळा खरातला कॉल केला होता. त्यामुळे खरात प्रकरणात आता एकनाथ शिंदेनी देखील राजकीयदृष्ट्या अडचणीत आले आहेत.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया..
'कुठल्याही विषयावर लढायला लागल्यावर माझ्याकडे बरीचशी माहिती येते. तसाच काहीसा प्रकार आता झाला आहे. अशोक खरातचं प्रकरण महाराष्ट्रात सुरू आहे. त्याची बरीचशी माहिती माझ्यापर्यंत येते आहे आणि ती माध्यमांपर्यंत देते आहे. पण काही कारणामुळे मी चंदीगड येथे आले आहे एका लग्नासाठी. रविवारपर्यंत मी परत येणार नव्हते म्हणून मला वाटलं की, मी ही माहिती लोकांपर्यंत पोहचवावी..'
अशोक खरातला रुपाली चाकणकरांचे तब्बल 177 कॉल्स
'मला एक सीडीआरची कॉपी आली. ती व्हॉट्सअॅपवर माझ्याकडे ज्यांनी पाठवली त्यांना मी ओळखत नाही. आताच्या घटकेला जेव्हा ही माहिती आली तेव्हा तात्काळ, मी ती पोलीस महासंचालक महाराष्ट्र, मुख्यमंत्र्यांना दिली आणि एसआयटीच्या तेजस्वी सातपुते यांच्याकडे परवाच पाठवली. काल दिवसभरात जी माहिती होती ती मी थोडीशी संकलित केली. आताच्या घटकेला माझ्याकडे जी धक्कादायक माहिती आहे ती अशी आहे की, रुपाली चाकणकर म्हणायच्या की, 'अशोक खरात माझे गुरु आहेत. खरातांबाबत मला बाकी काही विशेष माहीत नाही, आमचे फक्त कौटुंबिक संबंध होते वैगरे वैगरे..'
हे ही वाचा>> भोंदूबाबा खरातचं सगळ्यात घाणेरेडं कृत्य, 'शंकराच्या पिंडीजवळ देखील महिलांना घेऊन...', 'ती' गोष्ट ऐकून तुम्हीही जाल हादरून!
'मात्र, आता जी माहिती येते आहे ती अतिशय धक्कादायक आहे. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातला झाले आहेत. एवढंच नव्हे तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर.. दोन दिवस झाले आपण त्यांच्याबाबत बरंचसं ऐकतो आहोत. त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले आहेत. पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे फक्त आपण फोटो आणि व्हिडिओ बघितले होते.'
एकनाथ शिंदेंचेही खरातला 17 कॉल्स
'आताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातला नॉर्मल सेलफोनवरून झाले होते. व्हॉट्सअॅप आणि इतर किती झाले हे मला माहीत नाही. पण 17 कॉल पैकी 10 इनकमिंग आणि 7 आऊटगोईंग कॉल्स होते. ज्यामध्ये सगळ्यात जास्त.. म्हणजे 21 मिनिटं यांच्या संभाषण झालं.'
'आता ही सगळी माहिती मी जबाबदार नागरिक म्हणून यंत्रणांना दिली. आणि मला असं वाटलं की, कसं असतं की एसआयटी, अहवाल हे सगळंच असतं.. पण खरी माहिती जनतेपुढे येत नाही. म्हणून जनतेच्या दरबारात ही माहिती ठेवते. माझा यामध्ये दुसरा काहीही हेतू नाही.'
'जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 कॉल्स झाले असतील तर हे कशासाठी झाले आहेत? याचं उत्तर एकनाथ शिंदेंनी देणं गरजेचं आहे.'
हे ही वाचा>> मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी अशोक खरातकडून अघोरी पूजा करुन घेतली; बड्या नेत्याचा गंभीर आरोप
'चंद्रकांत पाटील जे भाजपचे मंत्री आहेत त्यांचे 8 कॉल्स आहेत. सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील एक कॉल आहे. आता हे मी नॉर्मल कॉल बद्दल बोलते आहे. यामध्ये व्हॉट्सअॅप कॉलचा उल्लेख नाही. कारण त्याची माहिती आपल्याला मिळू शकत नाही.'
'जर नॉर्मल कॉल एवढे केले असतील तर व्हॉट्सअॅपही किती झाले असतील याची कल्पना पण करवत नाही.'
'यामध्ये सगळ्यात जास्त कोण बोललं.. जे सीडीआर आलं त्यामध्ये अमूक-अमूक मॅपिंग असतं, समरी असते आणि जास्तीत जास्त कोणाशी बोलले याची देखील माहिती असते. आताच्या घटकेला पहिलं नाव आहे ते म्हणजे तृप्ती खरातचं.. जे आपण समजू शकतो की, कुटुंबातील लोकांशी जास्त बोलणं होत असेल. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत आणि 33,727 सेकंद रुपाली चाकणकर खरातशी बोलल्या होत्या.'
'मला तेच वाटतं की, आता त्यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशीच.. पहिलं तर यांच्यावर एफआयआर झाला पाहिजे. यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे. कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरूशी बोलत नाही.'
'177 कॉल आणि 33,727 सेकंद ही व्यक्ती बोलत असेल तर ती काय बोलत होती याची चौकशी नक्कीच झाली पाहिजे. तिसरं नाव आहे.. दीपक लोंढे यांचं. ही व्यक्ती कोण आहे.. तर ते म्हणजे दीपक केसरकरांच्या जवळचे व्यक्ती. यांचे 189 कॉल झाले होते खरातांना..'
'असं कळलंय की, आपल्या देशातील सगळ्याच राज्यातून खरातला कॉलल यायचे. पण काही देशांची जी नावं आली आहेत.. ती देखील मला अतिशय धक्कादायक वाटत आहेत. त्यांना कतारमधून, यूएई, ऑस्ट्रेलिया, यूएस, ओमान यासारख्या देशातून कॉल यायचे.. ही सगळी माहिती मी एसआयटीकडे दिली आहे.'
'माझ्याकडे जी-जी माहिती येईल ती मी यंत्रणांना देईल. त्याबाबत तपास करण्याची विनंती करेन. सगळी माहिती लोकांच्या न्यायालयात येण्याची गरज आहे. असं मला वाटतं.. ते काम मी नक्कीच करेन.' असं म्हणत अंजली दमानिया यांनी नवी खळबळ उडवून दिली आहे.
ADVERTISEMENT











