Nagpur Crime News, नागपूर : नागपूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. घराजवळ संशयास्पदरीत्या वारंवार चकरा मारणाऱ्या युवकाला जाब विचारल्याने उफाळलेल्या रागातून एका एसआरपीएफ कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मातोश्री नगर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंकज ठाकूर (रा. वानाडोंगरी, मातोश्री नगर) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून ते एसआरपीएफमध्ये कार्यरत होते.
ADVERTISEMENT
'वारंवार इथे चकरा का मारतो', असा जाब विचारल्याने वाद
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात राहणारा आकाश मंडल हा युवक ठाकूर यांच्या मुलीचा पाठलाग करत यांच्या घराजवळ वारंवार चकरा मारत होता. ही बाब मुलीने वडिलांना सांगितल्यानंतर पंकज ठाकूर यांनी त्याला 'वारंवार इथे चकरा का मारतो' अशी विचारणा करत जाब विचारला. त्यानंतर गुरुवारी पुन्हा आरोपी आकाश हा ठाकूर यांचा मुलीशी बोलण्या प्रयत्न करताना दिसला त्यानंतर आरोपी आणि पंकज ठाकूर यांच्यात वाद झाला. आणि काही वेळाने ते तिथून निघून गेले.
लोखंडी रॉडने हल्ला करत एसआरपीएफ जवानाचा खून
मात्र थोड्या वेळात आरोपी आकाश मंडलने त्याचा भाऊ हर्षित मंडल आणि काही साथीदारांना सोबत घेत घेऊन पंकज ठाकूर यांना गाठत अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या वेळी ठाकूर यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. या झटापटीदरम्यान आकाश मंडलने लोखंडी रॉडने ठाकूर यांच्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्यात ठाकूर यांच्या काही नातेवाईकांनाही दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी आकाश मंडल आणि त्याच्या भावाला अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. तसेच या घटनेमागील नेमके कारण आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर मातोश्री नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. किरकोळ कारणावरून एवढ्या टोकाची हिंसक प्रतिक्रिया दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











