मुंबई: महाराष्ट्रातील शिंदे गटाचे नेते आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्यावर अघोरी विद्या आणि तांत्रिक पूजा करत असल्याचा गंभीर आरोप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सूरज चव्हाण यांनी आज (18 जून) अपलोड केला आहे.
ADVERTISEMENT
या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती भगवी वस्त्रे परिधान केलेली असून, एक व्यक्ती (भरत गोगावले असल्याचा दावा केला आहे) जे खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली असून, त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद हा अद्यापही कायम आहे. पालकमंत्री पद मिळावं यासाठी भरतशेठ हे आग्रही आहेत. तर दुसरीकडे आदिती तटकरे यांची पालकमंत्री पदी वर्णी लागावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसची इच्छा आहे. अशावेळी आता ज्या पद्धतीने सूरज चव्हाण यांनी भरतशेठ गोगावले यांचा व्हिडिओ शेअर केल्याने आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
नेमका व्हिडिओ काय?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती (जो गोगावले यांचा संदर्भ असल्याचे काहींनी म्हटले आहे) जी एका साधूसमोर बसलेली दिसून येत आहे. ज्याच्या समोर एका छोट्या टेबलावर काही वस्तू ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाचे पदार्थ दिसत आहेत.
हे ही वाचा>> Shiv Sena: ‘ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार हे आम्हाला माहितीच…’ भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट
दुसरीकडे भगवी वस्त्रधारी दोन व्यक्ती (संभवतः पुजारी किंवा साधू) या व्यक्तीभोवती उभ्या असून, एका व्यक्ती काळ्या कपड्यांमध्ये काही विधी करताना दिसत आहे. ज्यावेळी तो काही मंत्रोच्चार देखील करताना दिसतोय. पण व्हिडिओमध्ये कोणतीही स्पष्ट संवाद ऐकू येत नाही.
दरम्यान, व्हिडिओ अपलोड करतान सूरज चव्हाण यांनी कॅप्शनमध्ये लिहलंय की, "बाबा भरतशेठ + आघोरी विद्या = पालकमंत्री ?", ज्यामुळे याचा राजकीय संदर्भ हा मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याशी जोडला जात आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोप
दुसरीकडे हा व्हिडिओ शिवसेना (UBT) नेते वसंत मोरे यांनी केलेल्या अघोरी पूजेच्या आरोपांशी जोडला जात आहे. वसंत मोरे काही दिवसांपूर्वी (16 जून 2025) भरत गोगावले यांनी निवडणुकीपूर्वी अघोरी पूजा केल्याचा दावा केला होता. मोरे यांनी गुवाहाटी येथील बगलामुखी मंदिरातून 11 पुजारी बोलावून पूजा करविल्याचा आरोप केला होता.
आता सूरज चव्हाण यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून एकच खळबळ उडवून दिली आहे.
हे ही वाचा>> Bharat Gogawle: 'चु% बनवणारी बहीण पाहिजे?', भरत गोगावलेंचं महिलेबाबत आक्षेपार्ह विधान
भरत गोगावले यांनी याआधी यापूर्वी वसंत मोरे यांनी जे आरोप केले होते त्याचे खंडन केले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी फक्त बगलामुखी मातेची पूजा केली होती, जी त्यांच्या धार्मिक श्रद्धेचा भाग आहे. अघोरी विद्या किंवा तांत्रिक साधनेबाबत त्यांनी कोणताही उल्लेख नाकारला होता. गोगावले यांनी मोरे यांना आव्हान दिले होते की ते त्यांना बगलामुखी मातेच्या दर्शनाला घेऊन जातील.
दरम्यान, काहींनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, गोगावले यांच्या समर्थकांनी हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा करत त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला होत असल्याचे सांगितले.
गोगावलेंवर अघोरी विद्येचे आरोप करणारे व्हिडिओ आणि त्यासोबतच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वादाला तोंड फुटले आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील तणाव वाढला असून, गोगावले यांच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास आणि व्हिडिओच्या सत्यतेची पडताळणी होईपर्यंत हा वाद संपण्याची चिन्हे नाहीत.
ADVERTISEMENT
