अखेर दोन्ही शिवसेना एकत्र, भाजपला रोखण्यासाठी ठाकरेंच्या सोलापुरातील आमदाराची खेळी; राष्ट्रवादीलाही सोबत घेतलं

Solapur Politics : बार्शी तालुक्यात भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांनी नगरपरिषद आणि बाजार समिती निवडणुकांमध्ये मिळवलेले यश लक्षात घेता, त्यांची वाढती ताकद रोखण्यासाठी ही स्थानिक युती करण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपचा प्रभाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर वाढू नये, यासाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत भाजपविरोधात सामूहिक लढा उभारणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Solapur Politics

Solapur Politics

मुंबई तक

24 Jan 2026 (अपडेटेड: 24 Jan 2026, 01:29 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अखेर दोन्ही शिवसेना एकत्र

point

सोलापुरात भाजपला रोखण्यासाठी ठाकरेंच्या आमदाराची स्ट्रॅटेजी

point

दोन्ही राष्ट्रवादीही सोबत

Solapur Politics : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले असतानाच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मोठी राजकीय घडामोड घडल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर थेट शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या युतीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अधिक चुरशीच्या होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे वाचलं का?

बार्शी तालुक्यात भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांनी नगरपरिषद आणि बाजार समिती निवडणुकांमध्ये मिळवलेले यश लक्षात घेता, त्यांची वाढती ताकद रोखण्यासाठी ही स्थानिक युती करण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपचा प्रभाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर वाढू नये, यासाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत भाजपविरोधात सामूहिक लढा उभारणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या युतीची अधिकृत माहिती उद्धव ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली. बार्शीच्या राजकारणात भाजपविरोधात व्यापक आघाडी उभारण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ही युती सर्वांनाच मान्य नसल्याचे चित्रही समोर आले आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ स्थानिक नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी या युतीला तीव्र विरोध दर्शवला आहे. भाजपविरोधात एकत्र येणे वेगळे, मात्र ज्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली, त्यांच्यासोबत युती करणे शिवसैनिकांना मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : शाळकरी मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवलं अन् स्कूल व्हॅनमध्येच चालकाचा 14 वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार...

युतीच्या प्रचार पत्रकावरून वाद अधिक चिघळला आहे. प्रचार पत्रकावर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे फोटो पहिल्या क्रमांकावर असून, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचा फोटो तिसऱ्या क्रमांकावर असल्याने शिंदे गटात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून, तळपायाची आग मस्तकात गेल्याची प्रतिक्रिया आंधळकर यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, “ही अत्यंत दुर्दैवी आणि अभद्र युती बार्शीत करण्यात आली आहे. ज्यांनी आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना ‘50 खोके, एकदम ओके’, ‘गद्दार’ अशा शब्दांत हिणवले, त्यांच्यासोबतच ही युती करण्यात आली. त्यातही आमच्या साहेबांचा फोटो तिसऱ्या क्रमांकावर लावला जातो, याचा मी जाहीर निषेध करतो,” असे तीव्र शब्दांत त्यांनी मत व्यक्त केले.

दरम्यान, या युतीमुळे बार्शी तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता असून, भाजप आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. स्थानिक पातळीवरील ही अनपेक्षित युती मतदारांवर किती प्रभाव टाकते, हे येणाऱ्या निवडणुकांतून स्पष्ट होणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

शाळकरी मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवलं अन् स्कूल व्हॅनमध्येच चालकाचा 14 वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार...
 

    follow whatsapp