Sushma Andhare and Uddhav Thackeray on Barshi Politics : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आल्याची घोषणा झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी ही गणितं जुळवल्याने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान, बार्शीतील या युतीबाबत आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोलापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बार्शीतील या युतीबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला. सुषमा अंधारे बार्शीतील महाआघाडीविषयी बोलताना म्हणाल्या, "कालपासून बार्शीच्या विषयावर चर्चा सुरु आहे. मला सोलापूर माहिती नव्हतं. त्यामुळे मला वाटलं की, मी पक्षप्रमुखांना बार्शीविषयी विचारलं पाहिजे. माझ्या संघटनेला विचारलं पाहिजे की असं काही घडतंय तर त्यावर आपला स्टँड काय? मी यावर स्पष्ट सांगते की, बार्शीचा निर्णय तेथील आमदारांनी त्यांच्या विवेकाला अनुसरुन घेतलेला निर्णय आहे. हा निर्णय संघटनेचा निर्णय नाही. हे स्पष्टपणे आणि जबाबदारीने सांगत आहे. बार्शीच्या आमदारांनी स्थानिक गणितं विचारात घेऊन घेतलेला निर्णय आहे. मी उद्धव ठाकरेंशी याबाबत बोलले. पक्षप्रमुखांनी मला सांगितलं की, मी स्वतंत्रपणे दिलीप सोपल यांच्याशी बोलणार आहे. उशीरा रात्री त्यांचं बोलणं झालं असेल तर मला कल्पना नाही. जेवढी माझी माहिती आहे, त्यानुसार आम्ही एकटे लढतोय. भाजपविरोधात लढत आहे, त्या सर्वांच्या आम्ही सोबत आहोत.
हेही वाचा : मुंबई : लोकल ट्रेनमध्ये वादावादी अन् प्राध्यापकाची हत्या, मालाडमधील घटनेचं CCTV फुटेज समोर VIDEO
राजेंद्र राऊतांविरोधात लढण्यासाठी दिलीप सोपलांची खेळी
दरम्यान, बार्शी तालुक्यात भाजपचे नेते राजेंद्र राऊत यांनी मागील काही निवडणुकांमध्ये मिळवलेल्या यशामुळे भाजपची ताकद वाढत असल्याचं चित्र आहे. नगरपरिषद आणि बाजार समिती निवडणुकांमधील भाजपने राऊतांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवलाय. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी आमदार दिलीप सोपल यांनी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणल्याचं सांगितलं जातंय. स्थानिक पातळीवर दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येत भाजपविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतलाय.
शिंदे गटातील स्थानिक नेत्याचा महाआघाडीला विरोध
या स्थानिक आघाडीची माहिती ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली होती. भाजपविरोधात व्यापक आघाडी उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, ही युती स्थानिक पातळीवर देखील काही प्रमाणात स्वीकारली गेली नसल्याचं चित्र आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ स्थानिक नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी या युतीला तीव्र विरोध दर्शवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्यांसोबत युती करणे शिवसैनिकांना मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एकूणच, बार्शीतील स्थानिक राजकीय गणितांमुळे उभ्या राहिलेल्या या युतीवर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आगामी निवडणुकांआधी ही आघाडी टिकते की तुटते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











