तुकाराम मुंढेंचा हॉटेल्सवर ‘सर्जिकल स्ट्राइक’! कुठे झुरळांचा सुळसुळाट तर कुठे किचनशेजारी टॉयलेट!

मुंबई तक

• 08:52 PM • 10 Aug 2026

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये झुरळे, माशा, अस्वच्छ किचन, किचनशेजारी शौचालय आणि अन्नसाठवणुकीतील त्रुटी तपासणीत समोर आल्या.

tukaram mundhe fda action mumbai hotels food safety violations

तुकाराम मुंढेंचा मुंबईतील हॉटेल्सवर ‘सर्जिकल स्ट्राइक’

Google CTA

मुंबई: महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाच्या कारवायांना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकसह आता ग्रामीण भागातही अन्न व औषध प्रशासनाकडून तपासण्या आणि कारवाया केल्या जात आहेत.

हे वाचलं का?

मुंबईतील हॉटेल्सवरही FDA ने पुन्हा एकदा लक्ष केंद्रित केले आहे. 4 ते 6 ऑगस्टदरम्यान बृहन्मुंबई विभागात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक ठिकाणी स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांशी संबंधित त्रुटी आढळल्याचे समोर आले.

काही ठिकाणी किचनच्या जवळच शौचालय, काही ठिकाणी झुरळांचा आणि माशांचा वावर, तर काही ठिकाणी अन्नसाठवणूक आणि पेस्ट कंट्रोलसंदर्भात नियमांचे पालन झाले नसल्याचे तपासणीत आढळले.

दादरच्या इट निनोचा परवाना निलंबित

दादरमधील इट निनो रेस्टॉरंटवर FDA ने कारवाई केली. तपासणीदरम्यान रेस्टॉरंटमध्ये अस्वच्छ वातावरण असल्याचे आणि घरमाशांचा वावर आढळल्याचे नमूद करण्यात आले.

अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव असल्याचेही तपासणीत आढळले. त्याचबरोबर किचनमध्ये आवश्यक स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची व्यवस्था नसल्याचे समोर आले. अन्न आणि पिण्याच्या पाण्याच्या अनिवार्य चाचण्यांच्या नोंदी उपलब्ध नसणे, तसेच अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी उपलब्ध नसल्याचेही आढळले.

हे ही वाचा>>  "1 किलो पनीरसाठी 5-6 लीटर दूध लागतं; मग 200 रुपयांमध्ये पनीर कसं मिळतं?"

 

स्वच्छता आणि अन्न सुरक्षा संदर्भातील आवश्यक SOP चे पालन होत नसल्याचेही तपासणीत समोर आले. या कारणांमुळे इट निनोचा परवाना निलंबित करण्यात आला.

जय महाकाली ढाब्यात किचनशेजारी शौचालय

अंधेरी पश्चिम येथील जय महाकाली ढाब्यावरही परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान स्वयंपाकघरात खराब आणि अस्वच्छ अवस्थेतील प्लायवूड रॅक आढळले. याशिवाय शौचालयाच्या बाजूला अन्नसाठवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.

किचनमध्ये गंजलेल्या रॅकचा वापर होत असल्याचेही आढळले. रेफ्रिजरेटरमध्ये अन्नपदार्थ साठवताना तापमानाची माहिती मिळण्यासाठी आवश्यक असलेले डिजिटल तापमान मीटर उपलब्ध नसल्याचे तपासणीत समोर आले.

हे ही वाचा>> दुधातील भेसळ कशी ओळखाल? काय पाहायचं? तुकाराम मुंढेंचा महत्त्वाचा सल्ला

किचनच्या भिंती अस्वच्छ असल्याचेही आढळले. मात्र या तपासणीतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे उघड्यावर ठेवलेल्या मळलेल्या कणकेवर माशा बसलेल्या आढळल्या.

House of Maharashtra मध्ये झुरळांचा प्रादुर्भाव

सांताक्रूझ पश्चिम येथील House of Maharashtra या आस्थापनावरही FDA ने कारवाई केली. तपासणीदरम्यान स्वयंपाकघरात झुरळांचा वावर आढळला. फ्रिजच्या आजूबाजूला, अन्न ठेवण्याच्या ठिकाणी तसेच तयार अन्न साठवण्याच्या परिसरात झुरळे आढळल्याचे नमूद करण्यात आले. स्टोअर रूममध्येही झुरळांचा प्रादुर्भाव असल्याचे तपासणीत समोर आले.

या ठिकाणी पेस्ट कंट्रोलचे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचेही आढळले. त्यामुळे संबंधित आस्थापनाकडून नियमित पेस्ट कंट्रोल केले जात होते का, याबाबत प्रश्न उपस्थित झाला. याशिवाय अन्न पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर केला जात असल्याचे तपासणीत आढळले. स्टोअर रूमच्या छतावरील रंगाचे पापुद्रे निघालेले होते. तसेच किचनमधील स्वयंपाकाची उपकरणे गंजलेल्या अवस्थेत असल्याचेही आढळले. या सर्व कारणांमुळे House of Maharashtra चा परवाना निलंबित करण्यात आला.

South India Dosa Corner चाही परवाना निलंबित

कुर्ला पश्चिम येथील South India Dosa Corner वरही FDA ने कारवाई केली. या आस्थापनाला यापूर्वी सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र निर्धारित मुदतीत त्रुटी दूर करण्यात न आल्याने अखेर परवाना निलंबित करण्यात आला. तपासणीदरम्यान कचरा आणि सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याचे आढळले.

अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी आणि लसीकरणाच्या नोंदी उपलब्ध नसल्याचेही समोर आले. याशिवाय अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत आवश्यक प्रशिक्षणाचा अभाव असल्याचे आढळले. निर्धारित स्वच्छता कार्यक्रमानुसार उपकरणे आणि आस्थापनाची स्वच्छता होत नसल्याचेही तपासणीत नमूद करण्यात आले. आवश्यक अभिलेख आणि दस्तऐवज उपलब्ध नसल्याचेही आढळल्याने या आस्थापनावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

आणखी आस्थापनांवरही FDA ची कारवाई

मुंबईतील या तपासणी मोहिमेदरम्यान आणखी काही आस्थापनांची तपासणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये लेबन्स मिटल सर्विसेस इंडिया एलएलपी (मारुश कन्सात), प्रभादेवी पश्चिम, सुधीर कुमार शेट्टी / सुधीर शेट्टी छत्रधार केटर्स, वांद्रे पूर्व आणि विजयदीप महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, गोवंडी या आस्थापनांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

मूळ माहितीनुसार, या मोहिमेत काही आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा, काहींना परवाना निलंबनाची कारवाई आणि एका आस्थापनाला सुधारणा करण्याची नोटीस देण्यात आली.

हॉटेल्सपुरतीच कारवाई मर्यादित राहणार?

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील FDA च्या कारवाईचा आवाका आता केवळ विशिष्ट खाद्यपदार्थ किंवा काही हॉटेल्सपुरता मर्यादित राहणार नसल्याचे या कारवायांमधून दिसून येत आहे. हायकोर्टाच्या कॅन्टीनपासून मंत्रालयातील कॅन्टीनपर्यंत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांची तपासणी करण्यावर भर दिला जात असल्याचा उल्लेख या माहितीत करण्यात आला आहे.

याशिवाय मद्यविक्रीशी संबंधित आस्थापनांकडेही FDA चे लक्ष जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही मद्य किंवा मद्याच्या बाटल्यांमध्ये विषारी घटकांचा मुद्दाही या संदर्भात उपस्थित करण्यात आला आहे.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईकडे लक्ष

मुंबईतील या कारवायांमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम किती महत्त्वाचे आहेत, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. किचनची स्वच्छता, अन्नसाठवणूक, पेस्ट कंट्रोल, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, वैद्यकीय नोंदी, पिण्याच्या पाण्याच्या चाचण्या आणि अन्न पॅकिंगसारख्या बाबींवर FDA कडून लक्ष दिले जात आहे.

त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA ची ही मोहीम पुढे कुठपर्यंत पोहोचते आणि आणखी कोणत्या आस्थापनांवर कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे.