‘झ# मारताय का’, हजारोंच्या गर्दीत उद्धव ठाकरे यांचं रोखठोक भाषण

मुंबई तक

05 Oct 2026 (अपडेटेड: 05 Oct 2026, 09:35 AM)

uddhav thackeray speech : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी पोलिसांवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी सरकारवर सडकून निशाणा साधला.

uddhav thackeray speech

uddhav thackeray speech

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

‘झ# मारताय का’,

point

हजारोंच्या गर्दीत उद्धव ठाकरे यांचं रोखठोक भाषण

Uddhav Thackeray speech, Mumbai : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या आणि मतदार याद्यांमधील कथित घोळाविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य करताना त्यांनी ठाण्यात झालेल्या पूर्णेकर यांच्या हत्येचा उल्लेख केला. “ज्या पद्धतीने तुम्ही सरकार चालवताय हे सरकार चालवणं नाही, याला सूड उगवणं म्हणतात. सरकारचं काम काय पाहिजे? कायदा-सुव्यवस्था राखणं. काल परवाकडे ठाण्यात आमच्या पूर्णेकरांची हत्या झाली. काय झ# मारतात तुमचे तिथले पोलीस? गृहमंत्री आहेत कुठे?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्यासोबत आलेल्या सर्व राजकीय पक्षांचे आणि इथे उसळलेल्या या अफाट जनसागराचे मी आभार मानतो. याचं कारण असं आहे की, हा लढा कोणत्याही एका पक्षाचा, व्यक्तीचा, जात-पात किंवा धर्माचा नाही. हा लढा आपल्या देशाच्या, म्हणजेच आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे. मला आठवतंय, तुम्हालाही आठवत असेल, पहिल्यांदा मोदीजी जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा दिली होती. आम्हाला ‘मेक इन इंडिया’ मान्य आहे. पण ‘मेक इन इंडिया’मध्ये हुकूमशहासुद्धा जर आपल्या देशात बनणार असेल, तर त्याला या देशातच गाडून टाकण्यासाठी आज आम्ही उभे राहिलो आहोत. बाकी सगळं ‘मेक इन इंडिया’ ठीक आहे; पण ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली तुम्ही जर हुकूमशहा बनत असाल, तर तुमची हुकूमशाही आम्ही गाडून टाकली, असं समजा.

"13 कोटी मतदार अचानक यांनी वगळून टाकलेले आहेत"

सर्वांना विषय माहिती आहे; पण त्यातल्या काही बाबी आवर्जून ऐकल्या पाहिजेत. मी राजचं भाषण ऐकलं, थोरात साहेबांचं भाषण ऐकलं. तुम्हीही ऐकलं असेल. राजने सांगितलं की, आपल्या राज्यातले जवळपास दोन कोटी मतदार वगळले गेले आहेत. संपूर्ण देशात किती मतदार वगळले गेलेत, हे तुम्हाला माहिती आहे का? 13 कोटी मतदार अचानक यांनी वगळून टाकलेले आहेत. 13 कोटी म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकसंख्येएवढे लोक देशाच्या मतदार यादीतून वगळले गेले आहेत. मान्य आहे तुम्हाला? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. 

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 13 कोटींपैकी मोठ्या संख्येने मतदार बंगालमध्ये, तामिळनाडूमध्ये वगळले गेले. तामिळनाडूमध्ये 70 लाख, बंगालमध्ये 30 लाख. विशेष म्हणजे बंगालमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत जे मतदार वगळले गेले, त्यातील काहींना वैध ठरवलं गेलं. त्यांनी अर्ज केले, विनवण्या केल्या. काही मतदार वैध ठरले. आता तिथे पोटनिवडणूक आहे. या पोटनिवडणुकीमध्ये त्या मतदारांना मतदानाचा अधिकार मिळावा, म्हणून तत्काळ सुनावणीसाठी त्यांचे अर्ज सुप्रीम कोर्टात गेले. तेव्हा सुप्रीम कोर्टाने तत्काळ उत्तर काय दिलं, माहिती आहे? त्यांनी सांगितलं, ‘ही पोटनिवडणूक आहे ना?’ ही पोटनिवडणूक परवा, म्हणजे सहा तारखेला होते. त्यांची सुनावणी 28 तारखेला होणार होती; ती पुढे ढकलली. तारीख पे तारीख. सहा तारखेला निवडणूक आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, ही फक्त पोटनिवडणूक आहे, आम्ही पाच तारखेला सुनावणी घेऊ. उद्या सुनावणी घेणार आहेत की नाही, अजून ठरलेलं नाही. सुनावणी घेतल्यानंतर तत्काळ निर्णय झाला, तरी परवाच्या निवडणुकीत हे मतदार मतदान करू शकणार आहेत का? याचा अर्थ यांनी सगळ्या संस्था आपल्या ताब्यात कशा घेतल्या आहेत, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे, असं ठाकरेंनी नमूद केलं.