udhayanidhi stalin Arrested : कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या प्रश्नावर आयोजित आंदोलनादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात तामिळनाडू पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आलीये. मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका करताना त्यांनी केलेल्या वक्तव्याचा संबंध अभिनेत्री त्रिशाशी जोडला गेल्याचा आरोप करण्यात आला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 'राजकीय करिअर तुझं...' मुंडेंवर घणाघात; जरांगेंनी आंदोलनाचा प्लॅनही सांगितला
स्टॅलिन यांच्या या वक्तव्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून हा मुद्दा राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला. दरम्यान, उदयनिधी स्टॅलिन यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या अर्जावर दुपारी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : शिक्षिकेला शाळेत घुसून संपवले, 21 वर्षीय तरुणानं केले 27 वार, नेमकं कारण काय?
विजय यांच्याशिवाय कोणाचेही नाव घेतले का? उदयनिधी यांचा सवाल
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर इंडिया टुडेशी संवाद साधताना उदयनिधी स्टालिन यांनी आपल्याकडून कोणतेही चुकीचे वक्तव्य झाले नसल्याचा दावा केला. "मी काहीही चुकीचे बोललो नाही. विजय यांच्याशिवाय मी इतर कोणाचेही नाव घेतले का?" असा सवाल त्यांनी केला. पोलिसांची कारवाई ही सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलिसांच्या वाहनातून नेत असताना "आता न्यायालयच निर्णय देईल," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कावेरी प्रश्नावर आयोजित सभेत मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर टीका करत असताना उपस्थित लोकांकडून "त्रिशा, त्रिशा" अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर उदयनिधी यांनी केलेल्या उत्तराचा अनेकांनी दुहेरी अर्थ काढत तो महिलांचा अपमान करणारा आणि अश्लील स्वरूपाचा असल्याचा आरोप केला.
महिलांविषयी विकृत मानसिकता दर्शवणारे हे वक्तव्य, टीव्हीकेची टीका
या प्रकरणानंतर सत्ताधारी टीव्हीकेने उदयनिधी स्टालिन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. टीव्हीकेचे नेते आधव अर्जुना यांनी त्यांना "ऑब्सीन निधी" असे संबोधत त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेचा स्तर घसरल्याचा आरोप केला. त्यांनी अण्णादुराई यांनी उभारलेल्या चळवळीची परंपरा अशा प्रकारच्या दुहेरी अर्थाच्या आणि अश्लील भाषेमुळे खराब होत असल्याचे म्हटले. महिलांविषयी विकृत मानसिकता दर्शवणारे हे वक्तव्य कोणतीही आई, बहीण किंवा पालक स्वीकारणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
टीव्हीकेचे प्रवक्ते फेलिक्स जेराल्ड यांनीही उदयनिधी यांनी हेच वक्तव्य स्वतःच्या मुलांसमोर करू शकतील का, असा सवाल उपस्थित केला. भाजपनेही या वक्तव्याचा तीव्र निषेध करत उदयनिधी यांच्या अटकेची मागणी केली. भाजपचे प्रवक्ते नारायणन तिरुपथी यांनी हे वक्तव्य अश्लील, लाजिरवाणे आणि अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे म्हटले. माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनीही सोशल मीडियावरून टीका केली, तर खुशबू सुंदर यांनी अभिनेत्री तृषाची सार्वजनिकपणे बिनशर्त माफी मागण्याची मागणी केली.
दरम्यान, डीएमकेने मात्र उदयनिधी स्टॅलिन यांची बाजू घेतली आहे. माजी मंत्री टी. मनो थंगराज यांनी हा संपूर्ण वाद राजकीय हेतूने निर्माण करण्यात आल्याचा आरोप केला. कावेरीचा प्रश्न आणि डेल्टा भागातील शेतकऱ्यांच्या समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा वाद उभा करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सरकारला अस्वस्थ करणारे प्रश्न विधानसभेत उपस्थित करू नयेत, यासाठीच उदयनिधी स्टालिन यांच्याविरोधात हा वाद उभा करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
ADVERTISEMENT











