"कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम्", राजकीय प्रवेशावर विद्यानंद बापटांची प्रतिक्रिया

मुंबई तक

25 Sep 2026 (अपडेटेड: 25 Sep 2026, 09:52 AM)

vidyanand bapat : असीम सरोदे यांनी विद्यानंद बापट यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी भूमिका मांडली आहे. मात्र बापट यांनी सध्या निवडणूक लढवण्याबाबत गांभीर्याने विचार केलेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Mumbai Tak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

"कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम्",

point

राजकीय प्रवेशावर विद्यानंद बापटांची प्रतिक्रिया

vidyanand bapat : ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी ध्वनी प्रदुषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांचं कौतुक करत त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवावी का, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला होता. त्यानंतर बापट यांच्या संभाव्य राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर 'मुंबई Tak' ने असीम सरोदे आणि विद्यानंद बापट यांच्याशी एकत्रितपणे चर्चा केली. बापट यांनी मात्र सध्या निवडणूक लढवण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

विद्यानंद बापट हे अभ्यासू, सुसंस्कृत, विनम्र : असीम सरोदे 

असीम सरोदे यांनी विद्यानंद बापट हे अभ्यासू, सुसंस्कृत, विनम्र आणि सामाजिक प्रश्नांची जाणीव असलेले व्यक्ती असल्याचं म्हटलं. ध्वनी प्रदूषणाच्या प्रश्नावर बापट यांनी घेतलेली भूमिका आणि तो मुद्दा सातत्याने मांडण्याची त्यांची पद्धत यामुळे अनेक लोक त्यांचं नाव पुढे करत असल्याचं सरोदे यांनी सांगितलं. त्यांच्या मते, विधान परिषदेत अभ्यासू आणि संतुलित पद्धतीने भूमिका मांडणाऱ्या व्यक्तींचा समावेश असावा. सध्याच्या राजकारणात बेताल किंवा उथळ वक्तव्यांची उदाहरणं पाहायला मिळत असताना विनम्रपणे आणि विषयाला धरून बोलणाऱ्या व्यक्तींची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

"कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम्"

मात्र, विद्यानंद बापट यांनी सध्या राजकारणात प्रवेश करण्याबाबत गांभीर्याने विचार केलेला नसल्याचं स्पष्ट केलं. राजकीय नेतृत्वामध्ये अनेक विषयांवर भूमिका घ्यावी लागते. राजकीय नेतृत्व म्हणजे "कर्तुम् अकर्तुम् अन्यथा कर्तुम्" (Totalitarian Control) ..म्हणजे ते वाटेल ते करु शकतात. कायद्यानेही वाटेल ते करु शकतात. तुमच्याकडे बहुमत असेल तर वाटेल ते कायदे करु शकतात,असं त्यांनी सांगितलं. एका सामाजिक किंवा नागरी प्रश्नावर काम करताना एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित करता येतं; मात्र राजकारणात गेल्यानंतर विविध विषयांवर भूमिका घ्यावी लागते आणि अनेकदा बहुमताच्या भूमिकेसोबतही जुळवून घ्यावं लागतं, असं बापट म्हणाले. त्यामुळे सध्या त्यांचा फोकस नागरी चळवळीवरच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

असीम सरोदे यांनी मात्र नागरी प्रश्नांवर काम करणाऱ्या व्यक्तींचा प्रवास राजकीय भूमिकेकडे होणं स्वाभाविक असल्याचं म्हटलं. ध्वनी प्रदूषण, पर्यावरण, महिला हक्क किंवा शेतीचे प्रश्न असोत, प्रत्येक विषयाचा राजकारणाशी संबंध येतो, असं सरोदेंनी सांगितलं. बापट यांच्या नावाबाबत काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही संपर्क झाल्याचा दावा सरोदे यांनी केला. मात्र अंतिम निर्णय बापट यांनीच घ्यायचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बापट यांनीही या निर्णयासाठी सर्व बाजूंचा विचार करून सामूहिकपणे चर्चा करण्याची भूमिका मांडली. महिन्याच्या अखेरीस याबाबत चर्चा होऊ शकते आणि भविष्यात भूमिका बदलू शकते, असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातून बापट निवडणूक लढवणार की नाही, याबाबत सध्या कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.