योगेश कदम म्हणाले घायवळला परवाना दिला, CM फडणवीस म्हणतात परवाना नाही दिला... नेमकं काय खरं?

Yogesh Kadam: सचिन घायवळ याच्या शस्त्र परवान्यावरून सध्या बरंच राजकारण सुरू आहे. याचबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

yogesh kadam said that a license was given to sachin ghaywal cm fadnavis says no license was given what is truth

Yogesh Kadam

मुंबई तक

• 08:03 PM • 10 Oct 2025

follow google news

मुंबई: सचिन घायवळचा भाऊ नीलेश घायवळ हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न, लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. अशा गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना देण्यावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दोन्ही घायवळ बंधू सध्या फरार आहेत. आता या प्रकरणात अजूनच ट्विस्ट आला आहे. कारण स्वत: राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घायवळला शस्त्र परवानाच दिला गेला नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं आता योगेश कदमांच्या नावानं गृह विभागाचं ते पत्र, स्वत: परवाना दिल्याबाबत केलेलं विधान आणि अनिल परब, संजय राऊत अंजली दमानिया यांनी केलेले आरोप यामुळं योगेश कदम चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. हे सगळं प्रकरण आपण व्यवस्थित समजून घेऊयात.

हे वाचलं का?

सचिन घायवळला शस्त्र परवानगी देण्याचे 'ते' पत्र

गुंड निलेश घायवळच्या भावाला सचिन घायवळला पिस्तुलाची परवागनी देण्यावरुन योगेश कदमांवर आरोप झाले. गृहविभागाचं पत्रच समोर आलं ज्यावर योगेश कदमांची सही आहे. अंजली दमानियांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, 'गृहराज्य मंत्री योगेश कदम. मी एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या राजीनाम्याची मागणी करते. गुन्हेगारांना आणि मोठं करणारे, डॅन्सबार असणारे मंत्री, महाराष्ट्राने का सहन करावे? पोलीस आयुक्तांचा अहवाल/शिफारस अत्यंत महत्त्वाची असते. जर परवाना या टप्प्यावर नाकारला गेला असेल तर त्यामागे साधारणपणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असते. आपण पोलिसांच्या नकारानंतर परवाना कसा, आणि का मंजूर केला? एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तुम्ही का दिलात. पोलिसांचा निर्णय तुम्ही का बदलला याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल. कारण हा कायद्याचा अपमान आहे. सार्वजनिक सुरक्षेची एैशी तैशी करणारे तुम्ही कोण?' असं ट्वीट करत दमानियांनी योगेश कदम यांना घेरलं होतं.

योगेश कदमांचं स्पष्टीकरण

आता या आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांनतर योगेश कदमांनी स्पष्टीकरण दिलेलं की, “घायवळवर 15-20 वर्षांपूर्वी गुन्हे दाखल होते. परंतु, 2019 साली न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. मागील 10 वर्षांत, म्हणजेच 2015 ते 25 या काळात त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांना शस्त्र परवाना देण्याबाबतचा निर्णय घेतला गेला.”

हे ही वाचा>> मुली नाचवून पैसे कमावतात, गुंड पोसतात, गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अनिल परब इरेला पेटले

''उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीलासंदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे.'' असं योगेश कदमांनी सांगितलं...

पण आता यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी परवाना दिलाच नसल्याचं म्हटलं आहे.

पाहा मुख्यमंत्री फडणवीस घायवळ प्रकरणावर काय म्हणाले

'एक सुनावणी गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती. पण हा परवाना दिलाच गेला नाही. पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तूस्थिती लक्षात आणून दिली. त्यामुळे हा परवाना दिलेला नाही. परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की, अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता. परंतु परवाना दिला गेलेला नाही.' असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

एकंदरीत घायवळ प्रकरणात ट्वीस्टवर टिस्ट येताना दिसत आहेत. गृहविभागाचं ते पत्र नंतर राज्यमंत्री कदमांचं परवाना दिला असल्याचं वक्तव्य आणि आता फडणवीसांचं परवाना दिलाच नाही असं विधान यावरुन विभागातच ताळमेळ नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    follow whatsapp