मुंबई: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (7 ऑक्टोबर) मुंबईत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ज्याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, 'आम्ही तिघांनी बसून यावर खूप विचार केला आणि हा निर्णय केला की, चार खर्च कमी करावे लागले तरी देखील आपण त्यासंदर्भात मागेपुढे पाहू नये. कारण शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अशा प्रकारचं संकट आहे.' असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT
यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी 32 हजार कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक मदत पॅकेजची घोषणा केली. हे पॅकेज राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक मोठे असल्याचा दावा फडणवीस यांनी यावेळी केला आहे. या मदतीचे वाटप दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील अतिवृष्टीने शेती, घरे, दुकाने आणि पशुधन यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात एकूण 1 कोटी हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पीक उत्पादन होते, त्यापैकी 68 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा फटका 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2059 महसूल मंडळांना बसला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व भागांना मदत पॅकेजमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा यावेळी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदत पॅकेजमधील महत्त्वाच्या घोषणा
मदत पॅकेज अंतर्गत शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठी थेट मदत देण्यात येईल. प्रति हेक्टर 47 हजार रुपयांची रोख रक्कम आणि नरेगा योजनेद्वारे प्रति हेक्टर 3 लाख रुपये इतकी मदत मिळेल. याशिवाय, रब्बी पिकांसाठी प्रति हेक्टर अतिरिक्त 10 हजार रुपयांची मदत देण्यात येईल. पीक नुकसानीसाठी एकूण 6175 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर अतिरिक्त मदतीसाठी 6500 कोटी रुपयांची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
पीक विमा योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी 17 हजार रुपयांची मदत मिळेल. यासाठी एकूण 18 हजार कोटी रुपयांचे पॅकेज वितरित करण्यात येईल. एकंदरीत, हे 32 हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वसमावेशक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
घर, दुकाने आणि पशुधनासाठी मदत
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांच्या पुनर्बांधणीसाठी मदत देण्यात येईल. याशिवाय, दुकानदार आणि पशुधन नुकसानीसाठीही मदत पॅकेजमध्ये तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF)नियमांनुसार केवळ 3 प्राण्यांसाठी मदत मिळते, मात्र ही मर्यादा रद्द करून प्रत्येक मृत प्राण्यांसाठी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. "आम्ही शेतकऱ्यांच्या प्रत्येक नुकसानीला न्याय देऊ," असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आम्ही आज बैठक घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. हे 32 हजार कोटी रुपयांचे मदत पॅकेज राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक मोठे आहे. सर्व मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
फडणवीस यांनी हे पॅकेज शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन पुनर्वसनासाठी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "पीक नुकसानीबरोबरच घर, दुकाने आणि पशुधन यांचे नुकसानही भरून काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एनडीआरएफच्या मर्यादांपलीकडे जाऊन आम्ही प्रत्येक मृत प्राण्यासाठीही मदत देऊ.''
मराठवाड्यातील अतिवृष्टीने हजारो शेतकरी प्रभावित झाले आहेत. या मदत पॅकेजमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र आता या आर्थिक मदतीचे वाटप कशा पद्धतीने होणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
