Shiv Sena Party and Symbol Supreme Court Hearing , नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचं अधिकृत नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. मात्र, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आज (दि.8) सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयाण आणि न्यायमूर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे राज्यातील सर्व नेतेमंडळी आणि नागरिकांचं देखील लक्ष होतं.
ADVERTISEMENT
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, लवकरात लवकर निर्णय घ्यावा - कपिल सिब्बल
उद्धव ठाकरे यांच्यावतीने वरिष्ठ वकील कपिल सिब्बल न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. कपिल सिब्बल याबाबत बोलताना म्हणाले, “जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत तातडीचं आहे आणि लवकरात लवकर यावर निर्णय घेणं गरजेचं आहे.”
या प्रकरणाची पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात यावी, अशी मागणी ठाकरेंचे वकिल कपिल सिब्बल यांनी केली, तर शिंदेंच्या वकिलांनी या प्रकरणाची सुनावणी डिसेंबर महिन्यात घ्यावी, अशी मागणी केली होती. शिवाय नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या सुनावणी वेळी आम्ही आमची भूमिका 45 मिनिटांत मांडू, असं देखील कपिल सिब्बल यांच्याकडून न्यायालयात सांगण्यात आलं आहे.
12 नोव्हेंबर रोजी होणार पुढील सुनावणी
दोन्ही बाजूंच्या वकिलांचं म्हणणं ऐकल्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी उत्तर दिलं की, न्यायालय हे प्रकरण 12 नोव्हेंबर रोजी सुनावणीसाठी घेणार आहे. न्यायालयीन सूत्रांच्या माहितीनुसार, त्या दिवशी दोन्ही गटांच्या बाजूने सविस्तर युक्तिवाद होणार आहेत. सुप्रीम कोर्ट आज (दि.8) शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण निकाल देईल, असं बोललं जात होतं. मात्र, ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलासंदर्भात एक प्रकरण सुनावणीसाठी आल्याने न्यायमूर्तींनी इतर प्रकरणांची सुनावणी आटोपली आहे.
निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, शिवसेनेचं अधिकृत नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाला देण्यात आलं होतं. त्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त करून आयोगाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. या सुनावणीला महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीने मोठं महत्त्व आहे. कारण, ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांचा दावा कायम आहे. त्यामुळे 12 नोव्हेंबरच्या सुनावणीकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
