Prajakt Tanpure : मविआ सरकारच्या काळात राज्यमंत्री राहिलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, भाजप प्रवेश करताच दुसऱ्याच दिवशी त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळालीये. भाजप प्रवेशानंतर अवघ्या 24 तासांत भाजपने त्यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 12 वर्षांची मुलगी लघुशंकेसाठी उठली, दोघांनी मिळून बंदुकीचा धाक दाखवत जंगलात...
2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव
प्राजक्त तनपुरे यांच्या या अचानक झालेल्या पक्षबदलामुळे ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून जाण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांच्या विरोधात ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार होते, मात्र नंतर भाजपच्या विनंतीवरून त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. भाजपने दिलेल्या शब्द पाळत आता त्यांना थेट विधानपरिषदेवर पाठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
जयंत पाटलांशी कोणतीही चर्चा झालीच नाही
मात्र, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात असताना आपल्या निर्णयाबाबत कोणत्याही वरिष्ठ नेत्याशी चर्चा केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राजक्त तनपुरे यांनी हा निर्णय घेताना जयंत पाटील, शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याशी कोणतीही चर्चा किंवा सल्लामसलत केलेली नाही. यामुळे ते आता शरद पवार गटापासून पूर्णपणे दूर झाले असून, भाजपच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकीर्दीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे.
ADVERTISEMENT










