नवजात मुलीचा मृत्यू, आभाळाएवढं दुःख पचवत ‘तो’ मैदानात उतरला; शतक झळकावून स्वतःला केलं सिद्ध

रणजी हंगामाच्या पहिल्या टप्प्याला सध्या सुरुवात झाली आहे. बडोद्याच्या संघाचा खेळाडू विष्णू सोळंकीने नुकतचं चंदीगढ विरुद्ध सामन्यात शतक झळकावून संघासाठी मोलाची कामगिरी बजावली. परंतू ही शतकी खेळी विष्णूसाठी खूप खडतर ठरली आहे. काही दिवसांपूर्वीच जन्मलेल्या आपल्या नवजात मुलीच्या मृत्यूचं दुःख पचवून विष्णू पुन्हा एकदा मैदानात उतरला. ओडीशा येथील कटक येथे सुरु असलेल्या सामन्यात विष्णूने शतक […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:01 AM • 26 Feb 2022

follow google news

रणजी हंगामाच्या पहिल्या टप्प्याला सध्या सुरुवात झाली आहे. बडोद्याच्या संघाचा खेळाडू विष्णू सोळंकीने नुकतचं चंदीगढ विरुद्ध सामन्यात शतक झळकावून संघासाठी मोलाची कामगिरी बजावली. परंतू ही शतकी खेळी विष्णूसाठी खूप खडतर ठरली आहे. काही दिवसांपूर्वीच जन्मलेल्या आपल्या नवजात मुलीच्या मृत्यूचं दुःख पचवून विष्णू पुन्हा एकदा मैदानात उतरला.

हे वाचलं का?

ओडीशा येथील कटक येथे सुरु असलेल्या सामन्यात विष्णूने शतक झळकावत स्वतःला सिद्ध केलं आहे. क्रिकेटप्रती असलेलं आपलं प्रेम आणि संघनिष्ठेमुळे विष्णूचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

२९ वर्षीय विष्णू सोळंकी ६ फेब्रुवारीला आपल्या संघासोबत भुवनेश्वर येथे पोहचला. २०२१ मध्ये रणजी ट्रॉफी रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने यंदाच्या हंगामात ही स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक क्रिकेटपटूंना हा मोलाचा हातभार लागला आहे. विष्णूच्या या आनंदात आणखी भर पडली जेव्हा त्याला आपल्या बायकोने ११ फेब्रुवारीला एका गोंडस मुलीला जन्म दिल्याचं कळलं. परंतू काळाला हे मान्य नव्हतं. अवघ्या २४ तासांत विष्णूच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला.

विष्णूने तात्काळ बडोदा गाठत आपल्या लहान मुलीवर अंत्यसंस्कार केले. या दुःखाच्या प्रसंगात बडोदा क्रिकेट संघटनेने त्याला सूट देऊन परिवारासोबत राहण्याची मूभा दिली होती. परंतू विष्णूने पुन्हा एकदा मैदानात उतरायचं ठरवलं. तीन दिवसांनी विष्णू पुन्हा एकदा भुवनेश्वरला संघात दाखल झाला. कटकमध्ये बडोद्याला बंगालविरुद्ध पहिल्या सामन्यात ४ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला.

या पराभवामुळे बडोद्याचे एलिट बी ग्रूपच्या सर्वोच्च स्थानावर राहण्याचं स्वप्न डळमळीत झालं आहे. विष्णू सोळंकीने आपला क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत चंदीगढ विरुद्ध सामन्याआधी संघात दाखल झाला. विष्णूला या सामन्यासाठी संघात जागा मिळाली. विष्णूनेही आपल्या अनुभवाचा फायदा संघाला मिळवून देत ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत १०३ धावांची खेळी केली. विष्णूच्या शतकी खेळीच्या जोरावर बडोदा पहिल्या डावात चंदीगडविरुद्ध आघाडी घेण्यात यशस्वी झाला.

    follow whatsapp