इतर बॅडमिंटनपटूंनी निराशा केलेली असताना पी.व्ही.सिंधूने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने सर्वांना अचंबित केलं आहे. उपांत्यपूर्वी फेरीत सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीचं खडतर आव्हान परतवून लावलं. उपांत्य फेरीत सिंधूसमोर जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगचं आव्हान असणार आहे. ३१ जुलैला दुपारी अडीच वाजता हा सामना रंगणार आहे.
ADVERTISEMENT
परंतू अकाने यामागुचीचं आव्हान परतवून लावणाऱ्या सिंधूचा ताई त्झु यिंगसमोर निभाव लागेल का असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे जाणून घेऊयात कोण आहे ताई त्झु यिंग आणि तिची आतापर्यंतची कामगिरी….
Tokyo Olympic 2020 : यामागुचीचं खडतर आव्हान P.V. Sindhu ने परतवलं, उपांत्य फेरीत प्रवेश
ताई त्झु यिंग ही सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेली खेळाडू आहे. २०१६ साली चीन तैपेईच्या या खेळाडूने ही किमया साधली आणि यानंतर सर्वोच्च स्थानावर सर्वात जास्त काळ राहण्याचा मानही मिळवला. आतापर्यंत सिंधू आणि यिंग या १८ वेळा समोरासमोर आल्याअसून त्यापैकी १३ सामने हे यिंगने जिंकले असून पाच सामन्यांमध्ये सिंधूला विजय मिळवणं शक्य झालंय. यंदाच्या वर्षात जानेवारी महिन्यात यिंग आणि सिंधू समोरासमोर आल्या होत्या. ज्यात यिंगने सिंधूला १९-२१, २१-१२, २१-१७ असं हरवलं होतं.
परंतू या परिस्थितीत एक गोष्ट सिंधूच्या बाजूने आहे ती म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धांमधली यिंगची कामगिरी. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये यिंग चिनच्या खेळाडूकडून साखळी फेरीत बाहेर पडली होती. यानंतर रिओ ऑलिम्पिकमध्ये यिंगने सिंधूच्या हातून पराभव स्विकारला होता. परंतू यानंतर २०१८ साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई खेळांमध्ये यिंगने आपल्या कामगिरीत सुधारणा करत सुवर्णपदकाची कमाई केली होती. याव्यतिरीक्त मानाच्या All England Open स्पर्धेचं २०१८ आणि २०२० चं विजेतेपदही यिंगने मिळवलं आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात या दोन्ही खेळाडूंचा खेळ कसा रंगतो याकडे सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT
