काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे का?

राजदीप सरदेसाई

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेस पक्षात बंडाची तयारी सुरू आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे कारण कपिल सिब्बल यांनी घेतलेली परिषद. पक्षाला अध्यक्षच नाही त्यामुळे निर्णय कोण घेतंय हे आम्हाला माहित आहेही आणि नाहीही.. अशा काहीशा द्विधा मनस्थितीत काँग्रेसचे हे दिग्गज आहेत. याबाबत मनिष तिवारी यांना विचारलं असता त्यांचं म्हणणं हे आहे की ‘काँग्रेसमध्ये राहून आम्ही काँग्रेसला वाचवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे’ असं G23 मधल्या नेत्यांनीही वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पक्षाला कसं वाचवायचं हे आमच्यासमोरचं ध्येय आहे असं मनिष तिवारी म्हणाले आहेत. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांना हटवण्यात आलं आहे. विश्वासात घेतलं गेलं नाही असं दिसतं आहे.

कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणी यांना आणण्यात आलं मात्र त्यासाठी G23 मधल्या नेत्यांना विश्वासातच घेतलं गेलं नाही असाही एक सूर आहे. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष नाहीत. मात्र निर्णय ते घेत आहेत याबाबत काहींच्या मनात नाराजी आहे हे दिसून येतं आहे. राहुल गांधी यांनी जबाबदारी घ्यावी आणि मग निर्णय घ्यावेत इतकंच या जुन्या जाणत्या लोकांचं म्हणणं आहे. त्यांना काँग्रेस सोडून कुठेही जायचं नाही. काँग्रेससाठी हाय कमांड कल्चर कधीच नवं नाही. त्यांना आदेश मानण्याची सवय आहे. त्यामुळे कपिल सिब्बल जरी हे म्हणत असले की जी हुजुरी करणार नाही तरीही त्याचा अर्थ निर्णय घेताना आम्हालाही विश्वासात घेतलं गेलं पाहिजे असा आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आता आणखी एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ती अशी की…हाय कमांडचे आदेश आले की ते झेलायचे हे निवडणुका जिंकेपर्यंत व्यवस्थित चालत होतं. आता तुम्ही निवडणूकही जिंकत नाही आणि तुम्हाला आदेशही द्यायचे आहेत, निर्णयही घ्यायचे आहेत तेही कुणाला विश्वासात न घेता असं कसं चालेल? असा एक सूर उमटताना दिसतो आहे. नवज्योत सिंग सिद्धूंना पंजाबात आणलं त्यांनी आता प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी असं का केलं याचं उत्तर कोण देणार? अशा निर्णयांच्या बाबतीत उत्तर कोण देणार हा प्रश्न काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांना पडला आहे. थोडक्यात या सगळ्या परिस्थितीचं वर्णन करायचं झालं तर राहुल गांधी विरूद्ध ज्येष्ठ काँग्रेस नेते किंवा G23 चे नेते असं वातावरण आत्ता आपल्याला दिसून येतं आहे.

ADVERTISEMENT

प्रश्न असा आहे की राहुल गांधींना हे सगळे नेते विरोध करत असले आणि त्यांना बदललं पाहिजे का? असं वाटण्याचाही या सगळ्यांचा कल असला तरीही या नेत्यांकडे पर्याय आहे का? समजा राहुल गांधींना विरोध करणाऱ्या नेत्यांनी जर थेटपणे सांगितलं की आम्हाला राहुल गांधींचं नेतृत्व मान्य नाही. मग त्यांच्याकडे राहुल गांधींना पर्याय आहे का? तर त्याचं उत्तर या नेत्यांकडे नाही. या नेत्यांना वाटणारी धास्ती ही आहे की 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसचा पराभव झाला तर काय होईल?

ADVERTISEMENT

समजा काँग्रेसचा पराभव झाला तर एक गोष्ट नक्की होण्याची शक्यता आहे ती म्हणजे काँग्रेसमध्ये फूट पडण्याची. काँग्रेसची दोन शकलं होऊ शकतात. त्याचं ढोबळ मानाने करता येण्यासारखं वर्णन म्हणजे एक काँग्रेस असेल ती राहुल गांधी यांच्या नेतृत्वातली. दुसरी काँग्रेस असेल ती काँग्रेस परिवाराची. ज्यांचं नेतृत्व कुणाकडे जाईल हे आज सांगता येणार नाही मात्र ही शकलं होण्याची चिन्हं मात्र निश्चित आहेत.

1969 लाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. इंदिरा गांधी विरूद्ध वेगळी काँग्रेस तयार झाली होती. मात्र त्या काळात इंदिरा गांधींनी टक्कर दिली आणि त्या जिंकल्या. गांधी परिवार तेव्हा जेवढा मजबूत होता तेवढा आज नाही हे वास्तव नाकारता येणार नाही. आजची राजकीय समीकरणंही बदलली आहेत. इंदिरा गांधींकडे सत्ता होती. त्यांनी जनमत जिंकून दाखवलं होतं. मात्र आत्ताचा गांधी परिवार हा व्होट कॅचर नाही. त्यांना सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळेच G23 मधल्या नेत्यांचा राहुल गांधी यांना विरोध आहे हे दिसतं आहे.

राहुल गांधी यांना विरोध होण्याचं कारण हे देखील आहे की राहुल गांधी आणि त्यांचे लोक पक्षाला टेक ओव्हर करु पाहात आहेत असं काहींना वाटतं आहे तसं चित्र निर्माण करण्यात राहुल गांधी यशस्वी झाले आहेत. राहुल गांधींकडे पक्षाचं नेतृत्व देण्यात आलं होतं पण ते तितक्या प्रभावीपणे काम करू शकत नाहीत हे दिसलं. त्यातून मला पक्षाचं अध्यक्षपद नको मात्र अधिकार सगळे हवेत, निर्णयही मी घेणार ही राहुल गांधींची भूमिका अनेकांना मान्य नाही असं दिसतं आहे. राहुल जनरेशन Vs सोनिय जनरेशन असंही एक बॅटल दिसून येतं आहे.

अमरिंदर सिंग यांना जेव्हा पंजाबच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया आठवा त्यांनी हे सांगितलं होतं सोनिया गांधी त्यांना म्हणाल्या की सॉरी अमरिंदर. याचाच अर्थ हा की आत्ता पक्षात असा एक वर्ग आहे आणि खासकरून तो ज्येष्ठ नेत्यांचा वर्ग आहे जो सोनिया गांधींना मानतो. तर दुसरा असा वर्ग आहे जो राहुल गांधींना मानतो. अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधींकडे नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांना जावं लागलं ते राहुल गांधींमुळे. त्यामुळे जनरेशन बॅटल दिसतं आहे. मात्र आज आपण जी परिस्थिती आपण पाहतो आहोत त्यावरून असं दिसतं आहे की काँग्रेस पक्ष हा फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आज नाही तर उद्या किंवा येत्या सहा महिन्यात या पक्षाचे दोन तुकडे होतील यात शंका वाटत नाही.

कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवाणी यांना काँग्रेसमध्ये घेण्यात आलं आहे. हे चळवळीतून आलेले नेते आहेत. हे सगळे डाव्या विचारांचे नेते आहेत. ही एक नवी टीम टीम राहुल म्हणून ओळखली जाते आहे. मात्र काँग्रेसमधल्या जुन्या जाणत्या लोकांना वाटतं आहे की या नव्याने काँग्रेसमध्ये येणाऱ्या लोकांकडे काही निश्चित असं धोरण नाही. त्या धोरणाचा आणि विचारसरणीचा अभाव असेल तर ते मोदींना टक्कर कशी देऊ शकतील? मोदींना विरोध करणं हे एवढं एकच धोरण या दोघांचंही दिसतं आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे काय दिशा आहे असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विचारत आहेत.

दुसरीकडे हा सल्लाही दिला जातो आहे की जे तरूण नेते येत आहेत त्यांनी निवडणुकांसंदर्भातली रणनीती तयार केली पाहिजे. जनसंपर्क वाढवा, इतर लोकांशीही चर्चा करा. राहुल गांधी यांनी पक्षातल्या जुन्या-जाणत्या लोकांना विचारात का घेत नाही? पंजाबमध्ये तुम्ही अमरिंदर यांना हटवलंत ठीक आहे पण मग नवज्योत सिंग सिद्धूंना का मोठं केलंत? का डोक्यावर घेतलं असा प्रश्न काँग्रेसमधले जुने जाणते लोक विचारत आहेत. महाराष्ट्राच्या बाबतही तेच झालं आहे नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदी नेमण हे अनेकांना महाराष्ट्रात पटलेलं नाही.

काँग्रेसचा कार्यकर्ता आहे त्याच्यापर्यंत राहुल गांधी पोहचत का नाही? उत्तर प्रदेशात प्रियंका गांधींना पुढे केलं जातं आहे पण त्या लोकांपर्यंत कितीवेळा गेल्या? मग आता हे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. पूर्वी जेव्हा काँग्रेस जिंकत होतं तेव्हा हायकमांडला कुणी प्रश्न विचारत नव्हतं मात्र आता लोक प्रश्न विचारू लागले आहेत.

काँग्रेस नवीन चेहऱ्यांना संधी देतं आहे हे चांगलंच आहे. गुजरातचं उदाहरण घ्या तिथे हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी हे दोघेही जण पक्षामध्ये नवी उर्जा आणण्याचं काम नक्कीच करू शकतील. जिग्नेश मेवाणी यांचं म्हणणं आहे की भाजपला आम्ही टक्कर देऊ. पण लक्षात घ्या नरेंद्र मोदी मोरारजी देसाई नाहीत, चरणसिंग नाहीत. त्यांना टक्कर द्यायची तर फक्त टीम बदलून चालणार नाही. फक्त अँटी मोदी धोरणातून काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकणार नाही. G23 असो किंवा टीम राहुल असो पण त्यांच्याकडे आजच्या घडीला काही उत्तर नाही हे पण स्वीकारालं पाहिजे.

1998 मध्ये सोनिया गांधी सक्रिय झाल्या..2004 नंतर राहुल गांधी आणि 2017 ला प्रियंका गांधी यांना आणलं गेलं. काँग्रेसची ही तिन्ही ब्रह्मास्त्रं निष्प्रभ ठरली आहेत. त्यामुळे आता गांधी परिवाराच्या बाहेरचा नेता आणता येईल का असा प्रश्नही चर्चिला जातो. मात्र कोण तो व्यक्ती आहे की जो नरेंद्र मोदींना टक्कर देऊ शकतो. याबाबत विचार आणि मंथन हे काँग्रेसमध्ये सुरू आहे. गांधी परिवाराला वजा करून काँग्रेस परिवार हा विचार कुठेतरी सुरू झाला आहे. मात्र याचं ठोस उत्तर नाही.. नवीन काँग्रेस स्थापायची की आहे त्या काँग्रेसला नवं रूप द्यायचं हे मंथन सुरू आहे असं सगळं असलं तरीही काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे हे नक्की.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT