प्रश्न केवळ बिसलेरीच्या पाण्याचा नाही, घरा-घरात होणाऱ्या अस्वच्छ पाणी पुरवठ्यावर नागरिक शांत का?

बिसलेरीच्या पाण्याचे नमुने तपासणीत अपयशी ठरल्यानंतर बाटलीबंद पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, घराघरांत पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता आणि स्वच्छ पाण्यासाठी नागरिकांना करावा लागणारा खर्च हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे.

ADVERTISEMENT

Paisa Pani blog
Paisa Pani blog
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बाटलीबंद पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

point

पाण्यासाठी नागरिकांना करावा लागणारा खर्च हा अधिक महत्त्वाचा

पैसा पाणी : बाटलीबंद पाणी आपण सुरक्षित असल्याच्या विश्वासाने पितो. मात्र, आता देशातील सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक असलेल्या बिसलेरीच्या पाण्याचे नमुने तपासणीत अपयशी ठरल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या नमुन्यांमध्ये ब्रोमेट, पीएएच (PAH) यांसारखी रसायने आणि कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळले आहेत. हे घटक मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे बिसलेरीचे पाणी सुरक्षित नसेल, तर मग कोणत्या पाण्यावर विश्वास ठेवायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, खरा मुद्दा केवळ बिसलेरीचा नाही, तर देशातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळतंय का? हा आहे. बाटलीबंद पाणी सुरक्षित मानून आपण त्यावर विश्वास ठेवतो; पण आपल्या घरात येणाऱ्या पाण्याची स्थिती काय आहे? याकडे मात्र फारसं लक्ष दिलं जात नाही.

दिल्लीतील 69 टक्के घरांमध्ये आरओ किंवा वॉटर प्युरिफायर

आपल्या घरांमध्ये येणारं पाणी सरकारी जलशुद्धीकरण केंद्रांमधून प्रक्रिया करून पुरवलं जातं. तरीही हे पाणी पिण्यासाठी सुरक्षित आहे, असा विश्वास अनेकांना वाटत नाही. त्यामुळे अनेकजण पाणी पिण्यापूर्वी आरओ किंवा वॉटर प्युरिफायरचा वापर करतात. हिंदुस्तान टाइम्सने यावर्षी दिल्लीतील 18 ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासले होते. त्यापैकी आठ ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं आढळलं. दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत ही परिस्थिती असेल, तर नागरिकांनी नळाच्या पाण्यावर विश्वास कसा ठेवायचा? लोकल सर्कलच्या सर्वेक्षणानुसार, दिल्लीतील 69 टक्के घरांमध्ये आरओ किंवा वॉटर प्युरिफायर बसवण्यात आले आहेत. यावरून घरात येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांच्या मनात किती शंका आहेत, हे स्पष्ट होतं.

बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ 32 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक

घरातून बाहेर पडल्यानंतरही स्वच्छ पाण्याचा प्रश्न कायम असतो. त्यामुळे अनेकजण बाटलीबंद पाणी विकत घेऊन पितात. IBEF च्या अंदाजानुसार, भारतातील बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ 32 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारकडून शहरी भागातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवण्यासाठी अमृत 2 ही योजना राबवली जात आहे. देशातील चार हजारांहून अधिक शहरी भागांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी यावर्षी आठ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, आपण बाटलीबंद पाण्यावर किती खर्च करतो, याचा विचार केला तर हा खर्च सरकारी योजनेच्या तरतुदीच्या चारपट आहे. म्हणजेच स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत.

आता बिसलेरीच्या प्रकरणाकडे पाहूया. गोवा आणि पश्चिम बंगालमध्ये अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून (FSSAI) पाण्याचे वेगवेगळे नमुने घेण्यात आले होते. गोव्यातील नमुन्यांमध्ये ब्रोमेट आणि पीएएच ही रसायने आढळली, तर पश्चिम बंगालमधील नमुन्यांमध्ये कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळले. त्यामुळे संबंधित पाणी पिण्यायोग्य नसल्याचं स्पष्ट झालं. यावर कंपनीने आपली बाजू मांडली आहे. कंपनी दरवर्षी पन्नास हजार बॅच तयार करते. त्यापैकी केवळ एका-एका बॅचवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, गुणवत्तेबाबत कंपनी कटिबद्ध असल्याचंही सांगण्यात आलं आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणातून एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. बिसलेरीच्या पाण्याचा नमुना तपासणीत अपयशी का ठरला? एवढाच हा प्रश्न मर्यादित नाही. तर बाटली विकत घेतल्याशिवाय आपल्याला स्वच्छ आणि सुरक्षित पाणी का मिळत नाही? हा खरा प्रश्न आहे. बिसलेरीच्या पाण्याबाबत आपण आवाज उठवतो; पण आपल्या घरात येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत मात्र शांत राहतो. प्रश्न बिसलेरीचा नाही, प्रश्न प्रत्येक नागरिकाला सहज उपलब्ध होणाऱ्या स्वच्छ पाण्याचा आहे.