'त्या सात जणांमध्ये एकनाथ शिंदेही होते'; फडणवीसांच्या 'त्या' विधानावर अजित पवार भडकले

'हे काही उत्तर नाही', दोघांच्याच मंत्रिमंडळावरून देवेंद्र फडणवीस-अजित पवार आमने-सामने
Ajit Pawar Devendra Fadnavis
Ajit Pawar Devendra Fadnavis

-योगेश पांडे, नागपूर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला महिना लोटून गेला मुहूर्त लागलेला नाही. त्यावरून विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केलं जात आहे. अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातही हा मुद्दा उपस्थित केला होता. आता याच मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सामना बघायला मिळतोय. मागच्या सरकारचं मंत्रिमंडळ पाच जणांचं होतं, या फडणवीसांच्या विधानावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं.

मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार हे दौऱ्यावर आहेत. दौऱ्याला सुरूवात करण्यापूर्वी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला.

अजित पवार म्हणाले,"मी ज्या दिवशी दौऱ्याला सुरूवात केली. त्यादिवशी त्यांना भेटलो होतो. काही प्रश्न मांडले होते. माझ्यासोबत रोहित पवारही होते. आम्हाला जे काही पाहायला मिळत आहे. अजून पंचनामे झालेले नाहीत. आम्ही त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सांगत आहोत. मला प्रशासनाची माहिती असल्यानं सत्तेत आणि विरोधी बाकांवर असताना काय केलं पाहिजे याची कल्पना आहे."

Ajit Pawar Devendra Fadnavis
'हे इतिहासात पहिल्यांदा घडलं'; विश्वासघातकी शब्दावरून केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

अजित पवारांनी फडणवीसांना काय दिलं प्रत्युत्तर?

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर अजित पवार म्हणाले, "अजून शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झालेले नाहीत. आमचं म्हणणं आहे की, मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) आणि उपमुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) यामध्ये लक्ष द्यावं. हेच सांगायला गेलो की, दोघेच कारभार बघत आहेत, कुणीच त्यांच्या जोडीला नाही. तर त्यावरूनच काल उपमुख्यमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) विधान केलं. म्हणाले मागे नव्हतं का पाच लोक, पण त्यांनी चुकीचं सांगितलं, सात लोकांनी सुरूवातील शपथ घेतली होती. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात. त्यातील काहीजण तर मुख्यमंत्रीपद भूषवू शकतील अशी माणसं होती. त्या सात जणांमध्ये एकनाथ शिंदेही होते."

"मला राजकारणात ३२ वर्ष झाली. बाळासाहेब थोरात ८ वेळा आमदार राहिले आहेत. इतके वरिष्ठ लोक होते. तसं यांच्यामध्ये दोघंच आहेत. त्यात त्यांना मुंबईचा व्याप बघावा लागतो. तिथली कामं बघावी लागतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी राज्यावर संकट नव्हतं. त्या काळात फार काही अडचणी आल्या नाहीत. आज ती परिस्थिती नाही. मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये अतिवृष्टीने अक्षरशः शेतकरी आत्महत्या करतोय. ही गंभीर परिस्थिती आहे."
Ajit Pawar Devendra Fadnavis
आदित्य ठाकरेंच्या 'शिव संवाद यात्रे'ला एकनाथ शिंदे देणार प्रत्युत्तर; आज मालेगावात जाहीर सभा

"अशा परिस्थितीत आम्ही काही सांगितलं, तर तुम्ही नव्हता का सात जण. तुम्ही नव्हता का पाच जण. हे काही उत्तर नाही. पंचनामे ताबडतोब कसे सुरू होतील, त्यांना मदत कशी होईल, हे त्याला उत्तर पाहिजे. दुबार पेरणी करायची असेल, तर त्यांना बियाणं कसं मिळेल हे त्याचं उत्तर पाहिजे. या समस्यांबद्दल कुणी काही बोलतच नाही."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in