
-धनंजय साबळे, अमरावती
अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी पोलिसांशी ज्या प्रकरणावरून हुज्जत घातली, ते आता त्यांच्या अंगलट आलं आहे. नवनीत राणा यांच्याविरुद्ध अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनीत राणा यांच्याविरुद्ध धमकावणे आणि बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मुलाच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं हे प्रकरण राणांवर उलटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खासदार नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा पठण प्रकरणानंतर लव्ह जिहाद मुद्दा उचलून धरला आहे. मात्र, त्यांनी ज्या प्रकरणात आवाज उठवला, ते बुमरँग झालं. आता याच प्रकरणामुळे नवनीत राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. मुलीच्या आईवडिलांनी खासदार नवनीत राणांकडे मुलीचा शोध घेण्यासंदर्भात मदत मागितली. त्यानंतर खासदार नवनीत राणांनी या प्रकरणाचा थेट लव्ह जिहादशी संबंध जोडला.
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, बेपत्ता तरुणी सातारा शहरात सापडली. भांडण झाल्यामुळे आपण घरातून निघून गेलो होतो आणि आपल्याशी कुणीही लग्न केलं नाही. नवनीत राणा याचा लव्ह जिहादशी संबंध जोडून बदनामी करत असल्याचा आरोप तरुणीने केला होता.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या वडिलांनी आता नवनीत राणा यांच्याविरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी खासदार नवनीत राणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या त्या तरुणाला धमकावलं आणि त्यांची बदनामी केली. त्याचबरोबर एका विशिष्ट समाजाची बदनामी केली. मुलावर लव्ह जिहादचे आरोप केले, असं संबंधित मुलाच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं आहे.
मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. नवनीत राणा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी दिली.