संग्राम जगतापांच्या पीएची दहशत? अंधारेंनी व्हिडीओ बाहेर काढला! 'विरोधी उमेदवाराला बंदुक दाखवली...'
Sushma Andhare on Sangram Jagtap : सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की, “आमदार संग्राम जगताप सोबत नसताना त्यांचे स्वीय सहाय्यक आणि बॉडीगार्ड हे समोरच्या पक्षातील नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन उभे आहेत.”
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संग्राम जगतापांच्या पीएची दहशत?
अंधारेंनी व्हिडीओ बाहेर काढला!
विरोधी उमेदवाराला बंदुक दाखवली...
Sushma Andhare on Sangram Jagtap, अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील राजकीय वातावरण तापवणारा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. "आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक आणि बॉडीगार्ड विरोधी पक्षाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या घरासमोर उभे आहेत. शिवाय त्यांच्यासमोर बंदूक दाखवून दहशत निर्माण करत आहेत", असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. या आरोपांसह त्यांनी संबंधित व्हिडीओ X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की, “आमदार संग्राम जगताप सोबत नसताना त्यांचे स्वीय सहाय्यक आणि बॉडीगार्ड हे समोरच्या पक्षातील नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन उभे आहेत.” या प्रकारामुळे नगर शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे बंदूक दाखवून धमकावण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं अंधारे यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे संबंधित ठिकाणी पोलिसांकडूनही बंदुकीच्या माध्यमातून दडपशाही केली जात असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. रामदास वाणी यांच्या जागेवर हा प्रकार घडल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना घार्गे यांनी सांगितलं की, आमदार संग्राम जगताप यांच्या स्वीय सहाय्यकाशी संबंधित व्हिडीओप्रकरणी सखोल चौकशी केली जाणार असून, सत्य समोर आल्यानंतर निश्चितपणे योग्य ती कारवाई केली जाईल. कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी दिली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.










