'अमोल मिटकरींनी राष्ट्रवादीत काय घडणार आहे, त्याकडं लक्ष द्यावं'; चंद्रशेखर बावनकुळे काय बोलले?

पंकजा मुंडेंना अमोल मिटकरींनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर; भरत गोगावले यांच्या विधानावरही भाजप प्रदेशाध्यक्षांनी मांडली भूमिका
Amol Mitkari, chandrashekhar bawankule
Amol Mitkari, chandrashekhar bawankule

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. पंकजा मुंडेंना ऑफर देणाऱ्या अमोल मिटकरींना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देताना स्वतःच्या पक्षात काय घडणार आहे, त्याकडे लक्ष द्या असं म्हटलंय. त्याचबरोबर बावनकुळे यांनी भरत गोगावले यांनी केलेल्या विधानाबद्दलही भूमिका मांडली आहे.

नागपूर येथे माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "फडणवीस सरकारने नागपूर शहर आणि जिल्ह्यासाठी जी काही विकास कामं जाहीर केली होती, ती मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारनं थांबवली होती. जीआर निघून ही कामे थांबविली होती. दीक्षाभूमीचा 100 कोटींचा विकास प्रकल्प थांबवला होता."

"ताज बागचा विकास प्रकल्प थांबवला होता. नागपुरात पाणी आणण्यासाठी मोठ्या भुयाराचा 2,700 कोटींचं काम थांबवला होतं. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर जिल्ह्यातील या सर्व थांबवलेल्या प्रकल्पांना मान्यता द्यावी, अशी आमची मागणी आहे. यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागलं आहे. एकूण पाच हजार कोटींची विकास कामं थांबवली होती. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सर्व पाच हजार कोटींच्या कामांना मंजूरी घेण्यात येईल", असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Amol Mitkari, chandrashekhar bawankule
एकनाथ शिंदे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार?; दीपक केसरकरांनी केला खुलासा

भरत गोगावलेंच्या विधानावर बावनकुळे काय म्हणाले?

शिवसेनेतील फूट आणि राज्यातील सत्तासंघर्षाबद्दल सर्वोच्च न्यायालयात न्याय प्रविष्ट प्रकरणाबद्दल शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी विधान केलं. या प्रकरणाला ४ ते ५ वर्ष लागणार आणि तोपर्यंत २०२४ निवडणूक जिंकू आणि पुन्हा सत्तेत येऊ, असं गोगावले म्हणाले. त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी भाष्य केलं.

"भरत गोगावले काय म्हणाले, हे मला माहीत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्वच पक्षांना मान्य करावे लागतील. सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल तो आम्हालाही मान्य राहील", असं बावनकुळे म्हणाले.

Amol Mitkari, chandrashekhar bawankule
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर; भरत गोगावले म्हणाले, '4 ते 5 वर्ष ठरणार नाही'

'अमोल मिटकरींनी त्यांच्या पक्षात लक्ष द्यावं, पंकजा मुंडेंवर बोलण्याइतकी उंची नाही'

अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी येण्याच्या आवाहनावर बावनकुळे म्हणाले, "अमोल मिटकरी यांची पंकजा मुंडे यांच्यावर बोलण्याएवढी उंची नाही. पंकजा मुंडे रक्तानं भाजपच्या कार्यकर्ता आहेत. त्यांच्या रक्तात भाजप आहे. त्या राष्ट्रीय नेत्या असून, मध्य प्रदेशाच्या सहप्रभारी आहेत. त्या कधीच भाजप सोडण्याचा विचार करू शकत नाहीत. त्यामुळे अमोल मिटकरी यांनी स्वप्न पाहू नये. जयंत पाटील यांनीच अमोल मिटकरी यांना विचारना करावी. तसेच मिटकरी यांनी त्यांच्या पक्षात काय सुरू आहे आणि त्यांच्या पक्षात काय घडणार आहे याकडे लक्ष द्यावं", असं उत्तर बावनकुळे यांनी मिटकरींना दिलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in