चंद्रपूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यात तुफान पाऊस! ट्रक आणि प्रवासी गाडी पुरात गेली वाहून

Heavy rain in chandrapur : सात ते आठ लोक पुरात गेले वाहून, एकाचा वीज पडून मृत्य, चार गावांचा संपर्क तुटला
चंद्रपूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेली प्रवासी गाडी.
चंद्रपूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेली प्रवासी गाडी.

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस कोसळत असून, चंद्रपूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील घटनांत वाहनांबरोबरच सात ते आठ जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातही जोरदार पाऊस झाला असून, चार गावांचा संपर्क तुटला आहे. वर्धा जिल्ह्यात एकाचा वीज पडून मृत्यू झाला असून, दोन जण पुरात वाहून गेले आहेत. वाहून गेलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.

चंद्रपुरात टाटा मॅजिक गेली वाहून

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात प्रवासी असलेली गाडी वाहून गेली. प्रवाशांनी भरलेली टाटा मॅजिक गाडी गेली वाहून गेली. टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्याला पूर आलेला असतानाही चालकानं दाखवलं धाडस सगळ्यांच्याच अंगलट आलं. गाडीत ५ प्रवाशी आहेत. पाण्याच्या प्रवाहात ओढली जातात प्रवाशी टपावर चढले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य हाती घेतलं. जिल्ह्यातील विविध तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून, नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

गडचिरोलीत ट्रकच सापडला पुराच्या तडाख्या

गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी रात्री एक ट्रक पेरमिली नाल्यावरून वाहून गेला. या ट्रकमधून पाच ते सहा लोक प्रवास करत होते. भामरागड तालुक्यातील पेरमिली नाल्याला पूर आलेला असताना पुलावरून ट्रक घेऊन जाताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक वाहून गेला. माहिती मिळाल्यानंतर एसडीआरएफची पथक शोध घेत आहेत. रविवारी सकाळपर्यंत वाहून गेलेल्या शोध लागलेला नव्हता.

भामरागड तालुक्यातील पेरमिली नाल्याच्या पुरात वाहून गेला ट्रक.
भामरागड तालुक्यातील पेरमिली नाल्याच्या पुरात वाहून गेला ट्रक.

अमरावती जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! ४ गाव संपर्काबाहेर

अमरावती जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस धामणगाव रेल्वे तालुक्यात झाला. त्यामुळे या तालुक्यातील बोरगाव निस्ताने, सोनोरा काकडे, गोकुळसरा, दिघी महले या गावाबाहेर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं ४ गावचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

दरम्यान नागापूर येथील बाबासाहेब दरेकर या गुराख्याचा शेतात असताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. याशिवाय विविध गावातील ४३ घरांपैकी निबोली गावामध्ये १२ नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्यानं त्यामुळे शेतीच देखील मोठ नुकसान झालं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पश्चिम विदर्भात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

धामणगाव रेल्वे तालुक्यात मुसळधार पाऊस.
धामणगाव रेल्वे तालुक्यात मुसळधार पाऊस.

वर्धा जिल्ह्यात शेतमजूर एकाचा मृत्यू, दोघे गेले वाहून

वर्धा शहरालगत असलेल्या सालोड हिरापूर आणि धोत्रा या दोन गावाला जोडणाऱ्या नाल्याला संततधार पावसामुळे नदीचं स्वरूप आले. यामुळे शेतात गेलेल्या तेरा महिला व एक पुरुष हे अडकून पडले होते. गावकऱ्यांनी त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र, यश आलं नाही. त्यामुळे तत्काळ याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि एनडीआरएफची टीम आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाले. तीन तासानंतर तेरा जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं. एक महिला जखमी झाली असून, महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिली.

वर्धा तालुक्यातील कुरझडी फोर्ट येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला. श्रीराम किसनाजी शेंडे (वय 65) असं मयत व्यक्तीचं नाव आहे. तर सुमन अरूणराव गजामे (वय 62) ही महिला रामटेके ले आऊटमध्ये शेतातून येत असताना नाल्याच्या पुरात वाहून गेली. त्याचबरोबर पिपरी येथील रहिवासी देवानंद गुलाबराव किन्नाके हे नाल्याला आलेल्या पुरात वाहुन गेले असून, त्यांचा शोध सुरू आहे.

निम्न वर्धाचे ७ दरवाजे उघडले

निम्न वर्धा प्रकल्पाचे रविवारी (10 जुलै) सकाळी ८ वाजता ३ गेट ३० से.मी.ने उघडून 78.65 घन.मी/से ईतका विसर्ग करण्यात आला. परंतु प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने आणि जलाशयात येणाऱ्या पाण्याचा ओघ वाढल्याने सकाळी ९.३० वाजता चार गेट उघडण्यात आले. १८६.६० घन.मी/से इतका विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भीमाशंकर परिसरातील पर्यटकांचं आकर्षण असलेला कोंढवळ धबधबा मागील दोन दिवसांपासून ओसंडून वाहू लागला.
भीमाशंकर परिसरातील पर्यटकांचं आकर्षण असलेला कोंढवळ धबधबा मागील दोन दिवसांपासून ओसंडून वाहू लागला.

भीमाशंकर :कोंढवळ धबधबा खळाळला, पर्यटकांची गर्दी

भीमाशंकर परिसरातील पर्यटकांचं आकर्षण असलेला कोंढवळ धबधबा मागील दोन दिवसांपासून ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे वर्षाविहार करणाऱ्या पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. भीमाशंकर परिसर सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढला असून, निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. मागील 2 दिवस पाऊस बरसत असल्याने परिसरला हिरवाईची झालर पांघरली गेलीये. धबधबे व इतर वर्षा पर्यटनाच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन भीमाशंकर वन अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण आणि घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in