पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं! पाण्यात अडकलेल्या 12 जणांची सुखरुप सुटका

पुण्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळली, एक दुचाकीचालक जखमी
मुसळधार पावसामुळे पुणे रेल्वे स्थानकाची झालेली अवस्था
मुसळधार पावसामुळे पुणे रेल्वे स्थानकाची झालेली अवस्था

पुणे शहराला पुन्हा एकदा मुसळधार पावसानं झोडपून काढलं. पुणे शहर आणि परिसरात सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत मुसळधार पाऊस सुरूच होता.

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्वती येथील रमणा गणपतीजवळ भिंतीचा काही भाग कोसळला. शहरातील अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटनांमुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

दुचाकीवर झाड पडल्यानं एक जण जखमी झाल्याची घटनाही घडलीये. त्याच दरम्यान तब्बल 12 नागरिक पावसात अडकून पडले होते. त्या सर्वांची सुटका अग्निशामक विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी केली.

पर्वती रमणा गणपती जवळील संरक्षक भिंतीचा भाग कोसळल्याची घटना घडली. तसेच हडपसर, आकाशवाणी, चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले आणि पाषाण, लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. या घटनेतील जखमी दुचाकी चालकास तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मंगळवार पेठ स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब 5 जण पाण्यात अडकले होते. तर कोंढवा खुर्द येथील भाजी मंडई लगत असलेल्या एका ठिकाणी 7 नागरिक पाण्यामधे अडकले होते. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशामक विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना यश आले आहे.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरची परिस्थिती
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरची परिस्थिती

पुण्याला पावसानं झोपडपं! रस्त्यांचे कालवे, घरातही शिरलं पाणी

पुणे शहरातील येवलेवाडी स्मशानभूमी परिसरात, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर, कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ-सुखसागर नगर, डॉल्फिन चौक, बी. टी. कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर, हडपसर, गाडीतळ, शिवाजीनगर पोलीस मुख्यालय, मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम, कसबा पेठ, फिश मार्केट जवळ, कुंभारवाड्यासमोर, नारायण पेठ, मोदी गणपती, औंध, डीएव्ही स्कुल गल्ली, कसबा पेठ, पवळे चौक, कसबा पेठ, भुतडा निवास-पर्वती, मित्रमंडळ चौक, गंज पेठ, भवानी पेठ या भागात राहणार्‍या नागरिकांचे जोरदार पावसामुळे प्रचंड हाल झाले. तेथील अनेक सोसायटी, बैठ्या घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in