'BMC च्या सत्तेसाठी उद्धव ठाकरेंकडून धार्मिक तुष्टीकरण', 'जागर मुंबईचा'मध्ये शेलारांचा गंभीर आरोप

'जागर मुंबईचा' सभेतून मुंबई भाजपा अध्यक्षांचं टीकास्त्र; 'उद्धवजी, तुम्हाला मुंबईचा रंग का बदलायचा आहे?'
Uddhav Thackeray And Ashish Shelar
Uddhav Thackeray And Ashish Shelar

मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईतील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालीये. राजकीय मोर्चबांधणी जोरात सुरू असतानाच भाजपनं जागर मुंबईचा अभियानाचं आयोजन केलंय. पहिल्याच कार्यक्रमात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 'सलग २५ वर्ष तुम्ही मनपात सत्ता भोगली, मग तुमच्या कामावर तुम्ही मते का मागत नाहीत?', असा थेट सवाल जागर आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय.

वांद्रे येथील सरकारी वसाहतीमध्ये मुंबई भाजपाच्या जागर मुंबईचा या अभियानातंर्गत पहिली सभा झाली. या सभेतून आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर धार्मिक तुष्टीकरण करत असल्याचा आरोप केला. आशिष शेलार म्हणाले, 'राज्यात अडीच वर्षांची सत्ता भोगल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेची सत्ता बळकाविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत धार्मिक तुष्टीकरण करण्याला सुरुवात केली आहे. पण, आम्ही ठामपणे सांगतो उद्धवजींना ना मराठी, ना मुस्लिम मते देणार नाहीत. सलग २५ वर्ष तुम्ही मनपात सत्ता भोगली, मग तुमच्या कामावर तुम्ही मते का मागत नाहीत?"

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, "एकही विकासकाम केल्याचं सांगता येत नाही म्हणून मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी रडीचा डाव खेळण्याची सुरुवात करण्यात येत आहे. उद्धवजी, तुम्हाला मुंबईचा रंग का बदलायचा आहे?", प्रश्न आशिष शेलार यांनी सभेतून केला.

"आमच्या कोकणातील मराठी मुस्लिम बांधव आजपर्यंत कधीही वेगळी चूल मांडत नाहीत. ते सर्वांसोबत सण उत्सवात सुख दु:खात मिळून मिसळून राहतात मग तुम्ही का वेगळी चूल मांडताय?", असंही शेलार उद्धव ठाकरेंना म्हणाले.

'जागर मुंबईचा' : पूनम महाजन यांची उद्धव ठाकरेंवर टीका

खासदार पूनम महाजन यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली. "मुंबईकर आणि मराठी माणसाचं नाव घेऊन उद्धवजींच्या शिवसेनेनं राजकारण केलं. मुंबईकरांना हक्काचं घर देण्यासाठी, सरंक्षण खात्याच्या, रेल्वेच्या, विमानतळाच्या, सरकारी वसाहतीमध्ये, फनल झोनमध्ये अडकलेल्या, रखडलेल्या एसआरए प्रकल्पामधील सर्व रहिवाशांना हक्काचं घर देण्यासाठी हा जागर होत आहे. हा जागर कशासाठी तर ट्राफिकची समस्या सोडविण्यासाठी. तसेच अद्ययावत हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्र उभारण्यासाठी हा जागर होत आहे. आश्वासन नाही तर आता निर्णय होणार", असं पूनम महाजन म्हणाल्या.

"मराठी-गुजराती असा वाद निर्माण करताय? पण तुम्हाला याचा विसर का पडलाय की गुजरातचे भाजपचे अध्यक्ष मराठी आहेत. गुजरातमध्ये मराठी माणसाने हा झेंडा फडकवला त्याचा तुम्हाला अभिमान नाही का? मुंबईतील हा जागर अनेक प्रश्न विचारणार आहेच, पण न सुटलेल्या मुंबईकरांच्या प्रश्नांचा जाब ही विचारणार आहे," अशा शब्दांत पूनम महाजन यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in