पुणे : शेअर बाजारातून मोठा परतावा मिळवून देण्याचं आमिष, ज्येष्ठ नागरिकाला 22 कोटींना लुबाडलं
Pune Crime News : याबाबत हरियाणामधील मूळ रहिवासी असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांची पुण्यात खासगी कंपनी होती. कंपनी विक्रीनंतर त्यांना मोठी रक्कम प्राप्त झाली होती, जी त्यांनी बँकेत ठेवली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : शेअर बाजारातून मोठा परतावा मिळवून देण्याचं आमिष
ज्येष्ठ नागरिकाला 22 कोटींना लुबाडलं
Pune Crime News , पुणे : शेअर बाजारातून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 22 कोटी 3 लाख रुपयांची फसवणूक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणातील सायबर टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथून चार जणांना अटक करण्यात आली आहे. सुरेंद्र सिंह (वय 51, रा. अंबरनाथ, जि. ठाणे), आकाश चंद्रशेखर मराठे, लाला केशव उमाप (वय 26) आणि परमेश्वर दिलीप दाभाडे (वय 23, तिघे रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
हेही वाचा : 13 वर्षीय मुलीवर एकदा नव्हे तर दोनदा केला बलात्कार, बीडमधील खळबळजनक घटना
याबाबत हरियाणामधील मूळ रहिवासी असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांची पुण्यात खासगी कंपनी होती. कंपनी विक्रीनंतर त्यांना मोठी रक्कम प्राप्त झाली होती, जी त्यांनी बँकेत ठेवली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर विविध गुंतवणूक योजनांची माहिती देत आरोपींनी त्यांना एका लिंकद्वारे बनावट गुंतवणूक प्लॅटफॉर्मवर जोडले. आरोपींनी सांगितलेल्या सात वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तक्रारदारांनी वेळोवेळी एकूण 22 कोटी 3 लाख रुपये जमा केले.
गुंतवणुकीनंतर कोणताही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. सायबर गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढत छत्रपती संभाजीनगर आणि अंबरनाथ येथून त्यांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींकडून अशाच प्रकारे इतर किती जणांची फसवणूक करण्यात आली आहे, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख आणि उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, संगीता देवकाते, उपनिरीक्षक स्नेहल अडसुळे, सुशील डमरे तसेच पथकातील इतर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.










