पुणे : आंदेकर टोळीने पुन्हा सूड उगवला, गोळीबार करुनच थांबले नाहीत, कोयत्यानेही वार
Pune Crime News : माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खूनचा बदला घेणे सुरुच..., वनराज आंदेकर खून प्रकरणात आरोपी असलेला आकाश मस्केचा भाऊ बाळा मस्के याच्यावर गोळीबार... पुण्यातल्या बालाजी नगरच्या बस स्टॉपवर घडली घटना
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : आंदेकर टोळीने पुन्हा सूड उगवला
गोळीबार करुनच थांबले नाहीत, कोयत्यानेही वार
Pune Crime News, पुणे : शहरातील गुन्हेगारी आणि टोळी संघर्ष पुन्हा एकदा समोर आला असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्या प्रकरणानंतर सुरू असलेली वैराची मालिका अद्याप थांबलेली नसल्याचे दिसून येत आहे. बालाजीनगर परिसरात बुधवारी सकाळी वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या भावावर भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. अक्षय ऊर्फ बाळा म्हस्के (वय 26, रा. आंबेगाव पठार) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव असून त्याच्यावर भारती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय म्हस्के याला एक लहान मुलगी असल्याचेही समजते.
हेही वाचा : पुणे हादरलं, वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळीबार, कोयत्याने वार
तीन राऊंड फायर केल्याची माहिती
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे सव्वादहा वाजण्याच्या दरम्यान अक्षय म्हस्के हा बालाजीनगर येथील संविधान चौक परिसरात आला होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. आरोपींनी तीन राऊंड फायरिंग केल्याची माहिती असून त्यातील एक गोळी अक्षयच्या शरीराला लागली. गोळीबारानंतरही हल्लेखोर थांबले नाहीत. त्यांनी कोयत्याने सपासप वार करत अक्षयला गंभीर जखमी केले आणि त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाले.
हेही वाचा : वाल्मिक कराडला कारागृहात गंभीर संसर्ग, गेल्या 3 दिवसांपासून सलाईनवर
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी अक्षयला रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे बालाजीनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जखमी अक्षय म्हस्के हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी आकाश म्हस्केचा भाऊ असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच मध्य प्रदेशातून पुण्यात पिस्तुले आणण्यात त्याची भूमिका असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे या हल्ल्यामागे जुना टोळी संघर्ष आणि सूडाची भावना असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर शहरात सलग हिंसक घटना घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर एका आरोपीच्या रिक्षाचालक भावावरही जीवघेणा हल्ला झाला होता. बुधवारी झालेला हल्ला हा त्याच वैरातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.









