"मी दारु पिलीये...", पुण्यात महिला पोलीस विरुद्ध दिशेने सुसाट? आता थेट निलंबन अन् गुन्हाही दाखल
Pune Crime News : पुण्यातील मांजरी परिसरात विरुद्ध दिशेने कार चालविल्याचा आणि मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचा आरोप असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी तिला निलंबित करण्यात आले असून, गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
"मी दारु पिलीये...", पुण्यात महिला पोलीस विरुद्ध दिशेने सुसाट?
आता थेट निलंबन अन् गुन्हाही दाखल
Pune Crime News : पुण्यातील मांजरी परिसरात महिला पोलीस कर्मचाऱ्याने दारु पिऊन विरुद्ध दिशेने कार चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले असून, तिच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या वेळी संबंधित महिला पोलीस कर्मचारी पोलिसांच्या गणवेशात होती. मांजरी परिसरातून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी तिची कार विरुद्ध दिशेने जात असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर प्रकरणाची चर्चा सुरू झाली. महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्तनावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.
हेही वाचा : प्रत्येक कर्मचाऱ्याच्या खात्यावर 33,000 RS दिवाळी बोनस, कोणता सरकारी विभाग देतोय गिफ्ट?
महिला पोलीस काळेपडळ पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती
संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याचे वय 39 वर्षे असून, ती काळेपडळ पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या वेळी ती पोलिसांच्या गणवेशात होती. व्हिडीओमध्ये काही जण तिला मद्यप्राशन केले आहे का, असा प्रश्न विचारताना दिसतात. त्यावर ती मद्यप्राशन केल्याचे मान्य करत असल्यासारखे उत्तर देताना दिसते. मात्र, या व्हिडीओमधील संभाषणावरून घटनेच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती? याची संपूर्ण माहिती स्पष्ट होत नाही. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या कारला नंबर प्लेट नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. विरुद्ध दिशेने कार चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे आणि कारवर नंबर प्लेट नसणे, या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे.
महिला पोलिसावर निलंबनाची कारवाई, गुन्हाही दाखल
व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर पुणे पोलिसांनी संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि तिला निलंबित केले. पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांनी गुन्हा दाखल केल्याची आणि निलंबनाची कारवाई केल्याची माहिती दिली आहे. संबंधित महिला पोलीस कर्मचारी रविवार आणि सोमवार या दोन दिवशी कर्तव्यावर उपस्थित नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या माहितीच्या आधारे घटनेपूर्वी तिच्या हालचालींबाबतही तपास केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेपूर्वी ती मित्रमैत्रिणींसोबत पुण्यातील बंड गार्डन परिसरात पार्टी करण्यासाठी गेली होती का? याचीही चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने मद्यप्राशन नेमके कधी आणि कुठे केले? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बाबींचीही पोलीस चौकशी करत आहेत.
