बदलापुरात शिवसेनेला झटका, तर कल्याणमध्ये शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांची हकालपट्टी

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे : बंडखोरीनंतर शिवसेनेतील दोन गटात संघर्ष बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी माजी नगरसेवक शिंदे गटाला जाऊन मिळत आहे, तर दुसरीकडे शिवसेनेकडून कारवाई केली जाताना दिसत आहे.
Shiv Sena Sacks vishwanath bhoir from kalyan city chief post
Shiv Sena Sacks vishwanath bhoir from kalyan city chief post

-मिथिलेश गुप्ता, कल्याण

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेतील फाटाफुटीचं सत्र सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन करत अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटाला जाऊन मिळत आहे. त्यात आता आणखी भर पडली असून, बदलापूर महापालिकेतील २५ माजी नगरसेवक शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. दुसरीकडे शिवसेनेनंही कारवाई करत शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांची पदावरून हकालपट्टी केली आहे.

बदलापूरमधील २५ माजी नगरसेवकांचं एकनाथ शिंदेंना समर्थन

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगरपालिकेचे शिवसेनेच्या सर्वच माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बदलापुरात शिवसेनेचा सुपडा साफ झाल्याची चर्चा रंगली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे, पंचायत समितीचे बाळाराम कांबरी यांच्यासह इतर सदस्य आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे सर्वच माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यातून दिवसेंदिवस पाठिंबा वाढताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या बहुतांश नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. यातील काही ज्येष्ठ नगरसेवकांनी सुरुवातीला मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली होती. शनिवारी मात्र कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सर्वच माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला.

माजी नगरसेवकांनी घेतली शिंदेंची भेट/ badalapur shiv sena ex corporator met eknath shinde
माजी नगरसेवकांनी घेतली शिंदेंची भेट/ badalapur shiv sena ex corporator met eknath shinde

बदलापूर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, अंबरनाथ पंचायत समितीचे बाळाराम कांबरी त्यांचे इतर सहकारी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवसेनेत असलेल्या सर्वच माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्यामुळे बदलापूर शहरात शिवसेनेत एकही माजी नगरसेवक उरलेला नाही.

विश्वनाथ भोईर यांची हकालपट्टी; कल्याण शहरप्रमुखपदी सचिन बासरेंची नियुक्ती

शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याणच्या शिवसेना शहर प्रमुखपदी शिवसेनेकडून सचिन बासरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना शहरप्रमुखपदावरून हटवत बासरे यांची नियुक्ती केल्याचं 'सामना'तून जाहीर करण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचं कल्याण पश्चिमचे विद्यमान आमदार आणि शिवसेना कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी समर्थन केलेलं आहे. या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वनाथ भोईर यांना शिवसेना कल्याण शहरप्रमुख पदावरून हटवत त्यांच्या जागी सचिन बासरे यांची नियुक्ती केली आहे.

सचिन बासरे कोण आहेत?

सचिन बासरे हे गेल्या ३२ वर्षापासून शिवसेनेत कार्यरत आहेत. शालेय विद्यार्थी दशेपासूनच ते शिवसेनेत सक्रिय झाले होते. १९९० पासून शिवसेनेत कार्यरत असलेल्या सचिन बासरे यांनी 32 वर्षांच्या कार्यकाळात ३ वेळा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक, सभागृह नेते, त्यासोबतच स्थायी समिती सदस्य म्हणून काम पाहिलेले आहे. सध्या ते कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्षही आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in