छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : ओहरमध्ये दोन गटात तुफान दगडफेक, 7 लोक जखमी
छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : किराडपुरातील दगडफेक आणि जाळपोळीची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या ओहर गावात दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात हिंसाचाराची घटना घडली. या घटनेला काही तास लोटत नाही, तोच शहराजवळ असलेल्या ओहर गावात दोन गटात वाद होऊन तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar : हिंसाचार करणारे सीसीटीव्हीत कैद, 6 CCTV फुटेज समोर
किराडपुरा भागात घडलेल्या घटनेचीच पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळ असलेल्या ओहर गावात घडली आहे. ओहर गावात दोन गटात जुन्या कारणावरून सकाळी अचानक वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर दोन गटानी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
रस्त्यावर विटा आणि दगडांचा खच
दोन्ही बाजूंचा जमाव चांगलाच आक्रमक झाला होता. संतप्त लोकांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. त्यामुळे ओहर गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी विटा आणि दगडांचा खच पडला होता. घटनेचे काही व्हिडीओही व्हायरल झाले असून, त्यात लोकांमध्ये भांडण सुरू असल्याचे तसेच दगडफेक करतानाचा प्रकार दिसत आहे.
ओहरमध्ये दोन गटात वाद का झाला, पोलिसांनी काय सांगितले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओहर गावात दोन गटात जुन्या वादातून दगडफेक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात दाखल झाले. सध्या गावातील परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तणावपूर्ण आहे. सध्या दोन्ही गटाच्या तक्रारींवरून एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.